Home /News /lifestyle /

लग्नाच्या वयाची तर खूप चर्चा होते, परंतू आई होण्याचं योग्य वय काय?

लग्नाच्या वयाची तर खूप चर्चा होते, परंतू आई होण्याचं योग्य वय काय?

स्त्रियांच्या व पुढच्या पिढीच्या आरोग्याचा विचार केल्यास योग्य वयातच आई होणं गरजेचं आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनीही हेच मत व्यक्त केलं आहे.

    नवी दिल्ली, 23 जून : एखाद्या स्त्रीसाठी आईपण ही निसर्गानं दिलेली देणगी असते. ती योग्य वयात मिळणं आईच्या व मुलांच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. सध्या अनेक स्त्रिया करिअर आणि शिक्षणाच्या नावाखाली मूलाला जन्म देणं लांबवतात. मग जेव्हा खरंच मूल हवं असतं, तेव्हा निरनिराळे उपाय करावे लागतात. पूर्वी लग्न झाल्यावर एक-दोन वर्षांतच घरी पाळणा हलायचा. आता मात्र नवरा-बायको दोघांनाही प्रायव्हसी एन्जॉय करायची असते. त्यामुळे फॅमिली प्लॅनिंग (Family Planning) मागे पडतं. तज्ज्ञांच्या मते या लांबलेल्या पाळण्यामुळे गरोदरपणात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. स्त्रियांच्या आरोग्यावरदेखील विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. मग आई होण्यासाठी नक्की कोणतं वय (Right Age To Be A Mother) योग्य आहे? कोणत्या वयात बाळ होऊ द्यावं? याबाबत टीव्ही 9 हिंदीनं सविस्तर वृत्त दिलं आहे. स्त्रियांसाठी 21 ते 30 वर्ष हे वय आई होण्यासाठी योग्य असतं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. गुंजन आयव्हीएफ वर्ल्डच्या संस्थापक गुंजन गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, करिअर करण्यासाठी स्त्रिया फॅमिली प्लॅनिंग लांबवत असतील, तर ते चुकीचं आहे. कारण 30 वर्षांनंतर गरोदरपणात (Pregnancy) अडचणी येऊ शकतात. जर 35 वयानंतर आई होण्यासाठी प्रयत्न केला, तर मुलांमध्ये अ‍ॅबनॉर्मल आनुवंशिक गुण येऊ शकतात. त्याचवेळी लहान वयात आई होणंही खूप जास्त धोकादायक असतं. 20व्या वर्षी आई झाल्यामुळे गरोदरपणात अडचणी येऊ शकतात. यात बाळाची वाढ पुरेशी न होणं ही मुख्य अडचण असू शकते. मग अशा परिस्थितीत वेळेआधीच मूल जन्माला येऊ शकतं. अशा प्रसूतींमध्ये पोस्टपार्टम हॅमरेजचा (PPH) धोका असतो. यामुळे जिवावर बेतू शकतं. त्यामुळे आई होण्यासाठी 21 ते 30 हेच वय योग्य (Age For Pregnancy) असल्याचं डॉ. गुंजन गुप्ता यांना वाटतं. डॉ. गरिमा शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, तिशीनंतर होणाऱ्या प्रसूतींमध्ये मुलांमध्ये आनुवंशिक गुण अ‍ॅबनॉर्मल असण्याचा धोका निर्माण होतो. वाढत्या वयाबरोबर इतर आजार उद्भवण्याचीही शक्यता असते. तिशीनंतर मधुमेह (Diabetes) किंवा उच्च रक्तदाबासारखे (High Blood Pressure) आजार मागे लागण्याची भीती असते. अशा परिस्थितीत गरोदर राहण्यासाठी अडचणी येऊ शकतात. काही वेळा गर्भपात होऊ शकतो, तर कधी वेळेआधी मूल जन्माला येण्याचा धोका असतो. स्त्रियांच्या शरीरात एएमएच (AM Hormone) नावाचा एक हॉर्मोन असतो. यावरून स्त्रियांच्या शरीरातील बीजांडनिर्मितीची क्षमता ओळखू येते. वय वाढतं, तसं शरीरातील हे हॉर्मोन कमी होऊ लागतं. तिशीनंतर तर ही प्रक्रिया खूप वेगानं घडते, असं फर्टिलिटी एक्स्पर्ट, डॉक्टर मीनाक्षी आर्या यांनी सांगितलं आहे. हे हॉर्मोन्स कमी झाले, म्हणजे बीजांडनिर्मितीही कमी होते. एक मुलगी जन्माला आल्यावर तिच्या शरीरात लाखो बीजांड असतात. तिशीपर्यंत आल्यावर त्यातील काही लाखच शिल्लक राहतात. चाळीशीत तर बहुसंख्य बीजांड कमी झालेली असतात किंवा नसतातच. स्त्रियांच्या व पुढच्या पिढीच्या आरोग्याचा विचार केल्यास योग्य वयातच आई होणं गरजेचं आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनीही हेच मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे स्त्रियांनी फार काळ न थांबता 21 ते 30 वयातच गरोदर राहण्याचा विचार करावा.
    First published:

    Tags: FAMILY, Mother, Pregnancy

    पुढील बातम्या