पंढरपूर, 16 फेब्रुवारी : वेधला जीव माझा भेटवा श्रीरंग। सर्व सांडियेला मोह ममता संग। जीवी जिवलग झाला अनंग। भेटवा भेटवा मज श्रीरंग। पुंडलिका सारख्या भक्ताला दर्शन देण्यासाठी गेली अठ्ठावीस युगे विटेवर उभ्या असलेल्या आपल्या विठूरायाने अशाच एका भक्तांची दर्शनाची इच्छा पूर्ण केल्यानंतर समस्त विठ्ठल भक्तांना आनंद झाल्याचे दिसून येत आहे. सोलापूर येथील होमकर कुटुंबातील तरुण डॉ. राजाराम ज्ञानेश्वर होमकर यांना अल्झायमर नावाचा दुर्दम्य आजार झाला आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून त्यांच्या शरीराचा कोणताही अवयव हालचाल करू शकत नसल्याने ते संपूर्णपणे झोपून आहेत. गेल्या काही दिवसांपासून विठ्ठल दर्शनाची इच्छा ते आपल्या कुटुंबीयांना बोलून दाखवत होते. सोमवारी दुपारी होमकर कुटुंब आणि त्यांचे डॉक्टर मित्र रुग्णवाहिकेतून या विठ्ठल भक्ताला स्ट्रेचरवर झोपवून पंढरपुरात आणले. अवयवांची हालचाल नसल्याने त्यांना व्हील चेअरमधून मंदिरात नेणे कठीण होते. पण मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी भक्ताची आणि देवाची भेट घडावी यासाठी स्ट्रेचरसह त्यांना विठ्ठलाचे दर्शन घेण्यास मदत केली. देवाच्या पोशाखाची वेळ झाल्याने दर्शन रांग बंद झाली होती. या असहाय्य तरूणाची दुर्दम्य इच्छाशक्ती पाहून जोशी यांनी मंदिराच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना विठ्ठलासमोर नेले आणि देवाला त्याच्या एका अनोख्या भक्ताची भेट झाली. देवाच्या दर्शनानंतर आपली इच्छा पूर्ण झाल्याचे आनंदाश्रू डॉ. राजाराम यांच्या डोळ्यात होते. कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी डॉ.होमकर कुटुंबीयांना विश्वास दाखवला की, प्रयत्न चालू ठेवले तर एक दिवस स्टेरचरवर आलेले तरूण डॉ चालत येतील तेंव्हा त्यांच्या आशा पल्लवित झाल्याचे व ते आनंदात परतले आणि परत एकदा प्रचिती आली’ विठ्ठल नाथ विटपर खडे कटपर दोन्हो हात ,जब भक्तो को मदत पडे तो दौडे रातोरात". कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या रूपाने विठूरायाच त्या तरुण डॉ.होमकर या भक्तासाठी धावला आणखीन काय?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.