लंडन 20 डिसेंबर : कॅन्सर (Cancer) हा असा आजार आहे, ज्यावर अद्यापही ठोस उपचार उपलब्ध झालेले नाहीत. कॅन्सर पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये असताना त्याचं निदान झाल्यास किमोथेरेपी (Chemotherapy) सारख्या उपचार पद्धतींचा वापर करून त्यापासून सुटका मिळवता येते. पहिल्या दोन स्टेजनंतर मात्र कॅन्सवर मात करणं जवळपास अशक्यच आहे. कॅन्सर उपचारांदरम्यान (Cancer treatment) रुग्णाला प्रचंड वेदनांचा सामना करावा लागतो. कॅन्सरच्या गोळ्या-औषधांमुळे आणि रेडिएशन थेरेपींमुळे शरीरावर विविध प्रकारचे साईड ईफेक्ट होतात. त्यामुळे कधी-कधी रुग्णाची सेक्स लाईफदेखील (Sex Life) धोक्यात येते.
ब्रिटनमधील मँचेस्टर येथे राहणाऱ्या एका महिलेला याबाबत अतिशय वाईट अनुभव आला आहे. बीबीसीनं दिलेल्या वृत्तानुसार, मँचेस्टरमध्ये राहणाऱ्या केट वाईल्ड (Cait Wilde) या महिलेला ब्लड कन्सर (Blood Cancer) झालेला आहे. रक्ताच्या या कॅन्सरला वैद्यकीय भाषेत 'अॅक्युट मायलॉईड ल्युकेमिया' (Acute myeloid leukemia) या नावानं ओळखलं जातं. वयाच्या 19व्या वर्षी केटला कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. कॅन्सरचं निदान होण्यापूर्वी आणि निदान झाल्यानंतर काही दिवस केटची सेक्स लाईफ चांगली होती. तिला सेक्स करताना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. मात्र, किमोथेरेपी आणि इतर कॅन्सर उपचार सुरू केल्यानंतर तिला शारीरिक संबंध ठेवताना त्रास होऊ लागला. काही वेळा अस्वस्थ वाटून तिला मानसिक त्रासाचाही सामना करावा लागला.
केटनं सांगितलं की, किमोथेरपी सेशन्स सुरू असताना तिची सेक्शुअल डिझायर (Sexual desire) हळूहळू कमी होत गेली. किमोथेरपी आणि रेडिओथेरपीच्या उपचारांमुळे शरीरातील केमिकल्स (Chemicals) मेनोपॉज (Menopause) मोडमध्ये गेल्यामुळं केटमध्ये हा बदल झाला होता. मात्र, या गोष्टीची तिला कल्पना नव्हती. कॅन्सर उपचारांदरम्यान केटमध्ये निर्माण झालेली व्हजायनल अॅट्रॉफी (Vaginal atrophy) हे मेनोपॉजच्या संभाव्य लक्षणांपैकी एक आहे.
व्हजायनल अॅट्रॉफीमुळं व्हजायना ड्राय आणि कमकुवत होतो. यामुळं सेक्शुअल अॅक्टिव्हिटीदरम्यान (Sexual activity) अडचणी येतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. कॅन्सर उपचारांचा एक भाग म्हणून केटच्या शरीरात बोन मॅरो ट्रान्सप्लांट (Bone marrow transplant) करण्यात आलं. त्यानंतर तिच्या सेक्शुअल डिझायर काही प्रमाणात पुन्हा जागृत झाल्या. तिला पुन्हा आपलं सेक्स लाईफ सुरू करण्याची इच्छा निर्माण झाली. मात्र, त्यात देखील तिला अनेक अडणींचा सामना करावा लागला.
सेक्शुअल डिझायर काही प्रमाणात पुन्हा जागृत झाल्यानंतर मी डेटिंग (Dating) सुरू केलं. मात्र, मागील अनुभव पाहता माझा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला होता. रिलेशनशिपमध्ये (Relationship) तर यायचं होतं मात्र, सेक्स (Sex) करायचं नव्हतं अशी माझी स्थिती झाली होती. ही गोष्ट समोरच्या व्यक्तीला कशी समजून सांगावी हे देखील मला समजत नव्हतं. त्यामुळे अनेकदा मला माझीच लाज वाटत होती, अशी प्रतिक्रिया केटनं दिली. आत्मविश्वास गमावल्यामुळं कितीतरी दिवस केटनं ही गोष्ट कुणाला सांगितलीही नव्हती. शेवटी एका ट्रान्सप्लांट क्लिनिकमधील (Transplant Clinic) एका नर्सनं तिला मदत केली. नर्सनं खास महिलांसाठी सुरू केलेल्या उपक्रमात सहभागी झाल्यानंतर केटचा आत्मविश्वास परत येण्यास मदत झाली.
केटला ज्या अडचणींचा सामना करावा लागला त्या नेमक्या कशामुळं निर्माण झाल्या होत्या, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. किमोथेरेपी दरम्यान केटच्या शरीरातील प्लेटलेट्स (Platelets) कमी झाल्या होत्या. शरीरामध्ये प्लेटलेट्सची कमतरता असणं धोकादायक आहे. जर प्लेटलेट्स कमी असतील तर त्वचेवर एखाद्या छोटासा जरी कट गेला तरी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव (Bleeding) होतो. सेक्स करताना ही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. याचं गोष्टीमुळे केटला जास्त मनस्ताप सहन करावा लागला. याशिवाय कॅन्सरच्या उपचारांदरम्यान तिला केस गळती, वजनातील चढ-उतार आणि सांधेदुखीचाही त्रास सहन करावा लागला.
कॅन्सर उपचारांदरम्यान सेक्शुअल प्रॉब्लेम्सचा सामना करावा लागणारी केट वाईल्ड ही एकमेव महिला नाही. तिच्यासारख्या अनेक व्यक्ती आहेत, ज्यांना हा त्रास होतो. मॅकमिलन कॅन्सर सपोर्ट ग्रुपनं (Macmillan Cancer Support) केलेल्या अभ्यासानुसार, 46 टक्के कॅन्सरग्रस्त तरुणांच्या सेक्स लाईफवर परिणाम होतो. तर, सर्व वयोगटांतील 37 टक्के लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. 'कॅन्सर रिसर्च यूके'नं (Cancer Research UK) दिलेल्या आकडेवारीनुसार, दरवर्षी 15-24 वर्षे या वयोगटातील सुमारे दोन हजार 400 तरुण मुलं-मुली कर्करोगाला बळी पडतात.
एकूणचं कॅन्सर हा आजार मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही पातळीवर व्यक्तीला मनस्ताप देतो. जे याचा यशस्वीपणे सामना करतात, ते लवकर ठिक होतात. मात्र, जे खचून जातात त्यांच्यासाठी कॅन्सरवर मात करणं अशक्य होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cancer, Sexual health