मुंबई 21 नोव्हेंबर : दमा म्हणजेच अस्थमा ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये व्यक्तीची श्वसननलिका सुजते आणि अरुंद होते. या स्थितीमध्ये कधीकधी श्वसननलिकेत अतिरिक्त म्युकसही निर्माण होऊ शकतो. यामुळे श्वास घेण्यास अडचणी येतात आणि सतत खोकलाही येऊ शकतो. श्वसननलिकेतील या सर्व घडामोडींचा थेट परिणाम आपल्या फुफ्फुसांवर होतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की, फुफ्फुसं हा अवयव आपल्याला श्वास घेण्यास मदत करतो. तरीही, आपण अनेकदा त्यांची काळजी घेत नाही. सध्याचं अत्यंत प्रदूषित वातावरण पाहता, ही बाब आपल्यासाठी लवकरच घातक ठरू शकते.
गेल्या काही वर्षांमध्ये फुफ्फुसाच्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सर्व वयोगटांतील व्यक्ती या आजारांचा सामना करत आहेत. त्यामुळे, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज (सीओपीडी) बद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. या आजाराचा सामना करताना इनहेलर वापरण्याची गरज भासते. मात्र, त्याचा योग्य वापर कसा करायचा? जगभरातील पुरुष आणि स्त्रियांना प्रभावित करणारा हा क्रॉनिक लंग डिसीज नेमका कसा आहे? याबाबत अनेकांना माहिती नाही. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
सीओपीडी घातक का आहे?
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, जागतिक मृत्यूंसाठी कारणीभूत असलेल्या घटकांमध्ये सीओपीडी तिसरं प्रमुख कारण आहे. 2019 मध्ये सीओपीडीमुळे 3.23 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला. तंबाखूचा धूर, घरातील वायू प्रदूषण, व्यवसायांमधून निर्माण होणारी धूळ, धुकं आणि विविध रसायनं या सर्व घटकांमुळे सीओपीडीची सुरुवात होते. सीओपीडी असलेल्या रुग्णांना हार्ट डिसीज, ऑस्टियोपोरोसिस (हाडं ठिसूळ होणं), मस्कुलोस्केलेटल (स्नायूंचे) विकार, फुफ्फुसांचा कॅन्सर, नैराश्य आणि चिंता यासारख्या इतर वैद्यकीय समस्यादेखील असतात.
24 व्या वर्षी कार्डिअॅक अरेस्टने निधन; लक्षणांकडे दुर्लक्ष करणे बेतू शकते जीवावर
क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज (सीपीओडी) हे भारतातील सर्वाधिक मृत्यूचं दुसरं प्रमुख कारण आहे. देशातील 50 दशलक्षांहून अधिक व्यक्ती या समस्येनं त्रस्त आहेत. या आजारामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होतो, फुफ्फुसांत म्युकस निर्माण होतो आणि श्वसनलिकेत घरघर निर्माण होऊ शकते.
सीओपीडीचं निदान आणि उपचार
सीओपीडीचा घातकपणा कमी करण्यासाठी लवकर निदान आणि उपचार, धूम्रपान बंदी या गोष्टी आवश्यक आहेत. सीओपीडीचा सामना करण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये फुफ्फुसाचं आरोग्य सुधारणाऱ्या सवयींचा समावेश करणं महत्त्वाचं आहे. यामध्ये धूम्रपान सोडणं, प्रदूषणाचा संपर्क टाळणं आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणं, या सवयींचा समावेश होतो. 'इनहेल्ड थेरेपी' तर सीओपीडी आणि अस्थमाच्या उपचारांचा आधारस्तंभ आहे. या थेरेपीमध्ये फुफ्फुसात थेट औषधं पोहोचवली जातात. डॉक्टरांच्या मते तिची परिणामकारकता आणि सुरक्षिततेची टक्केवारीदेखील जास्त आहे.
असं असलं तरी, सीओपीडी आणि अस्थमा 1ची समस्या असलेल्या 90 टक्के रुग्णांना इनहेलर योग्यरित्या वापरता येत नाही. मुंबईतील पीडी हिंदुजा हॉस्पिटलमधील कन्सलटंट पल्मनॉलॉजिस्ट आणि एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. लॅन्सलॉट पिंटो म्हणतात, "कोविड-19 महामारीने फुफ्फुसांच्या आरोग्याच्या महत्त्वाबद्दल आपले डोळे उघडले आहेत. या वर्षीच्या 'वर्ल्ड सीओपीडी वीक'मध्ये फुफ्फुसांच्या आरोग्याचं आणि सीओपीडीचं प्रभावी व्यवस्थापन करण्याबद्दल संवाद सुरू करणं गरजेचं आहे.
