मुंबई, 25 नोव्हेंबर : दिवाळीनंतर सगळीकडे वेध लागतात ते तुळशी विवाहाचे (Tulsi vivah 2020). देशभरात सर्वत्र कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीपासून (ekadashi 2020) वैकुंठ चतुर्दशीपर्यंत पारंपरिक प्रथेनुसार तुळशी विवाह मोठ्या उत्साहाने धूमधडाक्यात साजरा केला जातो. या एकादशीला हरिप्रबोधिनी एकादशीही म्हटलं जातं. या दिवशी भगवान श्रीकृष्ण चातुर्मासातील निद्रेतून जागृत होतात. यंदा 25 नोव्हेंबरला ही एकादशी आली आहे.
महाराष्ट्रात द्वादशी ते वैकुंठ चतुदर्शीपर्यंत किंवा काही ठिकाणी पौर्णिमेलाही तुळशी विवाह साजरा केला जातो. या दिवसापासून लग्न, मुंज अशा अन्य शुभकाऱ्यांना प्रारंभ केला जातो. तुळशी विवाह करणाऱ्याला कन्यादानाचं पुण्य मिळतं असंही मानलं जातं, तर वर्षातील सर्व 24 एकादशींचं व्रत करणाऱ्यांना मोक्ष मिळतो असंही मानलं जातं.
तुम्हीही तुळशी विवाह साजरा करत असाल तर अशी करा तयारी
तुळशी विवाह करताना तुळशीचं रोप अंगणात किंवा घरात जिथं हा समारंभ होणार आहे तिथं मध्यभागी ठेवा. त्याला मेंदी, चंदन, सौभाग्यलंकार यांनी सजवा. पूजा साहित्यात अक्षता, फुलं, हार, हळद-कुंकू ठेवा. प्रसादासाठी मिठाई ठेवा.
पूजेत या गोष्टी अर्पण करा
महाराष्ट्रात तुळशीच्या विवाहासाठी बोरं, आवळा, चिंच या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर काही ठिकाणी मुळा, बीट, शिंगाडा, सीताफळ, पेरू आणि इतर फळंही ठेवतात. लग्नासाठी करतात तसे फराळाचं जिन्नस लाडू, चिवडा, पेढे, मिठाईचे पदार्थही घरी केले जातात किंवा विकत आणले जातात.
पूजेत या गोष्टींचा वापर करा
तुळशी विवाह जिथं करणार ती जागा फुलं, तोरणं, माळा यांनी सजवावी. तुळशीचं रोप असलेल्या पात्रात किंवा त्याच्या खाली पाटावर श्रीकृष्णाची मूर्ती ठेवा. त्यानंतर विधिवत त्यांची पूजा करा. मंगलाष्टके म्हणत लग्न लावा. काही ठिकाणी गुरुजी बोलावूनही लग्न लावलं जातं. यामध्ये होमहवन केलं जातं. पाहुण्यांनाही आमंत्रण दिलं जातं. भोजन समारंभ केला जातो.
तुळशी विवाहाची कथा
तुळशी विवाहाची कथा या वेळी आवर्जून सांगितली जाते. एकदा देवी तुळशीनं नाराज होऊन भगवान विष्णू यांना शाप दिला की तुझं काळ्या पाषाणात रुपांतर होईल. त्यानुसार त्यांचं दगडात रूपांतर झाले. या शापातून मुक्त होण्यासाठी भगवान विष्णू यांनी शाळीग्रामाचे रूप धारण केलं. त्यानंतर त्यांनी देवी तुळशीशी विवाह केला. देवी तुळशी ही देवी लक्ष्मीचा अवतार आहे, असं मानलं जातं. म्हणून आपणही तुळशीच्या लग्नावेळी श्रीकृष्णांचं आणि तुळशीमातेचं लग्न लावतो आणि त्याचा आनंद साजरा करतो.