अहमदनगर, 20 जुलै: सध्याच्या काळात आधुनिक यंत्रसामुग्रीमुळे पारंपरिक शेती अवजारे अडगळीत पडली आहेत. परंतु, याच शेती अवजारे बनवण्याच्या कलेनं आदिवासी महिलेला उद्योजक बनवलंय. अहमदनगरमधील शिला इदे या लाकडापासून बैलगाडीसह पारंपरिक शेती अवजारे बनवत आहेत. या प्रतिकृतींना जगभरातून मागणी असून या उद्योगामुळे अनेकांना रोजगार निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या आकर्षक वस्तूंची भूरळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही असून त्यांनी शिला इदे यांचं कौतुक केलं आहे. अशी सुचली कल्पना अकोले तालुक्यातील मुदखेल या आदिवासी भागात शिला इदे राहतात. उच्च शिक्षित असणाऱ्या शिला यांना नोकरी नव्हती. त्यांचे वडील पारंपरिक शेती अवजारे बनवायचे. मात्र, ट्रॅक्टर आणि आधुनिक यंत्रांमुळे त्यांची मागणी घटली. एकदा त्यांच्या वडिलांनी नातवाला खेळण्यासाठी बैलगाडी बनवून दिली. तेव्हा ही बैलगाडी बघून शिला यांना कल्पना सुचली आणि त्यांनी वडिलांची पारंपरिक कला जतन करत अशाच प्रकारच्या लाकडी वस्तू बनवून विकण्याचा निर्णय घेतला.
वडिलांची कला केली आत्मसात आपल्या वडिलांच्या लाकडी कामाचा वसा घेत शिला इदे यांनी वडिलांची कला आत्मसात केली. वडिलांच्या आणि भावाच्या मदतीने लाकडापासून आकर्षक शोभावस्तू बनविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला कामामध्ये अनेक अडथळे आले. यंत्रांच्या अभावामुळे कामाची गती अतिशय संथ होती. मात्र कामाचा उत्तम दर्जा पाहून एका गृहस्थाने शिला यांना यंत्रांचे सहाय्य केले. इथून पुढे खऱ्या अर्थाने त्यांचा व्यवसायिक प्रवास सुरू झाला. महिला बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती शिला यांनी महिला बचत गटाच्या मार्फत महिलांना एकत्रित केले. लाकडी वस्तू बनवण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती केली. पंचायत समिती मार्फत स्टॉल मिळवले आणि तालुक्यापुरते मर्यादित असणारे काम जगासमोर आणले. आता देश विदेशातून इदे यांनी बनवलेल्या वस्तूंना मागणी आहे. त्यातून गावातील आदिवासी महिला आणि पुरुषांना रोजगार उपलब्ध झाला आहे. Success Story: 23 वर्षांपूर्वीच ओळखलं सेंद्रिय शेतीचं महत्त्व, आज आहे लाखोंची कमाई जगभरातून मागणी अन् लाखोंची उलाढाल शिला इदे यांनी पारंपरिक कलेला व्यावसायिक रूप दिले. गावातील महिला आणि अनुभवी कारागिरांच्या मदतीने त्या बैलगाडी, रणगाडा, पेट्रोल टँक, तोफ या सारख्या शोभेच्या लाकडी वस्तू बनवतात. सार्वजनिक ठिकाणी विक्रीस ठेवलेल्या या वस्तूंना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. तसेच अमेरिका आणि जगभरातील इतर देशांतूनही या वस्तूंना मागणी आहे. त्यामुळे शिला इदे या पारंपरिक कलेतून लाखोंची उलाढाल करत आहेत. त्यांचा हा व्यावसायिक प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.