नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि मन आनंदित राहण्यासाठी योगासनं (Yoga) करणं अत्यंत गरजेचं आहे; पण यासाठी कठीण योगासनंच करावीत, असा काही नियम नाही. कोणताही अवघड योगाभ्यास करण्यापूर्वी छोटी, सोपी योगासनं करणं अत्यंत आवश्यक आहे. रोज योगासनं केल्याने शरीर तंदुरुस्त राहतं आणि आरोग्याला (Health) फायदा होतो. योगासनांमुळे शरीराची ताकद (Strength) आणि लवचिकताही (Flexibility) वाढते. तसंच मानसिक आरोग्यही चांगलं राहायला मदत मिळते. योग प्रशिक्षक सविता यादव यांनी आपल्या आरोग्याची काळजी काही आसनांद्वारे कशी घ्यावी, हे न्यूज 18च्या लाइव्ह योग सत्रात सांगितलं. त्यानुसार कपालभाती (Kapalbhati) आणि वज्रासन (Vajrasana) करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.
कपालभाती फारच फायदेशीर आहे. यात उच्छावासाद्वारे आपल्या शरीरातली विषद्रव्यं बाहेर टाकली जातात. कपालभातीच्या नियमित सरावाने आपली बुद्धी तल्लख होते आणि मेंदूचं कार्य सुरळीत चालते. याचे इतरही अनेक फायदे आहेत. लिव्हर, किडनी आणि गॅसेसच्या समस्येवर हे कपालभाती खूप फायदेशीर आहे.
कपालभाती करण्यासाठी पाठीचा कणा सरळ ठेवून ध्यानात, सुखासनात किंवा एखाद्या खुर्चीत बसावं. यानंतर, आपल्या पूर्ण क्षमतेने दीर्घ श्वास घेऊन छाती फुगवावी आणि यानंतर नाकाच्या दोन्ही नाकपुड्यांमधून शक्य तितक्या वेगाने श्वास सोडाावा. श्वास सोडताना पोट आतल्या बाजूला ओढावं. यानंतर लगेचच पुन्हा श्वास घ्या आणि पोट शक्य तेवढं बाहेर येऊ द्या. हे करताना श्वास एका झटक्यातच पूर्ण बाहेर आला पाहिजे, हे लक्षात घ्यावं. पोटदुखी, गॅस किंवा अॅसिडिटीची समस्या सुरू असल्यास त्या वेळी कपालभाती करू नये. मासिक पाळीदरम्यान महिलांनी कपालभाती अजिबात करू नये. तसंच उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी कपालभाती करणं टाळावं.
वज्रासन
जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर योगासनं करू नये, असं म्हटलं जातं; मात्र ‘वज्रासन’ (Vajrasana) हे एक आसन असं आहे, जे तुम्ही जेवणानंतर लगेचच करू शकता. यामुळे अन्नाचं पचन सहजरीत्या होण्यास मदत होते. वज्रासन केल्याने शरीर मजबूत आणि स्थिर होते. वज्रासनाचा आणखी एक फायदा म्हणजे, शरीरातलं रक्ताभिसरण व्यवस्थित होतं. तसंच पायांचे स्नायू मजबूत होतात. यासोबतच गॅसेस आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होऊ शकते. हे आसन मासिक पाळीच्या वेळीही स्त्रिया करू शकतात.
हे वाचा - गावातील पुरुषासोबत पळून गेली अल्पवयीन मुलगी, गावकऱ्यांनी मुंडण करत काढली धिंड
‘वज्रासन’ (Vajrasana) करण्यासाठी जमिनीवर आरामदायी स्थितीमध्ये बसावं. यानंतर दोन्ही पाय एकमेकांजवळ ठेवून पाय पसरून बसावं. यानंतर, आपले नितंब (Hip) पायांच्या तळव्यावर ठेवावेत आणि आपले हात गुडघ्यांवर ठेवावेत. या वेळी पाठ सरळ ठेवावी.
हे वाचा - Twins Island : या गावात सर्वत्र दिसतात जुळी मुलं, माणसं; रहस्यामागील कारण कोणालाच माहीत नाही
योगाभ्यास करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. योगासन करताना दुखापत होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसंच व्यायामाशी संबंधित सूचना लक्षात ठेवणंही गरजेचं आहे. यासोबतच योग्य प्रमाणात आहार घेणंही आवश्यक आहे. लहान-लहान योगासनं करून तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी सहज घेऊ शकता. नियमित योगासनं व प्राणायाम केला तर शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Yoga