मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सिझेरियन प्रसूतींची संख्या का वाढतेय? जाणून घ्या नेमकी कारणं व ते रोखण्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

सिझेरियन प्रसूतींची संख्या का वाढतेय? जाणून घ्या नेमकी कारणं व ते रोखण्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

सिझेरियन प्रसूती

सिझेरियन प्रसूती

वैद्यकीय सुधारणांमुळे सिझेरियन म्हणजेच सी-सेक्शन पद्धतीनं प्रसूती होऊ लागली. खरं तर यामुळे अनेक अर्भकांच्या व मातांच्या मृत्यूला आळा बसला; मात्र हल्ली अशी प्रसूती विनाकारण करण्याचं प्रमाण खूप वाढलंय.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 03 फेब्रुवारी : कोणतीही गोष्ट नैसर्गिक रीतीनं होत असेल, तर ती आपल्यासाठी व पर्यावरणासाठीही चांगली असते. हा नियम नैसर्गिक प्रसूतीलाही लागू होतो. बाळ आणि बाळंतीण दोघांच्याही आरोग्यासाठी ते चांगलं असतं. आता वैद्यकीय सुधारणांमुळे सिझेरियन म्हणजेच सी-सेक्शन पद्धतीनं प्रसूती होऊ लागली. खरं तर यामुळे अनेक अर्भकांच्या व मातांच्या मृत्यूला आळा बसला; मात्र हल्ली अशी प्रसूती विनाकारण करण्याचं प्रमाण खूप वाढलंय. त्यामागे नेमकी काय कारणं आहेत व ते कसं रोखता येईल, याबाबत वैद्यकीय तज्ज्ञ काय म्हणतात, हे जाणून घेऊ. आज तकने त्याबाबतचं वृत्त दिलंय.

    नैसर्गिक प्रसूतीबाबत जनजागृती करणाऱ्या लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजच्या वरिष्ठ प्राध्यापक डॉ. मंजू पुरी याबाबत अभ्यास करत आहेत. दिल्ली सरकारसोबत त्या हे काम करत आहेत. त्या अभ्यासामध्ये त्यांना असं आढळलं, की खासगी रुग्णालयांमध्ये जवळपास 60-70 टक्के प्रसूति सिझेरियन पद्धतीने होतात. सध्या या विषयाबाबत माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे. तसं लोकांना याबाबत जागरूक करण्याचंही काम त्या करत आहेत.

    हेही वाचा - Throat Pain While Crying : रडताना आपल्या घशामध्ये वेदना का होतात?

    डॉ. मंजू यांच्या मते सिझरेयन प्रसूती होण्यामागे रुग्ण आणि डॉक्टर यांची वेगवेगळी कारणं आहेत. प्रत्येक कारण योग्य नसलं तरी त्यावर विचार होणं गरजेचं आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा, डायबेटीससारखे आजार वाढताहेत. रोजच्या आयुष्यात शारीरिक मेहनत फारशी नाही. त्यामुळे गरोदरपणात अनेक समस्या जाणवतात. तशात सरकारकडूनही पेनलेस नॉर्मल प्रसूतीसाठी प्रयत्न होताना दिसत नाही. सरकारी रुग्णालयांमध्ये फारशा सेवासुविधा नसतात. त्यामुळे रुग्ण नैसर्गिक प्रसूतीसाठी आग्रही राहत नाहीत.

    डॉक्टरांच्या बाजूनं विचार केल्यास, नैसर्गिक प्रसूतीसाठी 12-14 तास लागतात. त्यानंतरही काही अडचणी आल्या, तर रुग्ण डॉक्टरांवर आरोप करतात. मारहाण, रुग्णालयाची तोडफोड असेही प्रकार होतात. लोकांची सहनशीलता कमी झाली आहे. नैसर्गिक प्रसूतीमध्ये आयत्या वेळी काही समस्या आली, तर आधीच सीझर का केलं नाही, असंही रुग्ण म्हणतात. यामुळे डॉक्टर तो धोका पत्करायला घाबरतात.

    डॉ. पुरी यांच्या म्हणण्यानुसार, सिझेरियन प्रसूती स्त्रियांच्या आरोग्यासाठी योग्य नसते. त्यात पोट फाडलं जातं, संसर्गाचा धोका असतो. काही वेळेला आतडी चिकटतात. दुसऱ्यांदा सिझर करताना तर आणखी समस्या येऊ शकतात. यात 3 प्रकारच्या समस्या येऊ शकतात. पहिलं म्हणजे PAS अर्थात प्लॅसेंटा एक्रिटा सिंड्रोम, सिझेरियन स्कार प्रेग्नन्सी म्हणजे बाळ स्कारमध्येच थांबतं, तसंच ट्यूबल प्रेग्नन्सी म्हणजे दुसऱ्यांदा गर्भधारणा होण्यात अडचणी येतात. त्याशिवाय शस्त्रक्रियेजागी हर्नियाही होण्याचा धोका असतो. यामुळे नैसर्गिक प्रसूती केव्हाही चांगली असते.

    यूकेमध्ये मिडवाइफ अर्थात सुईण किंवा दाई असल्यामुळे त्या सीझर प्रसूती करू शकत नाहीत. आपल्या देशात तशी सोय नसल्यानं सीझर प्रसूती जास्त होते, असंही डॉ. पुरी यांचं मत आहे.

    डॉ. पुरी यांच्या मते रुग्ण आणि रुग्णालय दोन्ही घटकांकडून नैसर्गिक प्रसूतीसाठी प्रयत्न व्हायला हवेत. महिलांनी आरोग्य चांगलं ठेवणं, वजन प्रमाणात राखणं, योग्य वयात चान्स घेणं, सिगारेट, दारूचं व्यसन न करणं या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. रुग्णालयांनी रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी व्यवस्था उभारली पाहिजे, अँटी नॅटल एक्झरसाईज, रुग्णालयात सुईण असणं आणि नैसर्गिक प्रसूतीसाठी जागरूकता निर्माण करणं या गोष्टींद्वारे रुग्णालयं नैसर्गिक प्रसूतीवर भर देऊ शकतात.

    नैसर्गिक प्रसूती बाळ व आईच्या आरोग्यासाठी चांगली असल्याने त्याकरिता डॉक्टर व रुग्णांनीही प्रयत्न केले पाहिजेत.

    First published:

    Tags: Lifestyle, Pregnancy, Pregnant woman