गाझियाबाद, 25 डिसेंबर : उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh) गाझियाबादमधल्या (Ghaziabad) इंदिरापुरम इथल्या रफत परवीन (41) यांच्यावर मृत्यूने अचानक आघात केला आणि त्यांचा लढा दुर्दैवाने अयशस्वी ठरला. पण मृत्युपश्चात अवयवदानाच्या (Organ Donation) त्यांच्या कुटुंबीयांच्या निर्णयामुळे चौघांना नवं जीवन मिळालं आहे. त्यांची मूत्रपिंडं, यकृत आणि हृदय हे अवयव गरजू रुग्णांच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले.
19 डिसेंबर रोजी रफत (Rafat Parveen) यांना अचानक होऊ लागलेल्या प्रचंड डोकेदुखीमुळे वैशाली (Vaishali) इथल्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये (Max Hospital) दाखल करण्यात आलं. त्यांना अॅन्युरिझम (Aneyurism) असल्याचं तपासण्यानंतर स्पष्ट झालं. त्यांच्या मेंदूतल्या एका रक्तवाहिनीतून रक्तस्राव होत होता आणि तो मेंदूत पसरत चालला होता. त्यामुळे गुंतागुंत वाढत गेली आणि अखेर डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड (Brain Dead) म्हणून घोषित केलं. तिचा मृत्यूविरोधातला लढा अयशस्वी ठरला असला, तरी तिच्या कुटुंबीयांनी खंबीरपणे अवयवदानाचा निर्णय घेतला, जेणेकरून गरजूंना नवं जीवन मिळेल आणि तिच्या स्मृती टिकून राहू शकतील.
कुटुंबीयांच्या परवानगीनंतर डॉक्टर्सनी नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्स्प्लांट ऑर्गनायझेशनशी (NOTO) संपर्क साधून ही माहिती दिली. त्यानंतर दिल्लीतील साकेत भागातल्या मॅक्स हॉस्पिटलमधल्या गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपण (Organ Transplant) करण्याचा निर्णय झाला.
हे वाचा - बापरे, दीड महिन्याच्या बाळाच्या श्वसननलिकेत अडकली होती सेफ्टी पिन!
रफत यांचं हृदय (Heart) वैशाली मॅक्स हॉस्पिटलमधून दिल्ली साकेतमधल्या (Delhi Saket) मॅक्स हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. ग्रीन कॉरिडॉर (Green Corridor) लागू केलेला असल्यामुळे 23.8 किलोमीटरचं अंतर केवळ 18 मिनिटांत कापण्यात आलं. उत्तराखंडच्या 56 वर्षीय रुग्णाला रफत यांचं हृदय बसवण्यात आलं. हा रुग्ण बरेच दिवस गंभीर आजारी होता.
रफतचं एक मूत्रपिंड (Kidney) गाझियाबादमधल्या 37 वर्षीय महिलेला, तर दुसरं मूत्रपिंड गुरुग्रामच्या आर्टिमिस हॉस्पिटलमधल्या रुग्णाला प्रत्यारोपित करण्यात आलं. ग्रीन कॉरिडॉरमुळे गुरुग्रामपर्यंतचं अंतर केवळ 45 मिनिटांत कापण्यात आलं. रफतचं यकृत (Liver) दिल्लीच्या 59 वर्षीय महिलेला बसवण्यात आलं.
हे वाचा - अरे देवा! 2021 मध्येही भयंकर व्हायरसचं संकट? अज्ञात आजाराचा रुग्ण सापडला
अशा रीतीने रफतने चार रुग्णांना नवं जीवन दिलं आहे. आताच्या काळात अवयवदानाची गरज वाढली आहे. कारण अवयव एका शरीरातून काढून दुसऱ्या शरीरात त्यांचं प्रत्यारोपण करण्याचं विज्ञान आता चांगलं प्रगत झालं आहे. कोणाचा मृत्यू कधी होणार हे आपल्या हातात नसतं; मात्र जवळच्या व्यक्तीच्या निधनाच्या धक्क्यात आणि दुःखात असतानाही मन खंबीर करून अवयवदानासारखा निर्णय घेणं हे कौतुकास्पद असतं. कारण त्यामुळे आणखी अनेक जणांना हे जग नव्याने पाहता येणार असतं. त्यामुळे अवयवदानाबद्दलची जनजागृती करण्यासाठी अलीकडे विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Organ donation