मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

जिममध्ये वर्कआउट करताना तरुणांचा का होतोय मृत्यू? हृदयरोगतज्ज्ञांनी सांगितली प्रमुख कारणं

जिममध्ये वर्कआउट करताना तरुणांचा का होतोय मृत्यू? हृदयरोगतज्ज्ञांनी सांगितली प्रमुख कारणं

तरुणांना का येतो हार्ट अटॅक

तरुणांना का येतो हार्ट अटॅक

जिममध्ये जाणाऱ्या व्यक्तींना हृदयरोगाचा आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार का होत आहेत आणि हे आजार कसे टाळता येतील, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 07 डिसेंबर : व्यायाम करणाऱ्या व्यक्तीची प्रकृती अनेक वर्षं ठणठणीत राहते, ती व्यक्ती कधीही आजारी पडत नाही, असं मानलं जातं. परंतु जिममध्ये व्यायाम करत असताना हार्ट अ‍ॅटॅकने तरुणांना जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांत घडल्या. ही परिस्थिती का उद्भवली याचा विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. हृदयरोगतज्ज्ञांच्या मते, कोरोनानंतर हृदयाशी संबंधित आजारांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. तरुणांच्या वेगवेगळ्या सवयीही याला कारणीभूत आहेत. ‘आज तक’ने या संदर्भात माहिती देणारं वृत्त दिलं आहे.

पूर्वी वयस्कर व्यक्तींना हृदयरोगाचा त्रास व्हायचा. परंतु आता अगदी कमी वयातले तरुणही या आजाराच्या विळख्यात सापडत आहेत. जिममध्ये व्यायाम करताना काही जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये व्यायाम करत असताना हार्ट अ‍ॅटॅक आला होता. त्याआधी प्रसिद्ध अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीबाबत असाच प्रकार घडला. गाजियाबादमध्ये 35 वर्षीय जिम ट्रेनरचाही हार्ट अ‍ॅटॅकने अलीकडेच मृत्यू झाला. जिममध्ये व्यायाम करून घरी पोहोचल्यानंतर एक तरुण पायऱ्या चढून गेल्यावर घराच्या दरवाजात कोसळला व जागीच तो गतप्राण झाला. अशा असंख्य घटना सध्या घडत आहेत. त्यामुळे जिममध्ये जाणाऱ्यांनाही भीती वाटू लागली आहे. जिममध्ये जाणाऱ्या व्यक्तींना हृदयरोगाचा आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार का होत आहेत आणि हे आजार कसे टाळता येतील, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

या संदर्भात दिल्लीतल्या शालिमार बागमधल्या मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे 'कार्डिअ‍ॅक सायन्सेस, कार्डियॉलॉजी, कार्डिअ‍ॅक इलेक्ट्रोफिजिओलॉजी-पेसमेकर'चे असोसिएट डायरेक्टर डॉ. चंद्रशेखर यांच्याशी चर्चा केल्यावर अनेक बाबी समोर आल्या.

तरुणांमध्ये हार्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढण्याची कारणं डॉ. चंद्रशेखर यांनी सांगितली. ते म्हणाले, की 30 ते 40 वयोगटातल्या अनेक तरुणांना हार्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढलेला आहे. कोरोना महामारीनंतर हृदयाशी संबंधित आजार मोठ्या प्रमाणात बळावत आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे कोरोनाचा आजार झाल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागल्या आहेत. कोरोना काळात खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैली बदललेली आहे. तणावही प्रचंड वाढला असल्याने हार्ट अ‍ॅटॅकचा धोका अधिक वाढल्याचं दिसतं. ताणतणाव वाढल्यामुळे अनेक जण धूम्रपान आणि मद्यपान करत असल्याने हृदयाशी संबंधित आजार जडत आहेत. फिटनेसच्या बाबतीत सजग असणाऱ्या आणि दररोज जिममध्ये व्यायामासाठी जाणाऱ्यांनीही आपण पूर्णपणे फिट आहोत, असा समज करून घेऊ नये. अनेकांचं शरीर वरून फिट वाटत असले तरी आतून मात्र ते कमकुवत असू शकते. त्यामुळे कमकुवत असलेल्या शरीरावर अधिक भार टाकला गेला, तर शरीर त्याला प्रतिसाद देणार नाही आणि याचे दुष्परिणाम भोगावे लागतील.

