वेगवान घडामोडी : राज ठाकरेंनंतर काँग्रेस नेत्यानेही लिहीलं मुख्यमंत्र्यांना पत्र

वेगवान घडामोडी : राज ठाकरेंनंतर काँग्रेस नेत्यानेही लिहीलं मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी पाठिंबा देऊन आज याबाबत मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं आहे.

  • Share this:

तुषार कोहळे, नागपूर, 7 मार्च : काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून (Congress leader Ashish Deshmukh wrote a letter to CM Uddhav Thackeray) आपण कबूल केल्यानुसार नाणार रिफायनरी प्रकल्प विदर्भात स्थलांतरित करण्याची आठवण करून दिली आहे.

'3 लाख कोटीच्या या प्रकल्पातून विदर्भातील 40 ते 45 हजार युवकांना प्रत्यक्ष रोजगार व 1 लाख युवकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. केंद्र व राज्य शासनस्तरावर पुढाकार घेऊन आपण विदर्भात हा प्रकल्प आणावा व रोजगार निर्मिती करावी तसेच वैदर्भीय युवकांचे भविष्य उज्ज्वल करावे, अशी विनंती मी आपणास या पत्राद्वारे पुन्हा एकदा करत आहे आणि म्हणूनच हे स्मरणपत्र आपल्याला पाठवत आहे,' असं आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या पत्रानंतर काँग्रेस नेत्याचंही पत्र, मुख्यमंत्र्यांना नेमकं काय म्हणाले आशिष देशमुख?

"कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा देऊन आज याबाबत आपल्याला एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात राज ठाकरे यांनी 'कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर हा रिफायनरी प्रकल्प हातातून गमावणं महाराष्ट्राला परवडणार नाही. महाराष्ट्र राज्याचं दीर्घकालीन हित लक्षात घेऊन या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी', असे त्या पत्रात म्हटले आहे.

रत्नागिरीच्या नाणार येथील 3 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प विदर्भात हलवा, अशा मागणीचे निवेदन मी आपण मुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी (दि. 29 नोव्हेंबर 2019 ला) भेटून आपल्याला दिले होते. त्याआधी अशा आशयाचे एक निवेदन मी आधी आपल्याला 8 मार्च 2018 ला दिले होते. त्यानंतर 23 एप्रिल 2018 ला आपण माझ्या मागणीनुसार हा प्रकल्प विदर्भात हलविण्यास सहमती दर्शविली होती. आपल्या व्यक्तिगत भेटीत आणि जाहीर सभेतसुद्धा आपण हा प्रकल्प विदर्भात नक्कीच स्थलांतरित करू, असे आश्वासन वारंवार दिले होते, हे विशेष.

हेही वाचा - राष्ट्रवादीच्या नेत्याला राज ठाकरेंची काळजी; खुलं पत्र लिहून केलं आवाहन

रत्नागिरीच्या नाणार येथे प्रस्तावित रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पाला शिवसेनेचा व स्थानिक लोकांचा विरोध आहे. हा प्रकल्प विदर्भात आल्यास उद्योगधंद्यांना एक नवी गती मिळेल तसेच रोजगार निर्मितीला चालना मिळेल. विदर्भातील मागास जिल्ह्यांमध्ये नवे उद्योगधंदे येण्यास व विदर्भाचा विकास होण्यास पूरक वातावरण निर्माण होईल तसेच कृषी आधारित प्रकल्पांना नव्या संधी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यास मदत होईल. शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळेल. लगतच्या 5 राज्यांना या प्रकल्पामुळे फायदा होईल.

पानिपत, भटिंडा, दिल्ली, बिना, गोवाहाटी इत्यादी ठिकाणी इनलँड रिफायनरी प्रकल्प आहेत. या सर्व रिफायनरीज समुद्री बंदरांशी पाईपलाईनने जोडल्या आहेत. विदर्भातील रिफायनरीसुध्दा अशाप्रकारे मुंबई बंदराशी पाईपलाईनने जोडणे शक्य आहे. ही पाईपलाईन समृध्दी महामार्गाच्या बाजुला उभारता येईल. या तत्वावर आपल्या सहमतीने विदर्भात हा प्रकल्प सुरु करण्यात काहीच अडचण नाही. सिमेंटसाठी लागणारा पेटकोक, सिंथेटिक यार्न व डांबर निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल या प्रकल्पातून उपलब्ध होणार आहे.

पेट्रोल/डिझेल, एलपीजी गॅस व विमानाचे इंधन (एटीएफ) मुंबईहून रेल्वेद्वारे विदर्भात येते. याचा वाहतूक खर्च लिटरला चार रुपये पडतो. त्यामुळे विदर्भात या इंधनाच्या किंमती देशात सर्वाधिक आहेत.

विदर्भात दरवर्षी 12 कोटी लिटर इंधने लागतात. विदर्भात रिफायनरी आली तर वाहतुकीवर होणारा 48000 कोटी रुपयांचा खर्च वाचेल व ही इंधनेही स्वस्त होतील. हे स्वस्त पेट्रोल, डिझेल विदर्भानजीकच्या मध्य भारतातील 15 सिमेंट कारखान्यांना पुरवता येईल. याशिवाय नागपूर, जबलपूर व रायपूर हे तिन्ही विमानतळ या रिफायनरीशी पाईपलाईनद्वारे जोडता येतील व त्यांना स्वस्त एटीएफ पुरवता येईल. त्यामुळे विमान वाहतुकीला बळ मिळेल. विदर्भातील या रिफायनरीतून बहुमोल पेट्रो-केमिकल्सही मिळतील व त्यावर पक्रिया करणारे उद्योग विदर्भात येतील व रोजगार उपलब्ध होतील. वाहतूक खर्च खूपच कमी होईल.

सध्या भारतातील सर्व रिफायनरीजची क्षमता 245 दशलक्ष टन आहे. 2030 पर्यत ही क्षमता 439 दशलक्ष टनापर्यंत वाढणार आहे. त्यामुळे नव्या रिफायनरीज उभ्या करणे क्रमप्राप्त आहे. त्यापैकी एक रिफायनरी सरकारने विकासाच्या दृष्टीने विदर्भात उभारणे गरजेचे आहे. ही रिफायनरी विदर्भात आली तर औद्योगिक प्रगती साधण्यासोबतच रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होतील.

3 लाख कोटीच्या या प्रकल्पातून विदर्भातील 40 ते 45 हजार युवकांना प्रत्यक्ष रोजगार व 1 लाख युवकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. केंद्र व राज्य शासनस्तरावर पुढाकार घेऊन आपण विदर्भात हा प्रकल्प आणावा व रोजगार निर्मिती करावी तसेच वैदर्भीय युवकांचे भविष्य उज्ज्वल करावे, अशी विनंती मी आपणास या पत्राद्वारे पुन्हा एकदा करीत आहे आणि म्हणूनच हे स्मरणपत्र आपल्याला पाठवत आहे."

Published by: Akshay Shitole
First published: March 7, 2021, 5:01 PM IST

ताज्या बातम्या