महायुद्ध, प्लेन क्रॅश, कॅन्सर आणि आता कोविड... सगळ्याला पुरून उरल्या या चिवट आजी! 100 वा वाढदिवस झोकात साजरा

coronavirus शी गेले चार महिने लढून या आजींनी 100 व्या वाढदिवसाचा केक कापला. त्यांनी आयुष्यात आणखी काय काय अनुभव घेतला आहे आणि किती चिवटपणे लढल्या आहेत एकदा वाचाच..

coronavirus शी गेले चार महिने लढून या आजींनी 100 व्या वाढदिवसाचा केक कापला. त्यांनी आयुष्यात आणखी काय काय अनुभव घेतला आहे आणि किती चिवटपणे लढल्या आहेत एकदा वाचाच..

  • Share this:
    लंडन, 25 नोव्हेंबर: एका आयुष्यात काय काय म्हणून पाहायचं आणि अनुभवायचं? आयुष्यात थ्रिल हवं पण इतकं? थरारक, एक्सायटिंग अनुभव आयुष्यात येणारच. पण एकाच आयुष्यात या कणखर बाईने युद्ध, बाँबिंग, प्लेन क्रॅश, हत्येचा प्रयत्न, कॅन्सर आणि आता कोविड-19... एवढ्या संकटांना तोंड दिलं आहे आणि तरी चिवटपणे या साऱ्यांना पुरून उरली आहे, हे सांगितलं तर विश्वास बसेल का? पण या चिवट ब्रिटीश आजीबाईंनी Coronavirus ला हरवून नुकताच 100 वा वाढदिवस साजरा केला आहे. 'बस इस लाइफ में और एक्साइटमेंट मत दो' असा फिल्मी डायलॉगसुद्धा कमी पडेल असं आयुष्य जगल्या आहेत या 100 वर्षांच्या ब्रिटीश आजीबाई - जॉय अँड्र्यू. त्यांच्याबद्दलची बातमी द गार्डियन या ब्रिटीश दैनिकाने प्रसिद्ध केली आहे. दुसऱ्या महायुद्धात त्या रॉयल एअर फोर्समध्ये तैनात होत्या. नाझी छावण्याही त्यांनी जवळून पाहिल्या. जर्मनीत बाँबिंग स्क्वॅडच्या कामगिरीवर गेल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या अनुभवानंतर तो थरार कमी होता म्हणून की काय त्या एअर होस्टेस म्हणून रुजू झाल्या आणि तिथे एका जिवावरच्या अपघातातून वाचल्या. जॉय अँड्र्यू यांना डिमेन्शिया आहे. त्या सध्या ब्रिटनच्या यॉर्क प्रांतात एका केअर होममध्ये राहतात. मे महिन्यात त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं निदान झाले. एका क्षणी त्यांची प्रकृती इतकी गंभीर झाली की, त्यांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आशा सोडून दिली होती;  कुटुंबीयांना शेवटचे दिवस असल्याचं कळवलं होतं. पण मुळातच लढवैय्या आणि चिवट असलेल्या जॉय आजींनी काही महिन्यांच्या लढाईनंतर अखेर कोरोनाही पळवून लावलं आणि शंभराव्या वर्षात यशस्वी पदार्पण केलं. त्यांचा शंभराव्या वाढदिवसाचा केक कापतानाचा फोटोही झळकला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी जॉय अँड्र्यू यांना शुभेच्छापत्र पाठवलं असून, मृत्यूवर मात करत लढवैय्यांची परंपरा जपण्याच्या निष्ठेचं कौतुक करणारा खास संदेशही पाठवला आहे. दुसऱ्या महायुद्धात बॉम्बर कमांडचा अनुभव 1920 मध्ये लंडन इथं जन्मलेल्या जॉय अँड्र्यू  या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वुमन्स ऑक्झिलरी एअर फोर्समध्ये सार्जंट म्हणून रूजू झाल्या. त्यांनी बॉम्बर कमांड विभागातील ऑपरेशन रूममध्येही काम केलं. बॉम्बर कमांड 1936 पासून पुढे तीस वर्षे रॉयल एअर फोर्सच्या बॉम्बर विमानाच्या तुकडीचं नेतृत्व करत होतं. या पथकात त्यांनी युद्धकाळात महत्त्वाची जबाबदारी बजावली. जॉय अँड्र्यू या मुळात जर्मन ज्यू वंशाच्या. म्हणूनच दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांची जर्मनीत ड्युसेलडोर्फ इथं नेमणूक करण्यात आली. तिथे त्यांच्यासमवेत एक ज्येष्ठ जोडपं होतं ज्यांची मुलगी नाझी होती. त्यांच्यासाठी एका ड्रायव्हरचीही नियुक्ती करण्यात आली होती. जॉय अँड्र्यू नेहमी बर्लिनला जात आणि जर्मन साम्राज्याच्या अवशेषांना भेट देत. एकदा असंच भ्रमंतीला जात असताना, त्यांच्या ड्रायव्हरने अपघात घडवून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याला पकडण्यात आलं, त्यावेळी तो नाझी असल्याचं स्पष्ट झालं, अशी आईची आठवण जॉय अँड्र्यू यांची 57 वर्षांची कन्या मिशेल अँड्र्यू सांगतात . आपल्या आईचा अत्यंत अभिमान असणाऱ्या मिशेल यांनी जॉय अँड्र्यू यांनी कोरोनावर केलेली मात म्हणजे त्यांच्या लढाऊ वृत्तीचा आणि चिवट जीवनाकांक्षेचा आणखी एक मैलाचा दगड असल्याचं नमूद केलं. प्लेन क्रॅशमधूनही वाचल्या दुसऱ्या महायुद्धानंतर जॉय अँड्र्यू या ब्रिटीश एअरवेज कार्पोरेशनमध्ये एअरहोस्टेस म्हणून रुजू झाल्या. ब्रिटीश एअरवेजच्या त्या पहिल्या एअरहोस्टेस होत्या. त्या कार्यरत असलेल्या एका विमानातील इंधन संपल्याने लिबियामध्ये ते विमान कोसळलं. त्यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आणि विमानाचे तुकडे झाले पण सुदैवाने कर्मचारी वाचले. बदायुनी लोकांनी त्याची सुटका केली. १९७० मध्ये जॉय अँड्र्यू यांनी स्तनाच्या कर्करोगावरही मात केली. त्यांचे पती डेव्हिड हे रॉयल एअरफोर्समध्ये स्क्वाड्रन लीडर म्हणून कार्यरत होते. त्यांचा २०१३ मध्ये कर्करोगाने मृत्यू झाला. जॉय अँड्र्यू सध्या यॉर्क मधील मिनिस्टर ग्रेंज केअर होममध्ये राहतात. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मार्चपासून लॉकडाउन करण्यात आल्यानं मार्चपासून आपल्याला आपल्या आईची भेट घेता आली नसल्याचे मिखाईल यांनी सांगितले. मात्र लवकरच त्यांची भेट घेता येईल अशी अशा असल्याचंही त्या म्हणाल्या. अँड्र्य यांच्याप्रमाणेच दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश रॉयल एअरफोर्सच्या बॉम्बर कमांडमध्ये कुक म्हणून सेवा बजावलेल्या सध्या कॅनडामधील कॅलगेरी भागात राहणाऱ्या विनिफ्रेड मावीस मागोर यांनीही काही दिवसांपूर्वीच शंभरावा वाढदिवस साजरा केला. त्यांनाही महाराणी, पंतप्रधान जस्टीन ट्रुडो आणि गव्हर्नर जनरल यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छापत्रे पाठवली आहेत.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published: