नागपूर, 5 जून : कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेकांना मोठ्या वेदनांचा सामना करावा लागला. कामानिमित्त बाहेर पडलेले काहीजण तसेच घरापासून दूर अडकून पडले. मात्र काही लोकांच्या आयुष्यात हाच लॉकडाऊन आनंदही घेऊन आला. कामाच्या धबडग्यात कधी नव्हे ते या लॉकडाऊनमुळे काही जण आपल्या कुटुंबाला वेळ देऊ लागले. मात्र कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवत असतानाच एका व्यक्तीवर दु:खाचा डोंगर कोसळला.
मूळचे उत्तर प्रदेशातील असलेले नफीस अली हे नागपुरातील एका खासगी कंपनीत काम करतात. लॉकडाऊनच्या आधीच ते उत्तर प्रदेशातील आपल्या गावी गेले आणि लॉकडाऊनमध्ये प्रवासाचे सर्व मार्ग बंद झाल्याने ते तिथेच थांबले. मात्र आपल्या लाडक्या चिमुकल्यासोबत सुखाचे चार क्षण घालवत असताना एक दुर्घटना घडली. नफीस अली यांचा 2 वर्षीय मुलगा गच्चीवरून खाली पडला आणि त्याला मोठी दुखापत झाली.
नफीस अली यांनी तातडीने त्यांच्या मुलाला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. तेथून नंतर त्याला हरियाणातील एका रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र तिथंही त्याला दिल्लीला नेण्याचा सल्ला देण्यात आला. आधीच कोरोनामुळे चिंतेची स्थिती आणि त्यात रात्रही झाली होती. त्यामुळे मुलाला दिल्लीतील रुग्णालयात घेतील की नाही, याची चिंता नफीस अली यांना लागली. यातच अली यांनी नागपुरात ते ज्या कंपनीत काम करतात, तेथील मालक गणेश तिवारी यांना फोन केला.
हेही वाचा - बच्चू कडू संतापले! म्हणाले, शेतकऱ्याला आत्महत्तेस प्रवृत्त करणाऱ्या सावकाराची होणार चौकशी
गणेश तिवारी यांनी नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते गौरांग पांडे यांच्याकडे काही मदत होईल का, याबाबत विचारणा केली. त्यानंतर पांडे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यलयाशी संपर्क साधला आणि तिथूनच चक्र फिरली. नितीन गडकरी यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात फोन फिरवला आणि नफीस अली यांच्याबाबत माहिती दिली. त्यानंतर नफीस अली यांनी तात्काळ दिल्ली गाठली आणि त्यांच्या मुलावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू झाले. सध्या अली यांच्या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून तो धोक्याच्या बाहेर आहे.
दरम्यान, संकटाच्या काळात नितीन गडकरी यांनी केलेल्या एका फोनमुळे नफीस अली यांनी सुटकेचा निश्वास टाकला. तसंच थँक्यू गडकरीजी असं म्हणत अली यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. याबाबत 'लोकमत'ने वृत्त दिलं आहे.
संकलन, संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nagpur, Nitin gadkari