मुंबई, 3 मार्च : कॅन्सरला मुळापासून नष्ट करणारे ठोस उपचार अजूनही उपलब्ध झालेले नाहीत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (डब्ल्यूएचओ) मते, 2020 मध्ये एक कोटीहून अधिक जणांच्या मृत्यूसाठी कॅन्सर हा घातक आजार कारणीभूत होता. या आकडेवारीवर नजर टाकल्यास प्रत्येक सहा मृत्युंपैकी एक मृत्यू कॅन्सरमुळे होतो, असं लक्षात येतं. कॅन्सर हा असा आजार आहे, त्याचं नाव ऐकताच माणूस मानसिकदृष्ट्या खचतो. या आजाराची भीती लोकांच्या हृदयात व मनात घर करून बसते. कॅन्सरच्या बहुतांश प्रकरणांमध्ये बैठी जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी कारणीभूत असतात. बदलत्या जीवनशैलीमुळे हा आजार आणखीनच धोकादायक बनला आहे. कॅन्सरची लक्षणं लवकर लक्षात आल्यास त्यावर सहज उपचार करता येतात. घशाचा कॅन्सर हा एक असा प्रकार आहे ज्याची लक्षणं खूप लवकर दिसू लागतात. प्रामुख्यानं सिगारेट, दारू, तंबाखू, गुटखा आदी पदार्थांमुळे घशाचा कॅन्सर होतो. घशाच्या कॅन्सरची लक्षणं वेळीच लक्षात आली तर हा जीवघेणा आजार टाळता येऊ शकतो.
Ovarian Cancer : ‘ओव्हेरियन कॅन्सर’ महिलांसाठी ठरू शकतो जीवघेणा, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्षकानात वेदना होणं, मानेवर सूज येणं, अन्न-पाणी गिळण्यास त्रास होणं यांसारख्या लक्षणांच्या आधारे घशाचा कॅन्सर सुरुवातीलाच ओळखता येतो. या लक्षणांनंतर जर एखादी व्यक्ती सतर्क झाली आणि वेळीच डॉक्टरांकडे गेली तर कॅन्सरवर सहज उपचार होऊ शकतात.
घशाच्या कॅन्सरचे प्रकार घशाच्या कॅन्सरची लक्षणं जाणून घेण्यापूर्वी त्याचे प्रकार जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानुसार त्याची लक्षणं समजून घेण्यास जास्त मदत होते. मेयो क्लिनिकच्या मते, घशात सहा प्रकारचे कॅन्सर विकसित होऊ शकतात. 1. नेझोफॅरिन्झियल कॅन्सर - याची सुरुवात नाकपुड्यांपासून होते. म्हणजेच हा कॅन्सर नाकाच्या अगदी मूळापासून सुरू होतो. 2. ओरोफॅरिन्झियल कॅन्सर - याची सुरुवात तोंडाच्या मागील भागापासून होते. टॉन्सिल्समधील कॅन्सर हा याचाच एक भाग आहे. 3. हायपोफॅरिन्झियल कॅन्सर - घशाच्या खाली आणि अन्ननलिकेच्यावर हा कॅन्सर होतो. 4. ग्लॉटिक कॅन्सर- याची सुरुवात व्होकल कॉर्डपासून होते. 5. सुपरग्लॉटिक कॅन्सर- हा कॅन्सर स्वरयंत्राच्या वरच्या भागापासून सुरू होतो. यामुळे अन्न गिळता येत नाही. 6. सबग्लोटिक कॅन्सर- हा कॅन्सर स्वरयंत्राच्या तळापासून सुरू होतो. घशाच्या कॅन्सरची लक्षणं 1. कफ - काही घशाच्या कॅन्सरमध्ये छातीत कफ साठतो. थुंकीवाटे जास्त दिवस कफ येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. 2. आवाजात बदल - आवाजात अचानक भारदस्तपणा येणं किंवा आवाजात बदल होणं, हे घशाच्या कॅन्सरचं अगदी सुरुवातीचं लक्षण आहे. आवाजातील हा बदल दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिला तर लगेच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. 3. गिळण्यात अडचण येणं - जेव्हा अन्न-पाणी गिळण्यात अडचण येते, अन्न घशात अडकल्यासारखं वाटतं, तेव्हा ताबडतोब डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. कारण, हे घशाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. 4. वजन कमी होणं - कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरमध्ये व्यक्तीचं वजन कमी होतं. त्यामुळे कोणतंही कारण नसताना अचानक वजन कमी होत असल्यास तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. 5. कानात वेदना होणं - कानदेखील आपल्या मानेचा भाग असतो. त्यामुळे कानात सतत दुखत असेल आणि ही वेदना लवकर दूर होत नसेल, तर ते घशाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. 6. मानेच्या पुढील बाजूला सूज येणं - जर मानेच्या पुढील बाजूला खालच्या भागात सूज आली असेल आणि उपचार करूनही ती बरी होत नसेल तर हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं. अशी समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. मानसिक आरोग्याची काळजी घेण्याची वेळ; या 5 टिप्समुळे जीवनात घडेल मोठा बदल (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

)







