मुंबई, 2 मे : माणसाच्या आयुष्यात जन्म, लग्न आणि मृत्यू (Death) या तीन महत्त्वाच्या घटना असतात. जन्म आणि लग्न या दोन प्रसंगांच्या वेळी आनंद साजरा केला जातो, तर मृत्यू हा दु:खाचा प्रसंग असतो. माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार (Funeral) केले जातात. या अंत्यसंस्कारांची पद्धत वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळी आहे. तसंच अंत्यसंस्कारावेळी परिधान केले जाणारे कपडेदेखील त्या त्या धर्मानुसार काळे किंवा पांढरे असतात. अंत्यसंस्कारांवेळी काळे किंवा पांढरे कपडे का परिधान केले जातात आणि त्यामागे काय कारण आहे, हे जाणून घेऊ या. याबद्दलची माहिती देणारं वृत्त ‘टीव्ही नाइन हिंदी’ने दिलं आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर दु:ख व्यक्त करण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. भारतात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पांढरे कपडे (White Clothes For Funeral) घातले जातात, तर पाश्चिमात्य देशांमध्ये काळ्या रंगाचे कपडे (Black Clothes For Funeral) परिधान करण्याची प्रथा आहे. बहुतांश देशांत काळे कपडे परिधान करून मृत व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे या रंगांचे कपडे परिधान करण्यामागचा अर्थ काय आहे? असा प्रश्न साहजिकच मनात येऊ शकतो. यामागे वेगवेगळी कारणं आणि विचार आहेत. काळा रंग हा दु:ख व्यक्त करण्याचा रंग मानला जातो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यसंस्कारावेळी दु:ख व्यक्त करण्यासाठी आणि त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पाश्चिमात्य देशांत काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. परंतु, हा रंग शोक व्यक्त करण्यासाठी का परिधान केला जातो, याबाबत ‘जर्नल ऑफ इंटरनॅशनल कलर असोसिएशन’मध्ये (Journal Of The International Color Association) माहिती देण्यात आली आहे. या जर्नलमध्ये सांगितलेल्या माहितीनुसार काळा रंग हा मृत्यू, भीती यांसारख्या नकारात्मक भावनांचं द्योतक आहे असं मानलं जातं. रिपोर्टनुसार, जगभरातल्या अनेक देशांच्या संस्कृतीमध्ये काळा रंग हा पुढे काय होईल याची शाश्वती न देण्याचं प्रतीक समजला जातो. माणसांसाठी मृत्यू हे एक रहस्य आहे. अनेकांचे मृत्यू रात्री झोपेत असताना झाले आहेत. झोपेत माणसाचे डोळे बंद असतात आणि त्याला केवळ काळोख दिसत असतो. त्यामुळे मृत्यूचा रंग काळा मानला जातो. वाढत्या वयानुसार ब्लड शुगर लेवल नेमकी किती असावी? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं पाश्चिमात्य देशांमध्ये जरी दु:ख व्यक्त करण्यासाठी काळ्या रंगांचे कपडे परिधान केले जात असले, तरी नेहमीच असे नव्हते. इतिहासात डोकावून पाहिलं, तर कधी काळी दु:खाच्या प्रसंगी पांढरे कपडेदेखील परिधान केले जात होते. पांढरा रंग हा पवित्रतेचा आणि निरागसतेचा रंग मानला जात होता. तसंच पांढऱ्या रंगाचे कपडे स्वस्त देखील मिळत होते. श्रीमंत असो किंवा गरीब, सर्वांना हे कपडे खरेदी करण्यास परवडत होते; मात्र काळानुसार या संस्कृतीत बदल होत गेला आणि पाश्चिमात्य देशांमध्ये दु:खाच्या प्रसंगी काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची प्रथा सुरू झाली. एकंदरीतच विचार केला, तर दु:ख व्यक्त करण्यासाठी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणं चुकीचं आहे का असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. याचं उत्तरदेखील संस्कृतीतल्या विविधतेशी निगडित आहे. सध्याच्या काळात वेगवेगळ्या देशांत आणि धर्मांत रंगांना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. युरोप आणि नॉर्थ अमेरिकेत दु:खाच्या प्रसंगी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. बौद्ध आणि हिंदू धर्मात अशा प्रसंगांमध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची प्रथा आहे. कारण पांढरा रंग हा दु:ख आणि सन्मानाचं प्रतीक मानला जातो. भारत, चीन आणि कोरिया यांसारख्या देशांमध्ये दु:खाच्या प्रसंगी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची प्रथा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.