नवी दिल्ली, 21 जून : सर्वत्र आज फादर्स डे साजरा केला जात आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे बहुतेक वडील यंदा घरात आपल्या मुलांसह हा दिवस साजरा करू शकत आहेत. मात्र कोरोना लढ्यात प्रत्यक्ष सहभागी असलेले कोरोना योद्धा आणि त्यांची मुलं यांच्यासाठी मात्र हा फादर्स डे थोडा वेगळा आहे. एकिकडे कोरोनाच्या परिस्थितीत आपला जीव धोक्यात टाकत कोरोना योद्धा आपलं कर्तव्य निभावत आहेत. तर दुसरीकडे त्याचवेळी एक बाप म्हणून आपल्या मुलांची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागते आहे. हे सर्व करत असताना अनेकदा तशी परिस्थिती ओढावल्यास हा कोरोना योद्धा बाप आपल्यातील बापाला आवरून आपल्या ड्युटीला प्राधान्य देतो.
आज फादर्स डेच्या निमित्नाने एएनआयने अशाच कोरोना योद्धा बापाची कहाणी जाणून घेतली आहे. त्यांच्या नजरेतून कोरोनाच्या या परिस्थितीत फादर्स डे म्हणजे नेमका काय? हे जाणून घेतलं आहे.
सेंट्रल दिल्लीचे पोलीस उपायुक्त संजय भाटिया यांना एक 17 वर्षाची मुलगी आणि एक 18 वर्षांचा मुलगा अशी दोन मुलं आहे. पोलीस म्हटलं की कामाचे तास काही निश्चित नाहीत अशा वेळी आपल्या कुटुंबाला त्यांना बऱ्याच वेळा वेळ देता नाहीत.
"माझा दिवस सकाळी सात वाजता सुरु होतो आणि जेव्हा मी घरी पोहोचतो त्यावेळी माझी मुलं झोपलेली असतात. मला त्यांना खूप कमी वेळ देता येतो. त्यांची आई त्यांच्यासोबत असते मात्र त्यांना वडीलांचीही गरज आहे असं मला वाटतं. हा माझा सर्वात मोठा तोटा आहे", असं भाटिया म्हणाले.
हे वाचा - Father Day 2020: 'तुम्ही माझं आयुष्य पूर्णपणे बदललं',करणचं मुलांसाठी हे खास पत्र
कोरोनाच्या परिस्थिती आपली ड्युटी बजावत असताना वडील म्हणून ते जबाबदारी कशी पेलत आहेत, याबाबत बोलताना ते म्हणाले, "मी घरात कोरोनाव्हायरस तर घेऊन जाणार नाही, ही भीती सतत मनात असते. ज्यावेळी मी कोरोना प्रभावित क्षेत्रात किंवा रुग्णालयात जातो तेव्हा माझ्या मुलांचं संरक्षण करणं ही माझी भूमिका असते. मी घरी जायला घाबरतो. जेव्हा मी घरी पोहोचतो मी आवश्यक ती पूर्ण खबरदारी घेतो. मी सर्वकाही सॅनिटाइझ केलं ना, मी स्वत: पूर्ण स्वच्छ झालो ना याची खात्री करतो. त्यानंतर माझ्या कुटुंबाला भेटतो"
मात्र कोरोनाच्या या परिस्थिती त्यांनी फादर्स डेला आपला वेळ मुलांना देण्याचं ठरवलं आहे.
भाटिया म्हणाले, "फादर्स डेला आम्ही सामान्यपणे गोल्फ खेळतो, सर्व कुटुंब एकत्र जेवण करतो आणि ग्रीटिंग कार्ड बनवतो आणि माझ्यासाठी काहीतरी विशेष तयार करतो. मात्र आता कोरोनाच्या परिस्थितीत रेस्टॉरंट्स बंद आहेत. त्यामुळे मी त्यांना बाहेर घेऊन जाऊ शकत नाही. मात्र आम्ही इंडोर गेम खेळू किंवा त्यांसह त्यांचा अभ्यास, भविष्याबाबत त्यांनी काय विचार केला आहे, याबाबत बोलू. तसंच जे काही चांगलं करता येईल ते आम्ही करू. एमर्जन्सी परिस्थिती वगळता माझा वेळ मी माझ्या मुलांना देणार आहे"
हे वाचा - Father's Day 2020 : वडिलांबरोबरचा बेस्ट सेल्फी करा शेअर
डॉ. पी वेंकटा क्रिष्णन यांंनाही 12 वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांची मुलगी आहे. त्यांनाही कोरोना रुग्णांना सेवा देताना आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही.