एक उदाहरण देऊन डॉ. चंद्रशेखर यांनी ही बाब विशद केली. ते म्हणाले, की गेली 2-3 वर्षं दररोज धावणाऱ्या व्यक्तीला पाच किलोमीटर धावायला सांगितलं गेलं, तर ती व्यक्ती सहजरीत्या धावू शकते. कारण त्या व्यक्तीला सतत धावण्याचा सराव असतो. परंतु काही आठवड्यापूर्वीच धावणं सुरू केलेल्या एखाद्या व्यक्तीला पाच किलोमीटर धावण्यास सांगितलं, तर त्या व्यक्तीच्या शरीरावर आवश्यकतेपेक्षा अधिक भार टाकला जाईल. धावत असताना त्या व्यक्तीला थकवा जाणवेल, श्वास रोखला जाईल, हृदयापर्यंत ऑक्सिजन पोहोचणार नाही. परिणामी हार्ट अ‍ॅटॅक येऊन त्या व्यक्तीचा मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो.

डॉ. चंद्रशेखर म्हणाले, की सध्या तरुण फिटनेससाठी बनवण्यासाठी जिममध्ये जात आहेत. सिक्स पॅक अ‍ॅब्ज बनवणे म्हणजे फिटनेस नाही, ही बाब तरुणांनी लक्षात घ्यायला हवी. दररोजची कामं आपण किती सहज पद्धतीने करू शकतो यावर फिटनेस अवलंबून असतो. शरीर निरोगी राहणं, कुठलाही आजार न होणं, ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहणं फार गरजेचं आहे. अनेक तरुण जिममध्ये जाऊन इतरांना पाहत इगो लिफ्टिंगचा प्रकार करतात. यामुळे शरीरावर क्षमतेपेक्षा अधिक भार टाकला जातो आणि शरीराचा योग्य प्रतिसाद मिळत नाही. परिणामी गंभीर समस्येला सामोरं जावं लागतं.

शरीराला बळकट बनवण्यासाठी फिटनेस इंडस्ट्रीमध्ये सर्रास वापरल्या जाणाऱ्या सप्लिमेंटबाबत बोलताना डॉ. चंद्रशेखर यांनी इशारा दिला आहे. ते म्हणाले, की कमी वयातले तरुण आज सप्लिमेंटचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. शरीरयष्टीनुसार सप्लिमेंट्स योग्य आहेत की नाहीत, त्याचे काय साइड इफेक्ट्स असू शकतात, या सप्लिमेंटचा वापर कसा करावा याची काहीही माहिती न घेता शरीर बळकट बनवण्याच्या नादात मोठ्या प्रमाणात सप्लिमेंट वापरली जात आहेत. सप्लिमेंट्स बनावट असतील आणि त्याचा ओव्हरडोस घेतला गेल्यास शरीराला ती हानिकारक ठरू शकतात. सर्व बाबींची माहिती असतानाही कोणी सप्लिमेंट्स घेत असेल तर हार्ट रेट वाढण्याची शक्यता असते. ब्लड प्रेशर वाढून हार्ट अ‍ॅटॅकचा धोका जास्त असतो.

हे वाचा - हिवाळ्यात वाढतो हार्ट अ‍ॅटॅकचा धोका; या 5 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

डॉ. चंद्रशेखर म्हणाले, की बरेच जण जेव्हा जिममध्ये व्यायामासाठी जातात तेव्हा वॉर्म अप न करता ते ट्रेडमिलवर धावणं सुरू करतात. अशा परिस्थितीत शरीराचा सर्वसामान्य असलेला हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर अचानक वाढू लागतं. अशा वेळी व्यक्ती जमिनीवर कोसळू शकते.

