दिल्ली, 9 मे: कोरोना काळात (Corona pandemic) वाढलेलं वजन कमी कसं करावं याबाबत अनेक जण काळजी करतात. गोळ्या, औषधांचे दुष्परिणाम आणि व्यायामासाठी अपुरा वेळ यामुळे लठ्ठपणा कसा कमी करावा अशी चिंता जगभर बहुतेक जणांना भेडसावते आहे. आता ही काळजी वेगन डाएटमुळे (vegan diet) कमी होऊ शकते. वेगन म्हणजे केवळ वनस्पतींपासून तयार केलेले पदार्थ सेवन करणं. या डाएटमध्ये प्राणीजन्य, दुग्धजन्य पदार्थांचा समावेश होत नाही. नेदरलँड्समध्ये केलेल्या एका संशोधनानुसार, तीन महिने केवळ वेगन डाएट घेऊन सर्वसाधारणपणे 7.25 किलो वजन कमी करता येऊ शकतं. हे सांगण्याचं कारण म्हणजे हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियनने नुकतंच तिचं वजन कमी केलं आणि त्याचं श्रेय वेगन डाएटला दिलं होतं. त्यानंतर वेगन डाएट जगभर चर्चेत आलं. आज तक ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
नेदरलँड्समधील मास्ट्रीचमध्ये स्थुलतेविषयीच्या युरोपीय काँग्रेसमध्ये सादर करण्यात आलेल्या एका संशोधनात वेगन डाएटचं परीक्षण करण्यासाठी 11 वैज्ञानिक पद्धतींनी केलेल्या डाएटचा आढावा घेण्यात आला. या अभ्यासात लठ्ठ आणि टाईप 2 डायबेटिसचे पेशंट असे एकूण 800 ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. यातील निष्कर्षांनुसार, ज्यांनी पाश्चात्य आहार पद्धती सोडून वेगन आहार पद्धतीचा अवलंब केला, त्यांचं वजन जवळपास 7.25 किलोंनी कमी झालं. ज्यांनी क्रॅश डाएट केलं, त्यांचं वजन जवळपास 4.08 किलोनी कमी झालं. वेगन डाएट घेणाऱ्यांच्या शरीरातील ब्लड शुगरची पातळी आणि कोलेस्टेरॉलचं प्रमाण इतर डाएट घेणाऱ्यांच्या तुलनेत चांगलं असल्याचं आढळलं.
अशा प्रकारच्या डाएटमुळे पोटाचा घेर कमी होतो, कारण यात बहुतांश तंतूमय पदार्थांचा समावेश असतो. त्यामुळे वजन कमी होण्याची (weight loss) दाट शक्यता असते, असं कोपनहेगन युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे प्रमुख अॅनी डिटे टर्मनसेन (Anne-Ditte Termannsen) यांनी या संशोधनात सांगितलं. मात्र इतर कार्डिओमेटॅबोलिक परिणामांसाठी अजून संशोधन करण्याची आवश्यकताही त्यांनी नमूद केली. जे लोक अशा प्रकारचं वेगन डाएट घेतात, त्यांच्यात प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या काही जीवनसत्वांची कमतरता जाणवू शकते. उदाहरणार्थ प्राणीजन्य पदार्थांमध्ये आढळणाऱ्या B 12 या जीवनसत्त्वाचा वेगन डाएट घेणाऱ्यांमध्ये अभाव असू शकतो. म्हणून अशा जीवनसत्त्वांची कमतरता गोळ्या, औषधांमधून भरून काढण्याचा सल्ला वेगन डाएट घेणाऱ्यांना दिला जातो.
हेही वाचा '... यासाठी आधी माझी हिंमतच होत नसे', Bold Photoshoot नंतर समंथाचा खुलासा
अभिनेत्री मर्लिन मन्रोने 1962 मध्ये घातलेल्या ड्रेसमध्ये एकदम फीट बसण्यासाठी हॉलिवूड अभिनेत्री कीम कार्दिशियनने सध्या तिचं जवळपास 7 किलो वजन कमी केलं आहे. हे वजन वेगन डाएटमुळे कमी झाल्याचं तिनं सांगितलं. लो कार्ब (low carb diet) आणि नो कार्ब डाएट, दिवसातून दोन वेळा व्यायाम आणि पुरेशी झोप हे तिच्या फिटनेसचं कारण असल्याचं ती म्हणाली होती.
किमचं अनुसरण असो की वजन घटवण्याचा डॉक्टरांनी दिलेला सल्ला असो, वजन कमी करणाऱ्यांनी वेगन डाएट फायद्याचं ठरेल हे मात्र संशोधनाअंती सिद्ध झालंय. तुम्हीही या डाएटचा विचार करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kim kardashian, Vegan, Weight loss