मुंबई, 20 ऑक्टोबर : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर आलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ओला दुष्काळी जाहीर करण्याची स्थिती अद्याप नाही, असं स्पष्ट केलं आहे. यावेळी ते म्हणाले की, ओला दुष्काळ नसला तरी शेतीचं जे नुकसान झालंय त्याचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे कऱण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. दिवाळीत काही कर्मचारी, अधिकारी सुटीवर असतील, पण पुढील पंधरा दिवसात पंचनाम्याचा अहवाल देतील. त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, असंही ते यावेळी म्हणाले. राज्यात परतीच्या पावसाला सुरूवात झालीये. हवामानतज्ज्ञांच्या माहितीनुसार, यंदा ३-४ ऑक्टोबरपासून परतीच्या पाऊस सुरु झालाय. परतीच्या पावसाचा परिणामही राज्यभरात वेगवेगळ्या भागात दिसू लागलाय. मराठवाड्यात कापूस वेचणीला आला असताना परतीच्या पावसाने तो भिजला आहे तर सोयाबीनला अधिकच्या पावसाने कोंब फुटत आहे. अनेक ठिकाणी भात, उडीद, कांदा सारख्या पिकांना फटका बसतोय. ऊस तोडणीला अडथळे येत आहेतच सोबत चिखल साचल्याने ऊस वाहतूक करणारे वाहन देखील उसाच्या सारीपर्यंत पोहचू शकत नाहीये. ऊस तोडणी लांबणीवर गेली तर उशीर झाल्याने उसाला तुरे येतील आणि उभं पीक वाया जाईल, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. हिंगोली, सातारा, भुसावळ, भंडारा, गोंदिया, येवला, रत्नागिरी, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या भागांतील शेतकरी त्रस्त झाले आहेत. परतीचा पाऊस जाहीर करण्याचे निकष काय? परतीचा पाऊस जाहीर करण्यासाठी आयएमडीतर्फे सध्या वापरले जाणारे निकष २००६ मध्ये स्वीकारले गेले आहेत. पण अलीकडं ऐन पावसाच्या महिन्यातही पाऊस गायब झालेला असतो. त्यामुळं परतीच्या पावसासाठी तयार करण्यात आलेले निकष हे शेवटच्या महिन्यात म्हणजे १ सप्टेंबरनंतर विचारात घेतले जातात. परतीचा पाऊस फक्त नुकसानच करत नाही तर त्याचे फायदे देखील आहेत, जाणून घ्या शेतीतज्ज्ञांकडून…
- एखाद्या भागात सलग पाच दिवस अजिबात पाऊस न होणं
- वातावरणातील अखेरच्या थरात अँटी सायक्लोन स्थिती दिसणं
- हवेतील बाष्प लक्षणीय प्रमाणात कमी होणं अशा निकषांचा त्यात समावेश असतो.
परतीच्या पावसाचे फायदे काय? शेतीतज्ज्ञ उदय देवळाणकर यांच्या माहितीनुसार… १) हा पाऊस पडल्यामुळे किमान १५-२० दिवस जमिनीतून पाण्याचा उपसा होत नाही. त्यामुळे नद्या प्रवाहित राहतात. विहिरीतील पाणी देखील या काळात काढल्या जात नाही. त्यामुळे हे पाणी दीर्घकाळ शेतकऱ्यांना रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी वापरता येऊ शकतं. हा सर्वात मोठा फायदा आहे. २) दुबार पीक घेण्यासाठी परतीचा पाऊस फार मदत करतो. ३) पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करतो. ४) ज्या जलाशयांमध्ये साठा कमी आहे त्या साठ्यांना त्यांच्या क्षमते इतकं पाणी साठवण्यासाठी मदत करतो