ब्रिटन, 06 जानेवारी : 2020 हे वर्ष कोरोनानं (Corona Pandemic) व्यापून टाकलं होतं आणि 2021 सुरू होतं न होतं तोपर्यंत ब्रिटनमधील कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनने (Corona New Strain) धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. माणसांपासून शारीरिक अंतर राखण्याची निकड असलेल्या या काळात ब्रिटनमधलं ल्यूक (Luke) (34) आणि सारा (Sarah) (36) हे दाम्पत्य मात्र या सगळ्यापासून बरंच दूर आहे. एका बेटावर राहून कमीत कमी गरजांमध्ये राहत हे दाम्पत्य आपलं जीवन सुखानं जगत आहे.
लीड्समधलं (Leeds) हे दाम्पत्य आयर्लंडच्या (Ireland) काउंटी डोनेगलच्या पश्चिम किनाऱ्यापासून दूर असलेल्या ओवे आयलंडवर (Owey Island) आहे. ब्रिटनमध्ये लॉकडाउन लागू झाला, त्याच्या दोन दिवस आधीच म्हणजे 14 मार्च 2020 रोजी हे दाम्पत्य साहसी प्रवास मोहीम आखून या बेटावर पोहोचलं होतं. 'लीड्स लाइव्ह'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
एकीकडे सारी मानवजात एक प्रकारे विकासाचे साइड-इफेक्ट्स भोगत असताना, हे दाम्पत्य मात्र किमान गरजांमध्ये सुखी आयुष्य व्यतीत करत आहे.
हे दाम्पत्य तिथे एका छोट्या झोपडीत राहत आहे. तिथे वीज, गॅस किंवा नळाचं पाणी अशा किमान सुविधाही उपलब्ध नाहीत. पावसाचं पाणी साठवण्यासाठी (Rainwater Harvesting) त्यांच्याकडे एक टाकी असून, कोळसे पेटवून वातावरणात ऊब तयार करण्याचा प्रयत्न ते करतात. गॅस सिलिंडरचा वापर करून अन्न शिजवतात आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं चार्ज करण्यासाठी सौर ऊर्जेचा (Solar Panels) वापर करतात. शारीरिक स्वच्छता, तसंच कपडे धुणे वगैरे कामांसाठी ते विहिरीचं पाणीही वापरतात.
हे वाचा - खासदारबाईंनी केला कोविडकाळात प्रवास, इतकी टीका झाली की वैतागून दिला राजीनामा
अन्नाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे दाम्पत्य स्वतः शेतीही करत असून, अंड्यांसाठी कोंबडीपालनही करत आहे. खाण्यासाठी ताजे मासे किंवा समुद्रातील अन्य जीव ते पकडतात. अशा रीतीने आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाशी त्यांनी जुळवून घेतलं आहे. मनुष्य वस्तीपासून दूर राहत असल्यामुळे त्या दोघांनाही काही कौशल्यं शिकण्यावाचून पर्याय नव्हता. ल्यूकला इथे जाण्याआधी मासेमारी येत नव्हती; पण तो आता तिथे सापडणारे पोलॉक जातीचे मासेही सहज पकडू शकतो.
हे वाचा - नव्या कोरोनाच्या दहशतीत मोठा दिलासा! अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
या बेटावर काही घरंही आहेत. मात्र केवळ उन्हाळी हंगामातच तिथे लोक वास्तव्य करतात. याआधी थंडीच्या हंगामात या बेटावर माणसं राहिली होती ते साल होतं 1974.
कोरोनाने जगभर घातलेल्या गोंधळाची ल्यूक आणि साराला फारशी जाणीव नाही. संथ गतीचं जीवन आणि जगण्याचा नवा मार्ग अनुभवणं यासाठी आम्ही वर्षभर या बेटावर येऊन राहिलो, असं या दाम्पत्याने लीड्स लाइव्हला सांगितलं. अत्याधुनिक जगापासून दूर असल्यामुळे पुरातन काळातल्या माणसाप्रमाणे सीफूड मिठाच्या साह्याने दीर्घ काळ साठवून ठेवण्याची कलाही या दाम्पत्याने अवगत केली आहे. हे बेट खडकाळ असून, 300 एकर क्षेत्रफळाचं आहे. इथून मुख्य जगात जायचं असेल, तर एकच मार्ग आहे. एका छोट्या होडीने दुसऱ्या एका बेटावर जावं लागतं. तिथून आयर्लंडला जोडलेला एक पूल आहे. त्यावरून आयर्लंडला जाता येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lifestyle, Wedding couple