अहमदनगर, 17 मार्च : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात (Ahmednagar Civil Hospital) झालेल्या अग्निकांड प्रकरणात राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतलेला जिल्हा शल्य चिकित्सकांच्या निलंबनाचा निर्णय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी रद्द केला आहे. 6 नोव्हेंबर 2021 रोजी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागली होती. या अग्नितांडवात अकरा रुग्णांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात राज्य सरकारने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह इतर तिघांना निलंबित केले होते तर दोन नर्सची सेवा समाप्त केली होती.
आता या प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपला विशेषाधिकार वापरत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचं निलंबन रद्द केलं आहे. डॉक्टर सुनील पोखरणा यांना पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसे आदेश काढण्यात आले आहेत.
वाचा : 125 तासांच स्टिंग ऑपरेशन:पेनड्राईव्ह बॉम्बनंतर प्रवीण चव्हाणांनी घेतला हा निर्णय
काय आहे प्रकरण?
6 नोव्हेंबर 2021 अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागाला आग लागली होती. या दुर्घटनेत अकरा रुग्णांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह सहा जणांवर कारवाई केली होती. तर तोफखाना पोलिस ठाण्यात याप्रकरणी तीन जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये चार आरोपींना अटक केली.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी येथील तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्यात चार जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये एक वैद्यकीय अधिकारी तर तीन परिचारिका यांचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक करण्यात आली आहे. यातील शिंदे आणि पठारे यांना निलंबित करण्यात आले आहे, तर शेख आणि आनंत यांचा सेवा समाप्ती करण्याचा राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचा आदेश आहे.
मृतांच्या नातेवाईकांना मदत
या घटनेत मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून 5 लाख रुपये व राज्य आपत्ती निधीमधून 2 लाख रुपये अशी 7 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली. 11 जणांपैकी मृत्यू झालेल्या एका रुग्णांच्या नातेवाईकास प्रातिनिधिक स्वरूपात दोन लाख रुपयांचा धनादेश तात्काळ वितरित करण्यात आला. उर्वरित रुग्णांच्या नातेवाईकांना दोन दिवसांनी मदतीचा धनादेश दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Fire, Governor bhagat singh, महाराष्ट्र