वॉशिंग्टन, 09 मार्च : 2 महिन्यांपूर्वी एका रुग्णाने जगातील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या रुग्णाच्या शरीरात चक्क एका डुकराचं हृदय धडधडलं. हार्ट फेल झालेल्या या रुग्णावर डुकराच्या हृदयाचं यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आलं (Pig Heart Transplant) . एका प्राण्याचं शरीर मानवी शरीरात प्रत्यारोपित केल्यानंतर दोन महिन्यांनी आता धक्कादायक बातमी आली आहे. या रुग्णाचा आता मृत्यू झाला आहे (World first pig heart transplant patient died). 57 वर्षीय डेव्हिड बेनेट (David Bennett) या रुग्णाच्या शरीरातील हृदयाने काम करणं बंद केलं होतं. त्याला डुकराचं हृदय देण्यात आलं. दोन महिने त्याच्या शरीरात हे हृदय धडधडत होतं. हा रुग्ण रुग्णालयातच डॉक्टरांच्या देखरेखीत होता. पण काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडत गेली आणि त्याचा मृत्यू झाला. बुधवारी त्या रुग्णाने अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती मेरिलँड हॉस्पिटलच्या (Maryland hospital) डॉक्टरांनी दिली आहे, असं वृत्त रॉयटर्स ने दिलं आहे. त्याचा मृत्यूचं नेमकं कारण डॉक्टरांनी सांगितलं नाही आहे. हे वाचा - No Covid: काही व्यक्तींना Coronavirus ने काहीच केलं नाही; काय होतं नेमकं रसायन? त्यांच्या मुलाने त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शेवटपर्यंत केलेल्या प्रयत्नाचं कौतुक केलं आहे. मानवी शरीरात डुकराच्या हृदयाचं प्रत्यारोपण करणं यामुळे भविष्यासाठी मोठा आशेचा किरण निर्माण झाला आहे आणि जगभरातील गरजूंसाठी असलेली अवयवांची कमतरता संपेल असा विश्वास त्यांनी केला आहे. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी ही नवी सुरुवात आहे, शेवट नाही, असं ते म्हणाले. शास्त्रज्ञांनी डुकरांच्या अवयवाचा मानवी शरीरात कशा पद्धतीने वापर करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी बरेच परिश्रम घेतले. नवीन जनुक संपादन आणि क्लोनिंग तंत्रज्ञानाद्वारे गेल्या दशकात संशोधनाला वेग आला आहे. न्यू यॉर्कमधील शल्यचिकित्सकांनी ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीच्या शरीरात डुकराच्या मूत्रपिंडाचे यशस्वीरित्या प्रत्यारोपण केल्यानंतर काही महिन्यांनी हे हृदय प्रत्यारोपण करण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.