साहेबराव कोकणे, प्रतिनिधी अहमदनगर, 16 मे : अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा भाजप नेते राम शिंदे आणि विखे पाटील पिता-पुत्रांमधला वाद समोर आला आहे. यावेळी वादाला निमित्त ठरलंय ती जामखेडची बाजार समिती निवडणूक. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीत पक्षाविरोधी काम केल्याचा थेट आरोप राम शिंदेंनी केला आहे. एवढंच नाही तर खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची छुपी युती असल्याचाही आरोप शिंदेंनी केला आहे. या सगळ्याबाबत पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांकडे अहवाल देणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. त्यामुळे येत्या काळात नगरमध्ये शिंदे विरूद्ध विखे असा सामान बघायला मिळणार आहे. जामखेड बाजार समितीच्या सभापतीपद आमच्याकडेचे येईल असा विश्वास होता, मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधात काम केल्याचा आरोप भाजप आमदार राम शिंदे यांनी केला आहे. या गोष्टी वरिष्ठांच्या कानावर घातल्या असून याचा अहवाल वरिष्ठांना दिला जाईल. विधानसभेतही विखेंनी विरोधात काम केलं होतं, आताही विरोधात काम केलं, असल्याचा गौप्यस्फोट राम शिंदे यांनी केला आहे. एवढच नाही तर आमचा पक्ष भाजप आहे, काँग्रेस नाही, असा टोलाही राम शिंदे यांनी लगावला आहे. राज्यात लक्षवेधी ठरलेल्या जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाव्या भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. राष्ट्रवादी आणि भाजप यांना 9-9 अशा समसमान जागा मिळाल्याने या कृषी उत्पन्न बाजार समितीत आणखी चुरस वाढली होती. कुणाचाही सदस्य न फुटल्याने पुन्हा समान सदस्य झाले त्यानंतर ईश्वरचिठ्ठीने भाजपाचा सभापती तर राष्ट्रवादीचे उपसरपंच झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







