
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रेटिक पार्टीच्या जो बायडन आणि रिपब्लिकन पार्टीच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कमालीची चुरस होती. आता बायडन नवे अध्यक्ष असतील हे निश्चित झालं आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडे मोठ्या प्रमाणात पॉवर असते तर त्यांना पगार देखील प्रचंड मिळतो. त्याचबरोबर विविध प्रकारचे भत्तेदेखील मिळतात. त्याचबरोबर जगभरातील कोणत्याच राष्ट्राध्यक्षला न मिळणाऱ्या सुविधा देखील मिळतात. पण तरीही महासत्तेच्या प्रमुखाचा पगार सर्वोच्च नाही.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षला वर्षाला 400,000 डॉलर म्हणजेच 2.9 कोटी रुपये पगार मिळतो. त्याचबरोबर विविध भत्तेदेखील मिळतात. तसंच पदावर असेपर्यंत व्हाईट हाऊसमध्ये राहणं, पर्सनल प्लेन, हेलिकॉप्टर यांसारख्या सुविधा देखील मिळतात. तसंच पदावरून पायउतार झाल्यावर पेन्शनदेखील मिळतं. हा सगळा खर्च हा सरकारी तिजोरीतूनच होत असतो.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षला वर्षाला 50,000 डॉलर म्हणजेच 40 लाख रुपये भत्ता मिळतो. त्याचबरोबर एक लाख डॉलर म्हणजेच 80 लाख रुपये प्रवासावर खर्च करू शकतात. यासाठी त्यांना कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. तसंच वर्षाला 19000 डॉलर म्हणजेच 14 लाख रुपये मनोरंजन भत्ता म्हणून मिळतो. अमेरिकन राष्ट्रपतींच्या पगारावर टॅक्स घेतला जातो. पण भत्त्यांवर कोणताही टॅक्स लागत नाही.

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे कुटुंबीय डिझायनरकडून कपडे गिफ्टमध्ये घेत नाहीत. परंतु जर त्यांनी ते घेतले तर एकदा घातल्यानंतर ते सरकारच्या संग्रहालयामध्ये जमा केले जातात.

2001 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा पगार 200,000 डॉलर म्हणजेच 1.45 कोटी रुपये होता. त्यानंतर काँग्रेसने यामध्ये वाढ करून 50,000 डॉलर एक्सपेन्सेस अलाउंस म्हणून दिला. परंतु बिझनेसमन असलेल्या ट्रम्प यांच्यासाठी ही खूपच छोटी रक्कम आहे. फोर्ब्सनुसार ट्रम्प यांच्याकडे 3.1 बिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे.

प्रत्येक अमेरिकन राष्ट्राध्यक्षासाठी व्हाईट हाऊस हे त्यांचे अधिकृत निवासस्थान आहे. 1792 मध्ये सर्वांत आधी अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला हे देण्यात आलं होतं. यामध्ये सहा मजले असून १३२ खोल्या आहेत. याचबरोबर विविध प्रकारचे कक्षदेखील असून टेनिस कोर्ट आणि स्विमिंग पूलदेखील आहे. त्याचबरोबर 51 सिट्सचं एक थिएटर असून या ठिकाणी विविध चित्रपटांच्या प्रदर्शनाबरोबरच अन्य कार्यक्रम देखील होतात.

व्हाईट हाऊस आपल्या मनाप्रमाणे सजवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबियांना 100000 डॉलर अतिरिक्त मिळतात. बराक ओबामा यांनी या निधीचा वापर या कामासाठी न करता दुसऱ्या ठिकाणी याचा वापर केला.एनबीसीच्या रिपोर्टनुसार डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी 1.75 मिलियन डॉलर रक्कम नवीन फर्निचर आणि भिंतींच्या सजावटींसाठी खर्च केली होती.

राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबाला दिल्या जाणाऱ्या व्हाईट हाउसमध्ये खूप मोठा बगीचा देखील असतो. बराक ओबामा यांची पत्नी या बागेत स्वतः बागकाम करत असे आणि शाळेतील मुलांना आमंत्रित करून त्यांना याची माहिती देत असे. या बागेत विविध प्रकारच्या भाज्या आणि फळे देखील पिकवली जातात. या भाज्यांचा आणि फळांचा वापर व्हाईट हाऊसमध्ये केला जातो. राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबाबरोबरच या ठिकाणी नोकर, आचारी आणि बागकाम करण्यांबरोबरच हाऊसकिपींग समवेत 100 लोक राहतात.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष साधारणपणे सुट्ट्यांच्या काळात मेरीलँडमधील कॅम्प डेव्हिडमध्ये जातात. या ठिकाणी राष्ट्रपतींसाठी खास अधिकृत निवासस्थान आहे. यामध्ये जिम, स्विमिंग पूल, एयरक्राफ्ट हँगर अशा देखील सुविधा असतात.

अमेरिकेच्या राष्ट्रपतींना खास बोइंग 747 विमान मिळतं. हे विमान खूप भव्य असून आतमध्ये 4000 स्क्वेअर फूट जागा आहे. यामध्ये मेडिकल आपरेटिंग रूम, राष्ट्राध्यक्षांसाठी प्रायव्हेट कॅमेरा आणि एकाचवेळी 100 लोकांची बसण्याची क्षमता असते. हे विमान उडवण्यासाठी तासाला 200000 डॉलर इतका खर्च येतो. त्याचबरोबर राष्ट्राध्यक्षांना मरीन वन हेलिकॉप्टर देखील उपलब्ध असतं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वाहनातून प्रवास करतात ते वाहन पूर्णपणे बुलेट आणि बॉम्बप्रूफ असतं. द बीस्ट्स असं या वाहनाचं नाव असून राष्ट्रपतींबरोबर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था असते.
 
 
 




