Home /News /lifestyle /

भारताची ग्रेटा थनबर्ग : दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं ती कोण आहे ही 9 वर्षाची कार्यकर्ती?

भारताची ग्रेटा थनबर्ग : दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं ती कोण आहे ही 9 वर्षाची कार्यकर्ती?

या 9 वर्षांच्या मणिपुरी पर्यावरणवादी कार्यकर्तीला (Licypriya Kangujam) दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. काय झालं नेमकं? नोबेलसाठी चर्चेत असलेल्या ग्रेटा थनबर्गची (Greta Thunberg) आठवण देणारी ही छोटी कार्यकर्ती आहे तरी कोण?

     नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : गेल्या रविवारी प्रचंड सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या राजधानीतल्या संसद भवन परिसरात हातात फलक घेऊन निदर्शनं करणाऱ्या दोन छोट्या कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन समज देऊन सोडून दिलं. त्यानंतर भारताची ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg of India)म्हणून या 9 वर्षांच्या कार्यकर्तीने देशाचं लक्ष वेधलं आहे. या छोट्या पर्यावरण कार्यकर्तीचं नाव आहे (Licypriya Kangujam) लिसिप्रिया कांगुजाम. दिल्लीत राहणारी नऊ वर्षांची लिसिप्रिया कांगुजाम या छोटीला पर्यावरण, वायू प्रदूषण याविषयी पोटतिडिकीने काही सांगायचं आहे. त्यासाठी ती निदर्शनं करत असते. गेल्या रविवारी तिने 12 वर्षांच्या आरव सेठ या आपल्या सहकाऱ्यासोबत हायली रिस्ट्रिक्टेड सिक्युरिटी झोन असलेल्या संसद भवन परिसरात वायू प्रदूषणाविरोधात निदर्शनं करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना पोलीस व्हॅनमध्ये बसवलं आणि जंतर-मंतर जवळ सोडलं.  ‘पुन्हा मोस्ट हायली रिस्ट्रिक्टेड सिक्युरिटी झोनमध्ये निदर्शनं करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला अटक करावी लागेल', अशी समज पोलिसांनी त्यांना गाडीतून उतरवताना दिली. ही गोष्ट सोशल मीडियातून जगभर पसरल्यावर लहान मुलांना अटक केल्यामुळे दिल्ली पोलिसांवर टीका करायला सुरुवात केली पण लिसिप्रियाने सोशल मीडियावरूनन आपल्याला पोलिसांनी जंतरमंतरला सोडल्याचं सांगितलं. लिसिप्रियानी वयाच्या सातव्या वर्षापासून पर्यावरण रक्षण आणि वायू प्रदूषणाविरुद्ध निदर्शनं केली आहेत. त्यामुळे तिला  ‘भारताची ग्रेटा’ म्हणूनही ओळखतात. रविवारी नेमकं काय झालं? लिसिप्रिया आणि आरव हातात फलक धरून संसद भवनाजवळ रविवारी वायू प्रदूषणाविरुद्ध निदर्शनं करत होते. लिसिप्रियाने ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार ते 40 मिनिटं तिथं निदर्शनं करत होते त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कारमधून दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले. दिल्ली पोलिसांनी त्या दोघांना अटक केली होती का? नाही. लिसिप्रिया आणि आरव यांना पोलिसांनी अटक केली नव्हती. ‘पोलिसांनी आम्हाला पहिल्यांदा संसद भवन पोलीस चौकीत नेण्याचा प्रयत्न केला पण नंतर त्यांनी आम्हाला जंतर-मंतरला सोडलं. पोलिसांनी आम्हाला इशारा दिला की पुन्हा संसद भवन परिसरातील मोस्ट हायली रिस्ट्रिक्टेड सिक्युरिटी झोनमध्ये तुम्ही निदर्शनं करण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही तुम्हाला अटक करू. पोलिसांनी मला त्यांच्या मुलीप्रमाणे वागवलं आणि त्यामुळेच इशारा देऊन सोडून दिलं,’ असं लिसिप्रियानेच ट्विट करून नंतर सांगितलं. लिसिप्रियाचा गुन्हा काय होता? लिसिप्रियानी ट्विटरवरून सांगितलं, ‘ मी दर आठवड्याला वायू प्रदूषणाबद्दल जागृती करण्यासाठी हाय सिक्युरिटी झोनमध्ये निदर्शनं करते. पण माझी चूक ही झाली की मी मोस्ट हायली रिस्ट्रिक्टेड सिक्युरिटी झोनमध्ये निदर्शनं केली. पण पोलिसांनी मला इशारा देऊन जंतर-मंतरला सोडून दिलं. तिला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर सोशल मीडियावर अनेकांनी दिल्ली पोलिसांनी लहान मुलांना अटक केल्याची टीका करायला सुरुवात केली होती. कोण आहे लिसिप्रिया कांगुजाम? लिसिप्रिया मूळची मणिपूरची आहे. आता दिल्लीत राहते. सात वर्षांची असल्यापासून म्हणजे 2018 पासून लिसिप्रियाने पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी निदर्शनं सुरू केली. त्याचवर्षी ग्रेटा थनबर्गनी ‘स्ट्राइक फॉर क्लायमेट’ हे जगविख्यात आंदोलन सुरू केलं.  पुढे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्याविरोधात थेट भूमिका घेतल्यामुळे ग्रेटा जगप्रसिद्ध झाली. आता लिसिप्रियाला लोक भारतीय ग्रेटा म्हणू लागले आहेत. तिला आतापर्यंत डॉ. एपीजे अब्दुल कलाम चिल्ड्रन पुरस्कार, वर्ल्ड चिल्ड्रन पीस प्राइज, इंडिया पीस प्राइज देऊन गौरवण्यात आलं आहे. 'मोदीजी माझं ऐकत नाहीत, पुरस्कार नको' लिसिप्रिया वादातही राहिली आहे. एक पर्यावरणवादी म्हणून तिच्या छोट्याशा करिअरमध्ये तिनी अनेक गोष्टी केल्या आहेत. या वर्षी मार्च महिन्यात जागतिक महिला दिनी तिला भारत सरकारने 'SheInspiredUs' पुरस्कार जाहीर केला होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या मागण्या ऐकत नाहीत असं म्हणून तिनं तो नाकारला होता. पुरस्कार नाकारताना तिनं लिहिलं होतं की, ‘प्रिय मोदीजी, माझ्या मागण्या तुम्ही मान्य करू शकत नसाल तर माझा गौरवही करू नका. माझी या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल धन्यवाद. पण खूप विचार केल्यानंतर मी हा पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.’ सप्टेंबर 2020 मध्ये लिसिप्रियाने तत्कालिन केंद्रयी शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांच्या निवासस्थानासमोरही निदर्शनं करत नीट आणि जेईईच्या परीक्षा पुढे ढकलण्याचं आवाहन केलं होतं.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Air pollution, Delhi, Environment, Greta Thunberg

    पुढील बातम्या