मराठी बातम्या /बातम्या /agriculture /परतीचा पाऊस फक्त नुकसानच करत नाही तर त्याचे फायदे देखील आहेत, जाणून घ्या शेतीतज्ज्ञांकडून...

परतीचा पाऊस फक्त नुकसानच करत नाही तर त्याचे फायदे देखील आहेत, जाणून घ्या शेतीतज्ज्ञांकडून...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 14 ऑक्टोबर : राज्यात परतीच्या पावसाला सुरूवात झालीये. हवामानतज्ज्ञांच्या माहितीनुसार, यंदा ३-४ ऑक्टोबरपासून परतीच्या पाऊस सुरु झालाय. परतीच्या पावसाचा परिणामही राज्यभरात वेगवेगळ्या भागात दिसू लागलाय. मराठवाड्यात कापूस वेचणीला आला असताना परतीच्या पावसाने तो भिजला आहे तर सोयाबीनला अधिकच्या पावसाने कोंब फुटत आहे. अनेक ठिकाणी भात, उडीद, कांदा सारख्या पिकांना फटका बसतोय. ऊस तोडणीला अडथळे येत आहेतच सोबत चिखल साचल्याने ऊस वाहतूक करणारे वाहन देखील उसाच्या सारीपर्यंत पोहचू शकत नाहीये. ऊस तोडणी लांबणीवर गेली तर उशीर झाल्याने उसाला तुरे येतील आणि उभं पीक वाया जाईल, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. हिंगोली, सातारा, भुसावळ, भंडारा, गोंदिया, येवला, रत्नागिरी, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या भागांतील शेतकरी त्रस्त झाले आहेत.

मात्र हा परतीचा पाऊस असतो काय? त्याने केवळ नुकसानच होतं की त्याचे काही फायदे देखील होतात? परतीच्या पावसाचा फायदा कसा करून घ्यायचा? जाऊन घेऊया...

परतीचा पाऊस म्हणजे काय?

हवामानतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान आणि पाकिस्तानच्या सीमेवर अँटी सायक्लॉन तयार होतात. अँटी सायक्लॉन म्हणजे जास्त दाबाचं क्षेत्र तयार होणं. जास्त दाबाचं क्षेत्र तयार झालं की हवा समुद्राच्या दिशेने फेकली जाते. मात्र ही प्रक्रिया हळुवार टप्याटप्याने होत असते. म्हणून सुरुवातीला मान्सूनचा परतीचा प्रवास हा राजस्थानपासून सुरु होतो, नंतर गुजरातला येतो आणि त्यानंतर महाराष्ट्राकडे येतो. सध्या गेल्या ८-९ दिवसांपासून महाराष्ट्राच्या सीमेवर तो आहे. अशात जे मॉइश्चर समुद्राकडून आपल्याकडे येतं त्याला पुढे जायला जागा नसल्याने त्यावर प्रेशर तयार होतं आणि पाऊस पडतो. राजस्थानकडून येणारा पाऊस समुद्राच्या मॉईश्चरमुळे पुढे जाऊ शकत नाही आणि तो महाराष्ट्रात पडतो, त्याला परतीचा पाऊस म्हणतात.

Monsoon Return Rain : हुश्श् मान्सूनच्या परतीची एकदाची तारीख ठरली… पुढच्या दोन दिवसांत पाऊस थांबणार

परतीचा पाऊस जाहीर करण्याचे निकष काय?

परतीचा पाऊस जाहीर करण्यासाठी आयएमडीतर्फे सध्या वापरले जाणारे निकष २००६ मध्ये स्वीकारले गेले आहेत. पण अलीकडं ऐन पावसाच्या महिन्यातही पाऊस गायब झालेला असतो. त्यामुळं परतीच्या पावसासाठी तयार करण्यात आलेले निकष हे शेवटच्या महिन्यात म्हणजे १ सप्टेंबरनंतर विचारात घेतले जातात.

  • एखाद्या भागात सलग पाच दिवस अजिबात पाऊस न होणं
  • वातावरणातील अखेरच्या थरात अँटी सायक्लोन स्थिती दिसणं
  • हवेतील बाष्प लक्षणीय प्रमाणात कमी होणं अशा निकषांचा त्यात समावेश असतो.

परतीच्या पावसाचे फायदे काय?

शेतीतज्ज्ञ उदय देवळाणकर यांच्या माहितीनुसार...

१) हा पाऊस पडल्यामुळे किमान १५-२० दिवस जमिनीतून पाण्याचा उपसा होत नाही. त्यामुळे नद्या प्रवाहित राहतात. विहिरीतील पाणी देखील या काळात काढल्या जात नाही. त्यामुळे हे पाणी दीर्घकाळ शेतकऱ्यांना रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी वापरता येऊ शकतं. हा सर्वात मोठा फायदा आहे.

२) दुबार पीक घेण्यासाठी परतीचा पाऊस फार मदत करतो.

३) पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करतो.

४) ज्या जलाशयांमध्ये साठा कमी आहे त्या साठ्यांना त्यांच्या क्षमते इतकं पाणी साठवण्यासाठी मदत करतो.

'खर्च करूनही मुलांना नोकरी मिळणार नाही', चिठ्ठीत मराठा आरक्षणाचा उल्लेख करत शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल

परतीच्या पावसाने होणारं नुकसान टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?

शेतीतज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, ज्या ठिकाणी नवीन हायवेज तयार झाले आहेत, नवीन रस्ते तयार झाले आहेत तिथे नुकसान होण्याचं प्रमाण जास्त आहे. कारण पाण्याचा निचरा करण्याची नैसर्गिक व्यवस्था तिथे नसते. दुष्काळानंतर शेतकऱ्यांनी देखील शेतातील पाणी बाहेर काढणं बऱ्याच ठिकाणी बंद केलं आहे. अशा स्थितीत वेगाने शेतातील पाणी काढून देण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. अंडरग्राऊंड ड्रेनेज तयार करायला हवे.

परतीच्या पावसाचा फायदा कसा करून घ्यावा?

  • जिथे प्रवाहित झालेले नाले, ओढे आहेत तिथे वनराई बंधारे बांधावे. म्हणजे रिकाम्या सिमेंटच्या गोण्यांमध्ये वाळू भरून ठेवू शकतो, जेणेकरून पाणी त्यात साचून राहील.
  • विहिरीचं पुनर्भरण करून घेऊ शकतो.
  • शेततळी बांधून घेऊन ती पूर्णपणे भरून घेता येऊ शकतात.

First published:

Tags: Agriculture, Farmer, Maharashtra rain updates, Monsoon, Rain