पुणतांबा, 4 जून : अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे शेतकऱ्यांचं सुरू असलेलं आंदोलन (Ahmednagar Puntamba farmers protest) दोन दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जून पासून पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाला सुरुवात केली होती. या आंदोलनाची दखल घेत कृषीमंत्री दादा भुसे हे आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीला पोहोचले आणि त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. या चर्चेनंतर शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन तात्पूरतं स्थगित करण्याची घोषणा केली आहे.
आंदोलक शेतकरी धनंजय जाधव यांनी म्हटलं, कृषीमंत्र्यांसोबत सर्व बाबींवर चर्चा झाली. एकूण 14 मुद्द्यांवर न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. काही प्रश्न कृषी, काही प्रश्न ऊर्जा तर काही प्रश्न सहकार मंत्रालयाच्या संबंधित आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांनी म्हटलं, मी सुद्धा एक शेतकरी आहे. तुमच्या मागण्यांबाबतचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवू.
मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बैठकीसाठी येणार आहेत. त्यावेळी मागण्यांच्या संदर्भात निर्णय होईल. आंदोलन तुर्तास दोन दिवसांसाठी स्थगित करत आहोत. मागण्यांच्या संदर्भात झालेल्या चर्चेबाबत अंतिम निर्णय ग्रामसभेत घेणार आहोत. जर आमच्या मागण्यांवर समाधान झालं नाही तर पुढे पुन्हा आंदोलन सुरू ठेवण्यात येईल असंही शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
कृषीमंत्री दादा भुसे यांनी म्हटलं, गेल्या दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय मागण्या आहेत ते कसे सोडवू शकतो याबाबत सूचना केली. अजितदादांनीही फोन करून सुचना केल्या. अडीच तीन तास बैठक संपन्न झाली. किसान क्रांतीच्या 15 मागण्या आहेत. याबाबत काही मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली, ज्या इतर खात्याशी निगडीत मागण्या आहेत त्यावर हसत खेळत चर्चा झाली. शेतकरी हितासाठी सरकारने अनेक चांगले निर्णय या अगोदरच घेतले आहेत. महात्मा फुले कर्जमाफीचा लाभ 32 लाख शेतकऱ्यांना देण्यात आला. नियमित कर्ज फेडणाऱ्यांबाबतची पात्र शेतक-यांची यादी लवकर घोषीत होईल. मंगळवारी बैठकीच नियोजन करण्यात आलं आहे. बैठकीत जे निष्पन्न होईल ती पुणतांबा ग्रामसभेत ठेवलं जाईल त्यानंतर पुणतांब्यात निर्णय घोषित होईल.
आंदोलकांच्या मागण्या काय?
1) ऊसाला एकरी एक हजार रूपये अनुदान द्यावे...
2) शिल्लक ऊसाला हेक्टरी दोन लाख रूपये द्यावे...
3) कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव द्यावा...
4) कांद्याला प्रती क्विंटल पाचशे रूपये अनुदान द्यावे...
5) शेतकऱ्यांना दिवसा पुर्णदाबाने वीज मिळावी...
6) थकित वीज बिल माफ झाले पाहिजे...
7) कांदा आणि गव्हाची निर्यात बंदी उठवावी...
8) सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी त्यासाठी आयोगाची स्थापना करून निर्णय घ्यावा...
9) 2017 साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी...
10) नियमित कर्ज भरणारांचे अनुदान दिले जावे...
11) दुधाला ऊसाप्रमाणे एआरपी लागू केला जावा...
12) दुधाला कमीतकमी चाळीस रूपये दर दिला जावा...
13) खाजगी दुध संकलन केंद्रात होणारी लूट थांबवावी...
14) वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जावी...
15) शेतकरी आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेतले जावे...
16) वन हक्क कायद्यानुसार आदिवासींना जमीनी नावावर केल्या जाव्यात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.