अहमदनगर, 18 जानेवारी : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Gram panchayat 2021 ) मतमोजणी सुरू झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या आदर्श गाव हिवरे बाजार मध्येही प्रथमच 30 वर्षानंतर निवडणूक पार पडली आहे. आणि अपेक्षेप्रमाणे पोपटराव पवार यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे.
आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आहे. तब्बल 30 वर्षांनंतर गावात निवडणूक झाली. पोपटराव पवार यांचा आदर्श ग्राम विकास पॅनलने विजय मिळवला आहे. 7 पैकी 5 जागांवर आदर्श ग्राम विकास पॅनलने विजय मिळवला आहे. त्यामुळे पोपटराव पवार यांचा निवडून आल्यानंतर सरपंचपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
हिवरेबाजार गावातील वार्ड क्रमांक 1 मधून विठ्ठल ठानगे, मीना गुंजाळ, सुरेखा पादिर आदी उमेदवार विजयी झाले आहे. तर वार्ड क्रमांक 2 मधून रोहिदास पादिर,रंजना पवार हे विजयी झाले आहे.
हिवरेबाजारमध्ये आतापर्यंत बिनविरोध निवडणुकीची प्रथा होती. त्यामुळे गेल्या 30 वर्षापासून इथं निवडणूक झालीच नाही. अनेक वर्ष दडपशाही करून निवडणुका होऊन दिल्या नाही असा आरोप झाले होते. त्यामुळे पहिल्यांदाच निवडणूक घेण्यात आली.
लोकशाहीत निवडणुका होणे अपेक्षित आहे. त्यामुळे लोकशाहीचा पाया मजबूत होत असतो, असे मत पोपटराव पवार यांनी व्यक्त केले होते. अखेर, आदर्श अशा गावात निवडणूक झाली आणि विजयाचा गुलाल पहिल्यांदा उधळला गेला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात एकूण 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये काही निवडणुका बिनविरोध झाल्यानं आज 12 हजार 711 ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी होत आहे. गावपातळीवरील निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे मतदार नेमका कुणाला कौल देणार हे पाहणं महत्वाचं आणि औत्सुक्याचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gram panchayat, अहमदनगर