Winter Health Tips : हिवाळ्यात गरोदर महिलांनी नक्की खा हे पदार्थ, बाळाच्या वाढीसाठी असतात आवश्यक
"सीओपीडीची लक्षणं अस्थमा असलेल्या रुग्णांसारखीच असतात आणि दोन्ही रोगांसाठी इनहेलरचा नियमित वापर, हा सर्वोत्तम उपचार ठरतो. योग्य मार्गदर्शनाशिवाय इनहेलर वापरणं आव्हानात्मक ठरू शकतं. अचूक इनहेलेशन टेक्निक आणि निर्धारित थेरेपीनुसार औषधांचा योग्य वापर यामुळे सीओपीडीच्या लक्षणांवर चांगलं नियंत्रण ठेवता येतं," असंही डॉक्टर पिंटो म्हणाले.
योग्य इनहेलेशन टेक्निक शिकण्यासाठी डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे. जेव्हा तुम्हाला प्रिस्क्रिप्शनमध्ये इनहेलर्स लिहून दिले जातात तेव्हाच डॉक्टरांना मार्गदर्शनासाठी विचारलं पाहिजे, असंही डॉक्टर पिंटोंनी नमूद केलं. ते म्हणाले, "जॉइंट एअरवेज इनिशिएटीव्ह (जेएआय) प्लॅटफॉर्मसारखे उपक्रम रूग्णांसाठी फायद्याचे ठरत आहेत. रुग्णांना प्रशिक्षित तज्ज्ञांकडून इनहेलर्सचा योग्य वापर कसा करायचा, याचं वैयक्तिकृत प्रशिक्षण दिलं जातं. अशा प्लॅटफॉर्मवर दिलं जाणारं पेशंट डिरेक्टेड एज्युकेशन आणि सर्व्हिस यामुळे डॉक्टर व रुग्ण यांच्यात सुसंवाद निर्माण होतो. परिणामी, रुग्णाचे उपचार अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी मदत होते. उपलब्ध संसाधनांच्या मदतीने डॉक्टर आणि रुग्ण एकत्रितपणे, सीओपीडी आणि दमा असलेल्या रुग्णांच्या फुफ्फुसाचं आरोग्य सुधारण्यासाठी कार्य करू शकतात."
जेएआयच्या मदतीनं इनहेलरचा योग्य वापर शिका
वेगवेगळ्या प्रकारची इनहेल (श्वसननलिकेतून घेतली जाणारी) औषधं आहेत जी वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात. ही औषधं घेण्यासाठी इनहेलरचा वापर केला जातो. काही इनहेलर बंद झालेली श्वसननलिका सुरळीत करतात. काही इनहेलरच्या नियमित उपयोगामुळे सीओपीडीची लक्षणांची तीव्रता कमी करता येते.
इनहेलरचा योग्य वापर करण्यासंबंधी जेएआयच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर काही टिप्स दिलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे:
1) प्रत्यक्ष वापर करण्यापूर्वी इनहेलर पाच ते दहावेळा हालवून घ्यावं.
2) इनहेलरची चाचणी करा आणि एक पफ हवेत सोडा. विशेषत: जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ट्रान्सहेलर वापरत असाल किंवा खूप दिवसांनी वापरत असाल तेव्हाच असं करणं आवश्यक आहे.
3) तोंडातून शक्य तितकी हवा बाहेर काढा आणि काही काळ श्वासोच्छवास तोंडातूनच सुरू ठेवा.
4) इनहेलर वरच्याबाजूला सरळ धरा.
5) इनहेलरचा माउथपिस पूर्णपणे आपल्या तोंडात ठेवा आणि ते आपल्या ओठांनी घट्ट पकडून ठेवा. जेणेकरून तो पूर्णपणे तोंडात सील होईल.
6) माउथपिसमधून एक डोस सोडण्यासाठी तुमच्या हाताच्या तर्जनीने इनहेलरचा वरचा भाग पूर्णपणे दाबा आणि श्वास घ्या.
7) तोंडातून इनहेलर बाहेर काढा आणि 10 सेकंद किंवा जोपर्यंत तुम्हाला सोयीस्कर असेल तोपर्यंत तुमचा श्वास रोखून ठेवा.
8) त्यानंतर आपल्या नाकातून श्वास घ्या. अतिरिक्त डोस आवश्यक असल्यास, पुनरावृत्ती करण्यापूर्वी एक मिनिट वाट बघा.
9) इनहेलेशन पूर्ण झाल्यानंतर, आपलं तोंड पाण्याने स्वच्छ धुवा तोंडातील पाणी गिळू नका.
10) सर्वांत शेवटी इनहेलर कॅप लावून व्यवस्थित ठेवून द्या.
इनहेलेशन टेक्निकबद्दल आणखी सखोल माहिती घेण्यासाठी जेएआय हा वन-स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. जे रूग्णांना योग्य इनहेलेशन टेक्निक आणि इतर मूल्यवर्धित सेवा पुरवतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Disease symptoms, Health Tips