डॉ. चंद्रशेखर म्हणाले, की व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत. प्रत्येक व्यक्तीनं दररोज कमीत कमी 30 ते 45 मिनिटे व्यायाम करायला हवा. व्यायाम करणं म्हणजे जिममध्ये जाऊन अधिक वजन असलेल्या गोष्टी उचलाव्यात, असं नाही. शारीरिक हालचाल होणं अधिक गरजेचं आहे. सायकलिंग, स्विमिंग, गार्डनिंग, वॉकिंग, जिमिंग, रनिंग अशा शारीरिक हालचालीच्या कोणत्याही बाबी करून व्यायाम होऊ शकतो. जिममध्ये जाऊन व्यायाम करायची इच्छा असल्यास शरीरावर अधिक ताण पडणारे व्यायाम करणं टाळावं. यामुळे हार्ट रेट अचानक वाढण्याचा धोका संभवतो. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार व्यायाम केला गेल्यास त्याचे फायदे मिळू शकतात.

हे वाचा - Heart Attack: तारुण्यात हार्ट अटॅक टाळायचा असेल तर काही गोष्टींना पर्याय नाही

डॉ. चंद्रशेखर यांनी उदाहरणासह ही बाब समजावून सांगितली. ते म्हणाले, की एखादी व्यक्ती एक वर्षापासून व्यायाम करत असल्यास तिला सरावाने पन्नास किलोपर्यंतचं वजन उचलता येतं. परंतु दोन आठवड्यांपूर्वी जिममध्ये जाणारी व्यक्ती अधिक वजन उचलण्याचा प्रयत्न करत असेल, तर ती व्यक्ती जखमी होणार हे नक्की आहे. व्यायाम करत असताना आपली शारिरीक क्षमता ओळखणं फार महत्त्वाचं असतं. रक्तवाहिन्यांशी संबंधित एखादी ॲक्टिव्हिटी दहा मिनिटांपेक्षा अधिक वेळ करू नये. सुरुवातीला दोन मिनिटांपासून व्यायाम सुरू करावा आणि दर आठवड्याला वेळ वाढवत न्यावा. कुठलाही व्यायाम करताना एखाद्या सर्टिफाईड फिटनेस कोचच्या मार्गदर्शनाखाली तो केल्या गेल्यास धोका कमी असतो. गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुमच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीबद्दल त्यांना सांगावं.

आहारावर विशेष लक्ष देणं आवश्यक

डॉ.चंद्रशेखर यांनी सांगितलं, की जीवनशैली बदलल्याने भारतात हृदयाशी संबंधित आजार वाढत आहेत. शारीरिक हालचाल कमी झाली. तसंच आरोग्यदायी नसलेला आहार, प्रोसेस्ड आणि अल्ट्रा प्रोसेस्ड फूड हृदयाशी संबंधित आजारांना आमंत्रण देत आहे. भारतीय आहारामध्ये 86 टक्क्यांपर्यंत कार्बोहायड्रेट्स असतात. प्रोटीन, आरोग्यदायी फॅट आणि फायबर्स असणारं अन्न आपल्या आहारात समाविष्ट करायला हवं. धूम्रपान हे हृदयाशी संबंधित आजारांचं सर्वांत मोठं कारण ठरत आहे. एखादी व्यक्ती मद्यपान करत असेल, तर बीपी आणि हार्ट रेट अधिक असतो. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. ही बाब लक्षात घेऊन नेहमी आरोग्यदायी जीवनशैली अवलंबणं गरजेचं आहे. चुकीच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवायला हवं. कमीत कमी सात ते आठ तास झोप घ्यावी. ताण-तणावापासून दूर राहावं. या सर्व बाबी नियमितरीत्या केल्यास हृदयाशी संबंधित आजाराचा धोका कमी केला जाऊ शकतो, असं डॉक्टर चंद्रशेखर यांनी सांगितलं.

First published:

Tags: Health, Health Tips, Heart Attack