प्रियांका बोबडे, प्रतिनिधी
अहमदनगर, 29 मार्च: महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे बऱ्याचदा दूर्लक्ष होत असतं. विशेषत: मासिक पाळी सारख्या विषयांवर तर बोलणंही टाळलं जातं. त्यामुळे असे प्रश्न महिलांच्या जीवावरही बेततात. आता काही प्रमाणात या विषयांवर प्रबोधन होत असून या प्रश्नांसाठी काहीजण कामही करत आहेत. काही दिवसांपूर्वीच आलेल्या 'पॅडमॅन' या चित्रपटातून मासिक पाळीच्या विषयाला हात घातला होता. आता अहमदनगर जिल्ह्यात अशीच एक 'पॅड वुमन' असून अल्फिया शेख यांनी महिलांच्या आरोग्यासाठी पॅडची निर्मिती सुरू केली आहे.
श्रीगोंद्यातील पॅड वुमन अल्फिया शेख
अल्फिया आसिफ शेख या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील आहेत. बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुढे शिक्षण क्षेत्रात जाण्यासाठी बीएडची पदवी घेतली. परंतु, नोकरीची स्थिती पाहता स्वत:चा व्यवसायच करण्याचा निर्णय घेतला. स्वत: ग्रामीण भागात राहत असल्याने ग्रामीण भागातील महिलांच्या मासिक पाळीतील प्रश्नांची त्यांना जाणीव होती. महिलांच्या आरोग्यासाठी त्यांनी सॅनिटरी पॅड बनवण्याचा निर्णय घेतला.
विंगस्टार सॅनिटरी पॅडची निर्मिती
अल्फिया यांनी मुलीच्या नावाने इनाया हायजिन नावाने व्यवसाय सुरू केला. या अंतर्गत विंगस्टार सॅनिटरी पॅड बनवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्या या व्यवसायाची अनेकांनी खिल्ली उडवली. परंतु, ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यासाठी आपले काम महत्त्वाचे असल्याने अल्फिया यांनी सॅनिटरी पॅड बनवणे सुरूच ठेवले. या कामात त्यांना पती व संपूर्ण कुटुंबीयांची साथ लाभली. त्यामुळे विगंस्टार हा सॅनिटरी पॅडमधील ब्रँड होत आहे.
महिलांच्या आरोग्यासाठी प्रबोधन
अल्फिया या सॅनिटरी पॅडच्या व्यवसायासोबतच मासिक पाळीबाबत महिलांचे प्रबोधन करण्याचे काम करतात. वाड्या -वस्त्यावर जाऊन शेतकरी, ऊसतोड मजूर महिलांना भेटतात. आपण बनवलेले सॅनिटरी पॅड त्यांना मोफत देतात व त्याचे फायदे त्यांना पटवून सांगतात. तसेच आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, युवती यांना भेटून याबद्दल माहिती देतात. बाजारातल्या इतर महागड्या पॅड पेक्षा अल्फिया यांनी बनवलेले सॅनटरी पॅड चांगल्या दर्जाचे आहेत.
Video : यापुढे भीकेवर जगणार नाही, ट्रान्सजेंडरचं 'ट्रान्सफॉर्मेशन'; मुंबईतील भन्नाट सलून एकदा पाहाच!
सॅनिटरी पॅडचे वेगळेपण
ग्रामीण भागात मासिक पाळीत महिला सुती कापडाचा वापर करतात. परंतु, ओलावा कायम राहिल्याने इन्फेक्शनसारख्या समस्या निर्माण होतात. तसेच आरोग्याच्या इतर समस्याही उद्भवतात. त्यासाठी अल्फिया यांनी इतर सॅनटरी पॅडचाही अभ्यास केला. कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक न वापरता त्यांनी कॉटनपासून सॅनिटरी पॅड तयार केले. त्यांच्या विंगस्टार सॅनिटरी पॅडची शोषून घेण्याची क्षमता जास्त आहे. यात प्लास्टिकचा वापर केला नसल्यामुळे गजकर्ण किंवा अजून काही तक्रारी निर्माण होत नाहीत, असे अल्फिया सांगतात. अल्फिया यांच्या महिलांसाठी सॅनिटरी पॅड बनवण्याच्या निर्णयाचे कौतुक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Local18, Women empowerment