मुंबई, 23 मे : जगातलं सर्वांत उंच शिखर म्हणून ओळखलं जाणारं एव्हरेस्ट (Everest) हे प्रत्येक गिर्यारोहकला नेहमीच खुणावत असतं. एव्हरेस्ट सर करणं आव्हानात्मक आणि अवघड मानलं जातं. हे शिखर एकदा तरी सर करावं अशी प्रत्येक गिर्यारोहांची इच्छा असते. प्रत्यक्षतात त्यामधील काही जणांचीच ही इच्छा पूर्ण होते. मुंबईच्या ऱ्हिदम मामानिया (Rhythm Mamania) या मुलीनं वयाच्या 10 व्या वर्षीच एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सर्वात तरूण भारतीय ‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई येथील ऱ्हिदम मामानिया या 10 वर्षांच्या मुलीनं या महिन्याच्या सुरुवातीला एव्हरेस्ट बेस कॅम्पवर यशस्वी चढाई केली. या चित्तथरारक कामगिरीमुळे तिचं नाव सर्वांत तरुण भारतीय गिर्यारोहकांच्या यादीत समाविष्ट झालं आहे. ऱ्हिदम मुंबईतील वांद्रे उपनगरातील एमईटी ऋषिकुल विद्यालयात प्राथमिक शिक्षण घेत आहे. उंच पर्वत, कठीण चढणी, तीव्र उतार, हिमवर्षाव आणि अगदी उणे 10 अंश सेल्सिअस तापमान अशी प्रतिकूल परिस्थिती असतानाही, ऱ्हिदमने प्रबळ आत्मविश्वासाच्या जोरावर बेस कॅम्प सर करत हे यश मिळवलं आहे. ऱ्हिदमनं यापूर्वी सह्याद्रीच्या (Sahyadri) पर्वतरांगांमधील कर्नाळा, लोहगड आणि माहुली किल्ल्यांसह अनेक शिखरं सर केली आहेत. बेस कॅम्पइतकी आव्हानं या गिर्यारोहणात नसली तरी ऱ्हिदमने अनेक आव्हानांना तोंड देत 8 ते 9 तास पायी प्रवास केला आधी केला होता. नेपाळमधल्या (Nepal) काठमांडू येथील सातोरी अॅडव्हेंचर्स या ट्रॅव्हल एजन्सीनं आयोजित केलेल्या टूरच्या माध्यमातून ऱ्हिदम तिचे आई-वडील उर्मी आणि हर्ष यांच्यासोबत एव्हरेस्ट बेस कॅम्पवर गेली होती. ऱ्हिदमने 25 एप्रिलपासून मोहिमेला सुरुवात केली. 6 मे रोजी समुद्रसपाटीपासून 5364 मीटर उंचीवर असलेल्या नेपाळमधल्या दक्षिण बेस कॅम्पवर ती पोहोचली. 11 दिवस चाललेल्या या मोहिमेसाठी तिनं प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि अखेरीस प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ती 6 मे रोजी दुपारी 1 च्या सुमारास एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचली. जपानी मुलाला हिंदीत बोलताना पाहून पंतप्रधान थक्क; विचारला हा प्रश्न एव्हरेस्टवर सापडलं ध्येय बेस कॅम्पवर पोहोचल्यावर ऱ्हिदम काही क्षण निःशब्द झाली होती. ‘मला स्केटिंगसोबतच ट्रेकिंग खूप आवडतं. एक जबाबदार ट्रेकर होणं आणि माउंटन वेस्ट मॅनेजमेंटची समस्या सोडवणं किती महत्त्वाचं आहे हे या ट्रेकनं मला शिकवलं,‘अशी प्रतिक्रिया तिनं दिली आहे. ऱ्हिदमच्या या यशाबाबत तिची आई उर्मी म्हणाल्या की, ‘पाच वर्षांपूर्वी तिला गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. तिनं पहिला प्रदीर्घ ट्रेक दूधसागर येथे पूर्ण केला. या ट्रेकदरम्यान तिनं 21 किलोमीटर पायी प्रवास केला होता. एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोहोचल्यानंतर, ग्रुपमधल्या अन्य सदस्यांनी परतण्यासाठी हेलिकॉप्टरची सोय करण्याचं ठरवलं. पण ऱ्हिदमने बेस कॅम्पवरून चालत खाली उतरण्याचा आग्रह धरला. त्यामुळे आम्ही चौघांनी चालत उतरण्याचं ठरवलं,’ असा अनुभव त्यांनी सांगितला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.