"माझ्या मुलांना वेळ देण्यासाठी मी माझ्या कामाचे तास निश्चित केलेत आणि एकदा घरी गेल्यानंतर मोबाइलवर जास्त वेळ घालवत नाही. मी शक्यतो फारसे कॉल उचलत नाही. काही महत्त्वाचं नसेल तर मी मेसेजवरच बोलतो", असं क्रिष्णन यांनी सांगितलं.
एक डॉक्टर असल्याने कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीत कुटुंबाची जबाबदारी पेलतानाही त्यांना खूप आव्हानांचा सामना करावा लागतो.
हे वाचा - बाप तो बाप होता है! बॉलिवूडचे सुपर कूल डॅडी ज्यांनी मुलांना दिलं सर्वोत्तम गिफ्ट
"मी 90% घरापासून दूर असतो. हे फक्त मुलांसाठीच नाही तर माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी कठिण जातं. जवळपास तीन महिने झाले मी माझ्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. दिवसभर काम करून घरी पोहोचल्यानंतर मला स्वत:ला सॅनिटाइझ करावं लागतं आणि त्यालाच अर्धा तास लागतो. सॅनिटायझेशन हे सर्वात मोठं आव्हान असतं. मी स्वत: संक्रमित होऊ नये आणि कुटुंबालाही संक्रमित करू नये, यासाठी मला पुरेपूर काळजी घ्यावी लागते. माझ्या मुलांना माझ्या कुशीत झोपायचं असतं. मात्र मी त्यांना माझ्यासह झोपू देत नाही कारण मला त्यांना संक्रमित होऊ द्यायचं नाही. मुलं आणि माझ्यामध्ये हा असा दुरावा येतो आणि त्याचं मला खूप दुःख वाटतं", असं ते म्हणाले.
क्रिष्णन म्हणाले, "सामान्यपणे फादर्स डेला आम्ही बाहेर जातो, लंच आणि डिनर करतो. मात्र सध्या कोरोनाच्या परिस्थिती आम्हाला तसं करता येणार नाही. त्यामुळे आम्ही घरच्या घरीच कुटुंबासोबत खेळणं, एकत्र एखादा मुव्ही पाहण्याचा विचार करत आहोत"
हे वाचा - Miss You: 'या' क्रिकेटपटूंनी पूर्ण केलं आपल्या दिवंगत वडिलांचं स्वप्न पण...
पहाड गंज पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल संजय कुमार यांना तर अवघ्या सहा वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी आहे. कुटुंबापेक्षा सर्वात जास्त वेळ ते ड्युटीवर असतात. जेव्हा ते घरी येणार असं सांगतात. तेव्हा त्यांची मुलं त्यांची आतुरतेने वाट पाहत असतात.
"जेव्हा मी घरी परततो तेव्हा माझी मुलं मला दरवाजावर पाहताच आनंदी होतात. ते इतके उत्साही असतात की मला मिठी मारायला धावतात आणि मी त्यांना माझ्यापासून दूर करतो. त्यावेळी मला अजिबात चांगलं वाटत नाही. मात्र दुसरा पर्याय नाही", असं कुमार यांनी सांगितलं.
कुमार म्हणाले, "कुटुंबापेक्षा आता देशाला आमची गरज आहे. त्यामुळे यंदाचा फादर्स डे देशासाठी समर्पित आहे. ड्युटीपासून आम्ही पळ काढणार नाही. देशासाठी कर्तव्य बजावण्याची आम्ही प्रतिज्ञा घेतली आहे"
असे हे कोरोना योद्धा ज्यांच्यासाठी आपल्या कुटुंबापेक्षा देशसेवा महत्त्वाची आहे. कोरोनाच्या लढ्यात त्यांना मदत करणं ही आपली जबाबदारी आहे.
संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona warriors, Fathers day 2020