अंकारा, 01 जुलै : दीर्घायुषी (live long) होण्याचं स्वप्न अनेक जण पाहत असतात. तसंच वाढदिवसाच्या (birthday) शुभेच्छा देतानाही ‘जियो हजारो साल…’ असं म्हटलं जातं. ‘हजारो साल’ जगणं प्रत्यक्षात शक्य नसलं, तरी दीर्घायुष्याची भावना त्यात अभिप्रेत असते. सध्याच्या काळात माणसाचं सरासरी आयुर्मान वाढलं असलं तरी वाढता ताणतणाव, बदलती जीवनशैली यामुळे कमी वयात मृत्यू होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. त्यातच कोरोनासारख्या जागतिक साथीचे रोग आहेतच. पण ज्याच्या आयुष्याची दोरी बळकट असते, त्याला याने काही फरक पडत नाही. त्यापैकीच अक आहेत 119 वर्षांच्या या आजी (Oldest woman). टर्कीमधल्या (Turkey) अमास्या (Amasya) या उत्तरेकडच्या शहरात राहणाऱ्या सिकर अर्सलान (Seker Arslan) नावाच्या आजींनी रविवारी (27 जून) त्यांचा 119 वा वाढदिवस साजरा केल्याचा दावा केला आहे. अर्सलान यांना सहा मुलं, 12 नातवंडं आहेत. एक मुलगी, जावई आणि दोन नातवंडांसह त्या राहतात. अर्सलान यांच्या ड्रायव्हिंग लायसेन्सवर दिलेल्या माहितीनुसार त्यांचा जन्म 27 जून 1902 रोजी झाला आहे. त्यामुळे त्या 119 वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांनी त्यांचा वाढदिवस कुटुंबीयांसह मोठ्या उत्साहात साजरा केल्याचं वृत्त टर्कीमधल्या माध्यमांनी दिलं आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या वाढदिवसाच्या केकवर मात्र 120 या आकड्याच्या मेणबत्त्या लावल्या होत्या, असं फोटोत दिसतं आहे. त्यांच्या जन्मतारखेची नोंद घेऊन अधिकृतपणे त्याबाबत पडताळणी केली जावी, असं स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना वाटतं. कारण त्यामुळे सध्या जगात हयात असलेल्या सर्वांत वयोवृद्ध व्यक्तीचा मान (Oldest person alive) त्यांना मिळेल. सध्या हा मान जपानच्या केन तनाका यांच्या नावावर आहे. त्या अर्सलान यांच्यानंतर सहा महिन्यांनी, 2 जानेवारी 1903 रोजी जन्मल्या आहेत. हे वाचा - हे काम कर लागेल मुलांची लाइन; लग्नासाठी मुलगा न सापडणाऱ्या नातीला आजीच्या टिप्स आपली आईही 110 वर्षं जगली होती, असं अर्सलान सांगतात. पौष्टिक आहार हे त्यांच्या तब्येतीचं आणि दीर्घायुष्याचं रहस्य आहे. डेली मेल च्या रिपोर्टनुसार अर्सलान यांची मुलगी सेरप युक्सेल (Serap Yueksel) सांगते, की नैसर्गिक आणि पौष्टिक आहार (Natural Food) हे तिच्या आईच्या दीर्घायुष्याचं रहस्य आहे. बटर, चीज, मध यांचा माझ्या आईच्या आहारात कायम समावेश असतो. ती योगर्टही नियमितपणे खाते. नाश्त्याला उकडलेलं अंडं खाण्याचीही सवय तिला आहे,’ आपल्या आईला अल्झायमर्स डिसीज (Alzheimer’s Disease) वगळता अन्य कोणताही शारीरिक विकार नाही, असंही सेरप यांनी नमूद केलं. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या कुटुंबात कोरोनाने (Corona) शिरकाव केला होता. मात्र कुटुंबीयांनी घेतलेली काळजी आणि उत्तम तब्येत यांमुळे एकाच घरात राहूनही अर्सलान यांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही. पहिलं जागतिक महायुद्ध, स्पॅनिश फ्लूची जागतिक महामारी, ओटोमन साम्राज्याचा अस्त, दुसरं जागतिक महायुद्ध, शीतयुद्ध आणि आताची कोविड महामारी अशा प्रदीर्घ काळातल्या महत्त्वाच्या टप्प्यांच्या त्या साक्षीदार आहेत. प्रार्थना करणं आणि जुन्या आठवणी जागवणं, यातच त्यांचा दिवसभराचा वेळ जातो, असं त्यांची मुलगी सांगते. हे वाचा - कसं शक्य आहे! हृदयाशिवाय तब्बल 555 दिवस जिवंत राहिला हा तरुण फ्रान्समधल्या जीन काल्मेंट (Jean Calment) यांची आतापर्यंतच्या सर्वांत जास्त जगलेल्या व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे. 21 फेब्रुवारी 1875 रोजी जन्मलेल्या जीन यांचा 4 ऑगस्ट 1997 रोजी मृत्यू झाला. म्हणजेच मृत्युसमयी त्यांचं वय 122 वर्षं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.