मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हिवाळ्यात सांधेदुखी, संधिवाताचा त्रास टाळण्यासाठी या गोष्टींकडे वेळीच लक्ष द्या

हिवाळ्यात सांधेदुखी, संधिवाताचा त्रास टाळण्यासाठी या गोष्टींकडे वेळीच लक्ष द्या

सांधेदुखीवरील उपाय

सांधेदुखीवरील उपाय

हिवाळा संधिवात असलेल्या रुग्णांसाठी त्रासदायक ठरु शकतो. कारण हिवाळ्यात संधिवातामुळे होणाऱ्या वेदनांमध्ये वाढ होते. हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे संधिवाताचा त्रास वाढतो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 नोव्हेंबर : सर्वसामान्यपणे हिवाळा आरोग्याच्या दृष्टीने पूरक मानला जातो. हिवाळ्यात पोषक आहार आणि योग्य व्यायाम केला तर त्यापासून शरीराला मिळणारी ऊर्जा ही दीर्घकाळ टिकते, असं मानलं जातं. पण काही आजार असलेल्या रुग्णांसाठी हिवाळा त्रासदायक मानला जातो. संधिवात असलेल्या रुग्णांना हिवाळ्यात जास्त त्रास होऊ शकतो. संधिवाताच्या रुग्णांना या कालावधीत शारीरिक वेदना जाणवू शकतात. हिवाळ्यामुळे संधिवात होत नसला तरी संधिवाताच्या वेदनांमध्ये वाढ होते. हिवाळ्यात संधिवाताचा त्रास वाढण्यामागे अनेक कारणं असतात. परंतु, आहार-विहारात योग्य बदल केला तर या आजारामुळे हिवाळ्यात जाणवणारा त्रास नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. यासाठी तज्ज्ञांनी काही उपाय सांगितले आहेत. या उपायांबाबत सविस्तर जाणून घेऊया. आज तकने या विषयीची माहिती दिली आहे.

हिवाळा संधिवात असलेल्या रुग्णांसाठी त्रासदायक ठरु शकतो. कारण हिवाळ्यात संधिवातामुळे होणाऱ्या वेदनांमध्ये वाढ होते. हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे संधिवाताचा त्रास वाढतो. संधिवात हा चिवट असतो. या आजारामुळे एकदा वेदना सुरू झाल्या की रुग्णांना उठणं-बसणंदेखील अवघड होतं. हिवाळ्यात गारठ्यामुळे गुडघ्यातील सायनोव्हायल फ्लुएड हा घटक जास्त घट्ट होतो. त्यामुळे सांधेदुखी, सांधे आखडणं अशा प्रकारचा त्रास सुरू होतो. हाडांची मजबूती आणि सांध्यांचं कामकाज योग्य पद्धतीने होण्यासाठी सायनोव्हायल फ्लुएड गरजेचं असते. हा एक घट्ट द्रव पदार्थ असतो. हा पदार्थ सांध्यांच्या हालचालींसाठी मदत करतो आणि सांधे एकमेकांवर घासण्यापासून रोखतो. सर्वसामान्य भाषेत याला ग्रीस असं म्हणता येईल. हिवाळ्यात सांधेदुखी, संधिवातामुळे होणाऱ्या शारीरिक वेदना टाळण्यासाठी रुग्णाने जीवनशैलीत बदल करणं गरजेचं आहे.

हिवाळ्यात पोषक आणि संतुलित आहार महत्त्वाचा असतो. याकाळात आहारात व्हिटॅमिन डी, सी, ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड, आलं अर्थात अद्रक, सोयाबीन, मासे, हिरव्या पालेभाज्या, काजू, शेंगदाणे, शेंगवर्गीय भाज्यांचा समावेश असावा. त्यासोबतच रोज भरपूर पाणी प्यावं आणि कोलेजनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. याशिवाय रोज व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेणंदेखील फायदेशीर ठरू शकतं.

हिवाळ्यात रोज किमान एक तास सूर्यप्रकाशात बसावं. यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळतं. व्हिटॅमिन डीमुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. हिवाळ्यात उबदार कपड्यांचा वापर प्राधान्याने करावा. आपले हात-पाय आणि सांधे उबदार कपड्यांनी कव्हर करावेत. यामुळे त्यांना उब मिळते आणि संधिवाताचा त्रास कमी होतो.

हिवाळ्यात सांधेदुखी, संधिवाताचा त्रास जाणवू नये, यासाठी सांध्याच्या बाहेरील त्वचेची काळजी घ्यावी. जर ही त्वचा कोरडी पडत असेल तर सांध्यांमध्ये जळजळ जाणवू शकते. अशावेळी व्हिटॅमिन ए आणि ई ने युक्त मॉईश्चरायझरचा वापर करावा. यामुळे सांध्याच्या वेदना कमी होऊ शकतात.

जर तुम्हाला संधिवात आणि सांधेदुखीपासून मुक्ती हवी असेल तर धूम्रपान करू नये. धूम्रपानामुळे कनेटिव्ह टिश्यू ताणले जातात. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो.

हिवाळ्यात बहुतांश लोक आळस म्हणून व्यायाम करणं टाळतात. पण जर तुम्हाला संधिवात, सांधेदुखीचा त्रास असेल तर हिवाळ्यात व्यायाम करणं गरजेचं आहे. या कालावधीत तुम्ही उन्हात चालण्याचा व्यायाम करू शकता. जिममध्ये व्यायाम करू शकता. यामुळे शरीरातील मेटाबॉलिक हीट वाढते. तसंच सांधे योग्य पद्धतीने काम करतात. याशिवाय एखादया खेळासारख्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी होऊ शकता. यामुळे शरीर आणि मेंदूला निश्चितच फायदा होतो.

हे वाचा - प्रत्येक ऋतूनुसार इतकं रेफ्रिजरेटरचं योग्य तापमान किती असावं?

हिवाळ्यात कोणत्याही स्वरुपाची हालचाल करताना आपल्या सांध्यांची विशेष काळजी घ्यावी. योग्य पद्धतीने उभं राहिल्याने आणि चालल्याने सांधेदुखी कमी होऊ शकते. याशिवाय वजन वाढणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. वजन वाढल्याने शरीराचा सर्व भार गुडघ्यांवर येतो आणि वेदना वाढतात. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी व्यायाम करावा, असा सल्ला आरोग्यविषयक तज्ज्ञांनी दिला आहे.

First published:

Tags: Health Tips, Winter, Winter session