नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर: गेल्या काही वर्षांमध्ये अनेक तरुणांचा हार्ट अॅटॅकनं म्हणजेच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यामध्ये सामान्य तरुण-तरुणींचाच नाही तर प्रसिद्ध दिग्गज कलाकारांचादेखील समावेश आहे. ताणतणाव, चुकीची जीवनशैली आणि आहार यामुळे हृदयविकाराचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे. पूर्वी असं मानलं जात होतं की, स्त्रियांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा जास्त धोका असतो. परंतु, आता जगभरातील महिलांमध्ये ही समस्या अतिशय सामान्य झाली आहे. स्त्रिया हृदयविकाराची लक्षणं वेळेवर ओळखू शकत नाहीत, असं निदर्शनास आलं आहे. स्त्रियांमधील हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं ओळखण्यासाठी अमेरिकेतील हार्वर्ड हेल्थ इन्स्टिट्युटनं नुकतंच एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणानुसार, 95 टक्के स्त्रियांना हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना अगोदर अनेक सामान्य लक्षणं जाणवतात. जी वेळीच ओळखता आली तर हृदयविकाराचा धोका टाळता येऊ शकतो. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हार्वर्ड हेल्थ इन्स्टिट्युटनं आपल्या सर्वेक्षणामध्ये हृदयविकाराच्या झटक्यातून बचावलेल्या 500 स्त्रियांचा अभ्यास केला. हृदयविकाराचा झटका अचानक येतो, हा समज या सर्वेक्षणामुळे खोटा ठरला आहे. कारण, बहुतेकवेळा झटका येण्याच्या महिनाभर अगोदर शरीरामध्ये काही बदल होतात. हे बदल लक्षात येणं गरजेचं आहे. सर्वेक्षणातील 95 टक्के स्त्रियांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी त्यांना अनेक शारीरिक समस्या जाणवू लागल्या. थकवा येणं आणि झोप न लागणं या दोन सर्वांत सामान्य समस्या होत्या. जवळजवळ प्रत्येक स्त्रीनं या समस्यांचा सामना केला होता. याशिवाय श्वास घेण्यास अडचण येणं, अशक्तपणा, चिकट घाम येणं, चक्कर येणं आणि मळमळ होणं ही महिलांना हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी जाणवलेली काही प्रमुख लक्षणं होती. पुरुषांना हृदयविकाराचा झटका येताना छातीत वेदना होतात. मात्र, महिलांना जाणवणाऱ्या लक्षणांमध्ये हे लक्षण सर्वांत खालच्या क्रमांकावर आहे. हावर्डच्या रिसर्चमधील फक्त एक तृतीयांश महिलांना हृदयविकाराच्या झटक्यावेळी छातीत वेदना जाणवत होत्या. ज्या मोजक्या महिलांना छातीत वेदना जाणवल्या त्यांनाही छातीवर दाब जाणवण्याऐवजी छातीचे स्नायू आखडल्यासारखं वाटलं होतं. हेही वाचा - प्रेग्न्सीचं एकही लक्षण नाही; वजन कमी होऊन पोटात तीव्र वेदना झाल्या आणि महिलेने अचानक दिला बाळाला जन्म हृदयविकाराचा झटका आल्यास काय करावं? ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार (NHS), हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळावी यासाठी ताबडतोब रुग्णवाहिका बोलवावी. रुग्णवाहिका पोहचेपर्यंत पेशंटने अॅस्प्रिन ही गोळी चावून खावी. अॅस्प्रिनची अॅलर्जी असल्यास गोळी देऊ नये. अॅस्पिरिनमुळे रक्त पातळ होतं आणि हृदयातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला काही काळ आराम मिळतो. NHSच्या मते, हृदयविकाराचा झटका किती गंभीर आहे आणि त्याचा प्रभाव किती आहे, यावर उपचार अवलंबून असतात. रक्ताच्या गुठळ्या विरघळण्यासाठी औषधांचा वापर आणि हृदयासाठी आवश्यक असलेला रक्तपुरवठा पूर्ववत करण्यासाठी शस्त्रक्रिया, अशा दोन प्रकारचे मुख्य उपचार केले जातात. संशोधनासाठी सर्वेक्षण ठरणार उपयुक्त या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांवर भाष्य करताना हार्वर्ड हेल्थ इन्स्टिट्युटनं म्हटलं आहे की, ‘अत्यंत थकवा, झोपेचा त्रास किंवा दम लागणं ही महिलांमधील हृदयविकाराच्या झटक्याची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. ही लक्षणं वेळीच लक्षात आल्यास उपचार घेऊन हृदयविकाराचा झटका टाळता येऊ शकतो.’ झटका येताना छातीत दुखण्यापलीकडेही इतर काही लक्षणं दिसतात. याबाबत महिला आणि डॉक्टरांनी विचार करण्याची गरज असल्याचं, हावर्डमधील आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. जर एखाद्या महिलेला श्वासोच्छवासाचा त्रास, झोप न येण्याचा त्रास, थकवा, थंड घाम येणं, चक्कर येणं आणि मळमळ यासारख्या तक्रारी असतील तर त्याकडेही गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. वेळीच डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली पाहिजे. धोका कमी करण्यासाठी काही उपाय हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून जीवनशैली निरोगी ठेवावी. ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या मते, सकस आहार घेऊन, फिजिकल अॅक्टिव्हिटी करून आणि वजन नियंत्रणात ठेवून तुम्ही या समस्येपासून स्वत:चा बचाव करू शकता. शरीर आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी धूम्रपान आणि मद्यपानदेखील सोडलं पाहिजे. यासोबतच महिलांनी त्यांचं ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल आणि ग्लुकोजची पातळी यावरही लक्ष ठेवलं पाहिजे. विशेषत: या समस्यांनी ग्रस्त असलेल्या महिलांनी वेळोवेळी तपासणी करणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.