जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय? तज्ज्ञांनी सांगितली लक्षणं आणि उपचार

डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय? तज्ज्ञांनी सांगितली लक्षणं आणि उपचार

डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय? तज्ज्ञांनी सांगितली लक्षणं आणि उपचार

ब्लड शुगर वेळीच नियंत्रणात आणली गेली नाही तर संबंधित रुग्णाच्या डोळे, किडनी आदी अवयवांवर परिणाम होतो. डायबेटिक रुग्णांमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी ही समस्या दिसून येते.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 20 फेब्रुवारी : डायबेटिस अर्थात मधुमेह हा गंभीर आणि गुंतागुंतीचा आजार मानला जातो. ब्लड शुगर वेळीच नियंत्रणात आणली गेली नाही तर संबंधित रुग्णाच्या डोळे, किडनी आदी अवयवांवर परिणाम होतो. डायबेटिक रुग्णांमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी ही समस्या दिसून येते. या आजाराची लक्षणं आणि उपचार पद्धती नेमकी काय असते हे जाणून घेऊया. या आजाराविषयी गुंटूर येथील व्हिट्रोरेटिनल सर्व्हिसेस शंकरा नेत्र रुग्णालयाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. मधु कुमार आर. यांनी सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. मधु कुमार यांना 15 वर्षाचा अनुभव असून ते शंकरा नेत्र रुग्णालयाशी संबंधित आहेत. त्यांनी शंकरा नेत्र रुग्णालयातून प्रॅक्टिस सुरु केली आहे. व्हिट्रोरेटिनल या विषयाचे ते तज्ज्ञ असून त्यांनी आत्तापर्यंत 2000 व्हिट्रोरेटिनल शस्त्रक्रिया केल्या आहेत. डायबिटीजमुळे जाऊ शकते दृष्टी! डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी डायबेटिक रेटिनोपॅथी हा एक प्रकारचा आजार आहे. डायबेटिस झालेल्या रुग्णांमध्ये डोळ्याचा हा आजार दिसून येतो. हाय ब्लड शुगर लेव्हलमुळे रेटिनाला रक्त पुरवठा करणाऱ्या लहान रक्तवाहिन्यांच्या जाळ्याला हानी पोहोचल्याने हा आजार उद्भवतो. सुरुवातीच्या टप्प्यात या आजाराची लक्षणं फारशी तीव्र नसतात. काही रुग्णांना दृष्टीत बदल जाणवू लागतात तसेच वाचताना अथवा दूरच्या वस्तू पाहताना त्रास जाणवतो. नंतरच्या टप्प्यात रेटिनातील रक्तवाहिन्यांमधून व्हिट्ररस फ्लुइड स्रवतं आणि ते डोळ्यात पसरल्याने तात्पुरती किंवा कायमची दृष्टी जाऊ शकते.

    News18लोकमत
    News18लोकमत

    डायबेटिक रेटिनोपॅथीचा धोका कोणाला? डायबेटिस टाइप -1किंवा डायबेटिस टाइप -2 असलेल्या रुग्णांत डायबेटिक रेटिनोपॅथी विकसित होऊ शकतो. गर्भावस्थेतील डायबेटिसमध्ये महिलांना हा आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे गॅस्टॅशिअल अर्थात गर्भावस्थेत डायबेटिसचे निदान झाल्यानंतर तात्काळ डोळ्यांची तपासणी करणं आवश्यक आहे. डायबेटिक रेटिनोपॅथीची काही प्रमुख लक्षणं - अधून-मधून दृष्टी अंधूक होणं. - दृष्टीचं स्वरूप बदलणं. - फ्लोटिंग स्पॉट्समुळे रंग बदल होणं. - रात्रीच्या वेळी अंधूक दिसणं. डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे उद्भवू शकतात या गंभीर समस्या - डायबेटिक मॅक्युलर एडिमा : जेव्हा डोळ्यातील मॅक्युलामध्ये जास्त प्रमाणात द्रव तयार होण्यास सुरुवात होते, तेव्हा दृष्टी अंधूक होऊ लागते. - निओ व्हॅस्क्युलर ग्लायकोमा : याला सामान्यतः दुय्यम काचबिंदू म्हणतात. बुब्बुळावरील नवीन वाहिन्या विकसित झाल्याने ही स्थिती निर्माण होते. - रेटिनल डिटॅचमेंट: डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे तुमच्या डोळ्याच्या मागील बाजूला चट्टे येऊ लागतात. या समस्येवर वेळीच योग्य उपचार न केल्यास, डायबेटिक रेटिनोपॅथीच्या गुंतागुंतीमुळे दृष्टी कायमची जाऊ शकते. उपचार डोळ्यावर किती परिणाम झाला आहे, यावर उपचार अवलंबून असतात. डोळ्याची स्थिती, गुंतागुंत यानुसार तुमचे नेत्रतज्ज्ञ लेझर उपचार किंवा सर्जरी या पैकी एक उपाय सुचवतात. काही निवडक स्थितीत इंट्राव्हिट्रियल इंजेक्शनचीदेखील शिफारस केली जाऊ शकते. सामान्यतः ब्लड ग्लुकोजची पातळी नियंत्रणात आली की दृष्टी सामान्य होते. ग्लुकोजची पातळी सामान्य असूनही अंधूकपणा कमी होत नसेल तर ते रेटिनोपॅथीचं लक्षण मानलं जातं. अंधत्वाचं हे प्रमुख कारण ठरतं. नेत्ररोगतज्ज्ञ सखोल तपासणीतून दृष्टी कमी होणं किंवा इतर समस्या कशामुळे निर्माण होत आहेत हे तपासतात. त्याचप्रमाणे डोळ्याची लक्ष केंद्रित करण्याची आणि जवळचं तसंच दूरचं पाहण्याची क्षमता तपासतात. साध्या वाटणाऱ्या या सवयींमुळे डोळ्यांचे होते नुकसान! तुम्ही अशी चूक करत नाही ना? डायबेटिक रेटिनोपॅथी टाळण्यासाठी डायबेटिस नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणासाठी रोज व्यायाम करा, योग्य आहार घ्या आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचं काटेकोर पालन करा. इन्सुलिन आणि औषधं वेळच्यावेळी घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोळ्यांची नियमित तपासणी करा. यामुळे वेळीच आजाराचे निदान होईल. डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे असलेला अंधत्वाचा धोका उपचारांच्या माध्यमातून दूर करता येईल. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात