मुंबई, 7 डिसेंबर : परदेशी पदार्थ असूनही पिझ्झा (Pizza) हा आज भारतातल्या लोकप्रिय पदार्थांपैकी एक म्हणून ओळखला जातो. अनेक भारतीयांच्या जिभेवर पिझ्झा राज्य करतो आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण पिझ्झाचे शौकीन आहेत. फास्ट फूड प्रेमींसाठी सर्वांत आवडता पदार्थ म्हणजे पिझ्झा. मोबाईलच्या एका टॅपवर पिझ्झा तुमच्या घरी पोहोचतो. तुम्हीही अनेकदा पिझ्झा खाल्ला असेल; पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, की गोलाकार असलेला पिझ्झा चौकोनी बॉक्समध्ये (Round Pizza in Square Box) का दिला जातो? तसंच गोल पिझ्झा त्रिकोणी आकारात का कापला जातो? याबद्दलची माहिती घेऊ या. 'झी न्यूज'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
गोल पिझ्झा चौकोनी आकारात (Why Pizza slices cut in triangle) का कापत नाही, असं अनेक जण विचारतात. याचं उत्तर अतिशय सोपं आहे. ते म्हणजे कोणतीही गोल वस्तू ही समान आकारात कापण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ती लहान त्रिकोणांमध्ये कापणं होय. पिझ्झाचा आकार खूप मोठा असेल तेव्हाच त्याचे चौकोनी तुकडे करता येतात.
पिझ्झा गोल आणि तो पिझ्झा ठेवलेला बॉक्स चौकोनी असतो. चौकोनी बॉक्स तयार करणं सोपं असतं. तसंच ते कमी किमतीमध्ये बनतात. गोल बॉक्स बनवण्यासाठी कार्डबोर्डच्या अनेक शीट लागतात. चौकोनी बॉक्स बनवण्यासाठी एकच शीट पुरेशी असते. तसंच चौकोनी बॉक्सची वाहतूकसुद्धा सोपी असते. कमी खर्चिक असल्याने गोल पिझ्झासाठी चौकोनी बॉक्स वापरला जातो.
हेही वाचा : इस्लाम सोडून हिंदू धर्मात आलेले वसीम रिझवी आहेत तरी कोण?
याशिवाय, शेल्फमध्ये, फ्रीजमध्ये चौकोनी कोपरे असतात. त्यामुळे तिथे हे बॉक्स फिट बसतात. त्यामुळे पिझ्झा ठेवण्यास सोपं जातं. तसंच, पिझ्झासाठी चौकोनी बॉक्स योग्य असतो, तर मग पिझ्झा चौकोनी का नाही केला जात? असा प्रश्न अनेक जण विचारतात; पण पिझ्झा (Why Pizzas not made Square) गोल केल्यासच तो सर्व बाजूंनी योग्य प्रकारे आणि सारखाच शिजतो. म्हणून पिझ्झा कधीच कच्चा नसतो.
पिझ्झा हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडात पाणी येतं. पिझ्झामध्येसुद्धा अनेक प्रकार आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने पिझ्झा तयार केला जातो. पिझ्झा बनवण्याच्या पद्धतीत आतापर्यंत अनेक बदल झाले आहेत. अनेक जण ऑर्डर न करता घरीच पिझ्झा बनवतात. कारण बाजारात पिझ्झा बेस सहज मिळत असल्याने घरच्या घरी पिझ्झा तयार करणं ही गोष्ट आजकाल अतिशय सोपी झाली आहे. आज पिझ्झा डेनिमित्त गुगलने खास डूडलही तयार केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.