• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • कोरोनाचा नवा व्हेरियंट अधिक संसर्गक्षम; एका व्यक्तीपासून तिघांना संसर्ग

कोरोनाचा नवा व्हेरियंट अधिक संसर्गक्षम; एका व्यक्तीपासून तिघांना संसर्ग

सध्याच्या भयानक कोरोना स्ट्रेनचं (Corona Strain)अस्तित्व फेब्रुवारी महिन्यातच महाराष्ट्रात होतं; मात्र लोकल रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर त्या विषाणूला पसरण्यासाठी अनुकूल वातावरण मिळालं आणि त्यातून दुसरी लाट आली, असा दावाही या अभ्यासातून करण्यात आला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 05 मे : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने (Corona Second Wave) भारतात दररोज नवनव्या प्रकारचे उच्चांक गाठले जात आहेत. या लाटेत संसर्गाचा वेग जास्त आहे आणि संसर्गग्रस्तांना गंभीर स्वरूपाचा आजार होण्याचं प्रमाणही जास्त असल्याचं आढळून येत आहे. म्हणूनच ही लाट नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. तसंच आकडेवारीच्या अभ्यासातूनही उपाययोजनांसंदर्भात विचार केला जात आहे. मुंबईतली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) आणि बेंगळुरूतली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc)यांच्या स्टॅटिस्टिकल मॉडेलमधून (Statistical Model) आणखी नव्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्यानुसार, दुसऱ्या लाटेत प्रामुख्याने ज्याचा प्रसार होतो आहे, तो कोरोना विषाणूचा व्हेरियंट (Corona Variant) पूर्वीच्या व्हेरियंटच्या तुलनेत अडीच पट अधिक संसर्गक्षम (Transmissible) आहे, असं आढळून आलं आहे. त्यामुळे या नव्या स्ट्रेनची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या किमान तीन व्यक्तींना त्याच्यापासून संसर्ग होऊ शकतो, असं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. हिंदुस्तान टाइम्सने याबद्दलचं वृत्त दिलंआहे. 'R0 या इंडिकेटरमध्ये वाढ झाली आहे. व्हायरसचा नवा व्हेरियंट अधिक संसर्गक्षम असल्याचं ते निदर्शक आहे. त्यामुळेच दुसऱ्या लाटेत विषाणूचा वेगाने प्रसार होत आहे आणि अधिकाधिक व्यक्तींना संसर्ग होत आहे,'असं टीआयएफआरमधल्या सिम्युलेशन प्रोजेक्टचे समन्वयक संदीप जुनेजा यांनी सांगितलं. लसीकरण मोहिमेत कोणताही अडथळा न येता ती सुरू राहिली आणि कोणताही नवा व्हेरियंट आला नाही, तर मुंबईतल्या कोविड-19 च्या मृतांचा आकडा एक जूनपर्यंत कमी होऊ शकेल, असा अंदाजही या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे. हे ही वाचा-कोरोना रुग्णांवर आता आयुर्वेदिक औषधाने उपचार; AYUSH 64 घेण्याचा सरकारचा सल्ला या गणितीय मॉडेलद्वारे (Mathematical Model) मुंबईतल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कारणांचं बारकाईने विश्लेषण केलं जात आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतल्या मृतांची संख्या वाढेल, असा अंदाजही या अभ्यासातून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र एक जुलैपर्यंत शहरात शाळा सुरू करण्याच्या स्थितीपर्यंत येऊ शकेल, असा अंदाजही या अभ्यासातून मांडण्यात आला आहे. भविष्यातील या अंदाजात काही चुकाही होऊ शकतात,असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्याच्या भयानक कोरोना स्ट्रेनचं (Corona Strain)अस्तित्व फेब्रुवारी महिन्यातच महाराष्ट्रात होतं; मात्र लोकल रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर त्या विषाणूला पसरण्यासाठी अनुकूल वातावरण मिळालं आणि त्यातून दुसरी लाट आली, असा दावाही या अभ्यासातून करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेचं गाडं सुरळीत करण्यासाठी सर्व व्यवहार फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आले. त्यामुळेदेखील कोरोना संसर्गात प्रचंड वाढ झाली आणि घातक व्हेरियंटचा प्रसार झाला, असं विश्लेषणातून उघड झाल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे. सरकारी आकडेवारीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एकट्या एप्रिल महिन्यातच 2.3 लाख मुंबईकरांना संसर्ग झाला असून, 1479 मुंबईकरांचे प्राण गेले आहेत. एक मे रोजी मुंबईत 90 मृत्यूंची नोंद झाली.2021 मधला हा एकाच दिवसातल्या मृत्यूंचा सर्वांत मोठा आकडा आहे.
  First published: