मुंबई, 23 नोव्हेंबर : सध्या हिवाळा ऋतू सुरू असून हवेमध्ये गारवा वाढला आहे. हिवाळ्यात शरीर उबदार रहावं यासाठी आपलं शरीर अधिक उर्जेचा वापर करतं. त्यामुळे हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती काहीशी कमकुवत होते. हिवाळ्यात शरीराला अनेक प्रकारचे त्रास जाणवतात. थंड वातावरणामुळे आपल्या शरीराच्या बाह्य अवयवांवर परिणाम होतोच शिवायअंतर्गत अवयवांनादेखील इजा होऊ शकते. तापमान कमी झाल्यामुळे आपल्या हृदयावरदेखील अनपेक्षित परिणाम होऊ शकतात. हिवाळ्यात अनेकांना हायपोथर्मिया, फ्रॉस्टबाइट आणि अगदी हृदयविकाराच्या झटक्यासारख्या (हार्ट अॅटॅक) गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हार्ट अॅटॅकचा धोका हा सर्व वयोगटांतील व्यक्तींना असतो. हिवाळ्यात हार्ट अॅटॅकचा वाढलेला धोका आणि प्रदूषणाची सध्याची उच्च पातळी लक्षात घेता, योग्य काळजी घेणं व निरोगी जीवनशैली राखणं अधिक महत्त्वाचं आहे. हिवाळ्यात हार्ट अॅटॅक येण्यापूर्वी दिसणारी लक्षणं 1) शरीराचं योग्य तापमान राखणं ही आव्हानात्मक बाब आहे. हिवाळ्यातील थंड वातावरणामध्ये तर ते अधिक कठीण ठरतं. शरीरातील उष्णता कमी होण्याच्या वेगामुळे हृदयाचे ठोके वाढू शकतात. 2) थंडीमुळे रक्तवाहिन्या आंकुचन पावतात. परिणामी ब्लड प्रेशर वाढतं. हार्ट अॅटॅक आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. 3) हायपरटेन्सिव्ह समस्या असलेल्या बहुतेक व्यक्तींना हिवाळ्यात रक्त घट्ट होणं, रक्ताच्या गुठळ्या होणं आणि ब्लड प्रेशरमध्ये वाढ होणं, अशा अडचणी जाणवू लागतात. या सर्वांमुळे हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो. 4) हिवाळ्यात धुकं आणि इतर प्रदूषकं वातावरणाच्या जमिनीच्या जवळील थरात स्थिरावतात. त्यामुळे श्वासोच्छवासाच्या समस्या आणि छातीत संसर्ग होण्याची शक्यता असते. 5) हिवाळ्यातील कमी तापमानामुळे तुम्हाला घाम येणं कमी होतं. जर तुमच्या शरीरातील अतिरिक्त पाणी योग्य प्रमाणात बाहेर पडत नसेल, तर त्यामुळे फुफ्फुसांमध्ये पाणी जमा होऊ शकतं. याचा हृदयाच्या कार्यावरही परिणाम होऊ शकतो. हार्ट अॅटॅकचा धोका कमी करण्यासाठी बाह्य परिस्थिती आणि डायबेटिस, ब्लड प्रेशर लेव्हल, रक्तवहिन्यासंबंधी इतर विकार, हृदयरोग यांसारखे जोखमीचे घटक व्यवस्थापित करणं आवश्यक आहे. थंड हवामानामुळं हृदय आणि रक्ताभिसरणाच्या कार्यावर परिणाम होतो. परिणामी हृदयावर अधिक ताण पडतो. हिवाळ्यात आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी? 1) जॉगिंग, धावणं आणि सायकल चालवणं यासारख्या फिजिकल अॅक्टिव्हिटींमध्ये स्वतःला गुंतवून घ्या. 2) सूप, हिरव्या पालेभाज्या आणि फायबरयुक्त अन्नपदार्थांसह शरीराला उष्णता मिळेल, असा आहार घ्या. 3) हिवाळ्यामध्ये सतत डॉक्टरांच्या संपर्कात राहा आणि रुटीन चेक-अप करा. 4) योगा, मेडिटेशन आणि इनडोअर अॅक्टिव्हिटीच्या मदतीनं आरोग्यदायी जीवन पद्धती स्वीकारा. 5) धूम्रपान आणि मद्यपान शक्य होईल तितकं टाळा. प्रत्येक व्यक्तीने वेळेवर प्रतिबंधात्मक चाचण्या केल्या पाहिजेत. कौटुंबिक धोके आणि जोखीमपूर्ण घटकांचं मूल्यांकन केलं पाहिजे. हार्ट अॅटॅकचा धोका कमी करण्यासाठी योग्य ती दक्षता घेतली पाहिजे. आपल्याला कोणी येऊन मदत करेल आणि डॉक्टरांकडे घेऊन जाईल, याची वाट बघत बसू नका. कोणत्याही प्रकारची अस्वस्थता, छातीवर ताण येणं, घाम येणं, खांदे दुखणं, जबडा दुखणं, चक्कर येणं किंवा मळमळ या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.