महाड, 31 जुलै: गेल्या आठवड्यात 22 आणि 23 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy rainfall) महाडसह (Mahad) संपूर्ण कोकणात अनेक ठिकाणी महापूर (Flood) आला होता. या महापुरानं परिसरात राहणाऱ्या लाखो नागरिकांचं प्रचंड आर्थिक नुकसान केलं आहे. यामध्ये 200 हून अधिक जणांनी आपले प्राणही गमावले (Deaths in Flood) आहेत. अनेकांच्या डोक्यावर राहायला छप्पर देखील उरलं नाही. आता कुठे पुरस्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे. पुरस्थिती नियंत्रणात येत असली तरी, आता महाड परिसरात एका वेगळ्या संकटानं डोकं वर काढलं आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गासोबतच महाडमध्ये विविध साथीच्या रोगांनी प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे. महापूर ओसरल्यानंतर महाडमध्ये 15 जणांना लेप्टो स्पायरेसीस (Leptospirosis) या साथीच्या रोगाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे पुरग्रस्त भागात राहणाऱ्या नागरिकांनी त्वरित आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा-MSRTC चा निर्णय; कोरोना रोखण्यासाठी ST बसवर अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग
खरंतर, अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे मानवी वस्तीत घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. अनेक ठिकाणी एक ते दीड फुटांपर्यंत चिखलाचा थर जमा झाला आहे. तसेच कुजलेलं धान्य, शेकडो मृत्यूमुखी पडलेली जनावरं यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीती अगोदरच आरोग्य प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली होती. अशातच लेप्टो स्पायरेसीस या साथीच्या रोगाचे 15 रुग्ण आढळल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे येत्या काळात प्रशासनाची आणखी डोकेदुखी वाढणार आहे.
हेही वाचा-कांजण्याप्रमाणेच पसरतोय डेल्टाचा संसर्ग, लसीकरण झालेल्या लोकांनाही धोका?
याच पार्श्वभूमीवर महाडमध्ये 11 ठिकाणी तर पोलादपूर येथे दोन ठिकाणी आरोग्य तपासणीचे काम सुरू करण्यात आलं आहे. या ठिकाणी डेंग्यू, मलेरिया, लेप्टो स्पायरेसीस, कावीळ आणि कोरोना तसेच इतर जलजन्य आजारांची तपासणी केली जात आहे. यासाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पुणे महानगर पालिकांची आरोग्य पथकं याठिकाणी काम करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.