मुंबई,27 जानेवारी : राज्यात अचानक बदललेल्या वातावरणामुळे शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गहू, हरभरा, कांदा, यासह केळी आणि कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. शेतीच्या मालाला भाव नाही त्यात अस्मानी संकट या दुहेरी कचाट्यात अडकल्याचे दिसत आहे. राज्यात काल(दि26) औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, नांदेड, पुणे या जिल्हात हलक्या ते जोरदार सरी कोसळल्याने रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कालपासून भुसावळ तालुक्यासह परिसरात धुक्याची चादर पसरली आहे. बदलत्या वातावरणामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे गहू. हरभरा. कांदा यासह केळी उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी थंडी जाणवत असून या बदलत्या वातावरणामुळे रब्बी पिकांवर रोगराई पसरण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा : पुण्यासह, मराठवाड्यात पाऊस धुमाकूळ घालणार, मुंबईत असा आहे अंदाज
दोन दिवसापासून औरंगाबाद मध्ये रात्रीचा पाऊस होत आहे. दोन दिवस फक्त पंधरा ते वीस मिनिटे पाऊस झाला असला तरी या पावसाने मात्र औरंगाबादच्या रस्त्यांचे वास्तव समोर आले आहे. जळगाव मुख्य रस्त्यावरून जिल्हाधिकारी बंगल्याच्या समोरून शहरात जाणाऱ्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून पावसाच्या पाण्याने या खड्ड्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. मुख्य रस्त्यावरून हा रस्ता शहरातील मुख्य बाजारपेठेला मिळतो. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
दरम्यान पुणे जिल्ह्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत आहे. या ढगाळ हवामानाचा विविध पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्यातच जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्यास नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. गेल्या दोन, तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यांत विविध ठिकाणी परतीचा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली असून फळबागांचे मोठे नुकसान झाले.
हे ही वाचा : जानेवारीचा शेवट पावसात जाणार, महाराष्ट्रासह अनेक राज्यात पावसाची शक्यता, imd चा इशारा
या नुकसानीचे नुकतेच पंचनामे झाले असले तरी मदत अद्यापही मिळालेली नाही. सध्या ज्वारी पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी पिकाची वाढ पाण्याअभावी खुंटली आहे. दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. गहू, कांदा पिकांना फटका बसत आहे. गहू पिकांवरही रोगांनी आक्रमण केले आहे.