• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 12 वर्षांच्या चिमुरडीची कमाल; आजीचं सोनं पळवणाऱ्या काळे-चव्हाण गँगच्या सराईत चोराला पकडलं

12 वर्षांच्या चिमुरडीची कमाल; आजीचं सोनं पळवणाऱ्या काळे-चव्हाण गँगच्या सराईत चोराला पकडलं

अटक केलेल्या आरोपीवर महाराष्ट्राच्या विविध भागात 50 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितले.

  • Share this:
उल्हासनगर, 28 जून : उल्हासनगर शहरात सध्या बारा वर्षाच्या चिमुरडीच्या धाडसाचं कौतुक केले जातं आहे. या चिमुरडीने आपल्या आजीचं चार तोळं सोने घेऊन पळणाऱ्या काळे चव्हाण गँगच्या एका सराईत चोरट्याला पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी वैशाली पाटणे या आपली नात शुभ्रा सोबत कॅम्पनंबर चार भागात व्हिनस चौक परिसरात सफरचंद खरेदीसाठी आल्या होत्या. त्याच वेळी एक व्यक्ती त्यांचा पाठलाग करत होती. संधी साधत त्याने या दोघींना अडवलं आणि आमच्या शेठला मुलगा झाल्याने तो साडी, चप्पल आणि पैसे वाटत असल्याची बतावणी केली. तो त्यांना एका गल्लीत घेऊन गेला. दरम्यान वयोवृद्ध वैशाली यांच्या अंगावरील तीन तोळ्याचे गंठण आणि एक तोळ्यांच्या अंगठी होती, ते काढून पिशवीत ठेवा असे सांगितले. यावेळी संधी साधत त्याने आणि त्याच्या सोबत असलेल्या एका साथीदाराने आजीच्या हातातील पिशवी हिसकावली आणि पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बारा वर्षाच्या शुभ्राने चोरट्याचा पाठलाग केला. पळ काढण्यासाठी रिक्षात बसलेल्या त्या चोरट्यांना बाहेर खेचले. इतरांच्या मदतीने तिने आरोपींना गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या स्वाधीन केले. हे ही वाचा-तिनं' वडिलांच्या खांद्यावर बघितला होता आईचा मृतदेह; जिद्दीनं केलं 'हे' काम यात त्यांचा एक साथीदार पळून गेला. दरम्यान विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपी गोविंद काळे याला अटक केली असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या  आरोपीवर महाराष्ट्राच्या विविध भागात 50 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितले. तसेच ही काळे चव्हाण टोळीतील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान शुभ्राच्या या धाडसाचं उल्हासनगर शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान शहरातील प्रत्येक नागरिकाने विशेषतः महिलांनी महागड्या सोन्याच्या वस्तू वापरत असताना सतर्क राहून अशाप्रकारे बतावणी करून लुटणाऱ्या टोळी पासून सावध राहण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी केले आहे.
Published by:Meenal Gangurde
First published: