
स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा - जास्तीत जास्त लोकांसमोर स्वतःला व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही लोकांशी तासनतास बोलत रहा, त्यांच्याशी मनापासून बोला. स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तुम्ही लोकांशी संवाद साधता. परंतु, प्रत्येकाशी भावनिकदृष्ट्या जोडले जात नाही.

समोरच्या व्यक्तीला त्याची मर्यादा सांगा - तुमचा कोणी गैरफायदा घेऊ नये, असं तुम्हाला वाटत असेल, तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या नातेसंबंधात काही सीमा निश्चित करा. स्वतःसाठी आवाज उठवा. लोकांना तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका.

न मागता मदत करू नका - न मागता कोणाचीही मदत करू नका, हे तुमच्या जीवनाचं तत्त्व बनवा. न मागता मदत केल्याने संबंधित व्यक्तीला ती मदत वाटत नाही. याशिवाय, असं केल्याने, आपण कधीकधी आपल्यासाठी असलेल्या काही गोष्टी किंवा नवीन संधी स्वतः न घेता त्या फुकटात इतरांना देऊन टाकतो.

तुमच्या वैयक्तिक गोष्टी सगळ्यांसोबत शेअर करू नका- तुमच्या वैयक्तिक गोष्टी फक्त तुमच्या खास लोकांशी शेअर करा. लक्षात ठेवा, प्रत्येकजण चांगला असू शकत नाही. तुमच्या बोलण्यातून तुमची कमजोरी शोधून तुमच्या वैयक्तिक गोष्टी इतरांशी शेअर करून समोरची व्यक्ती तुमची खिल्ली उडवू शकते.

प्रत्येकाचं ऐकू नका - प्रत्येकाचं ऐकून घ्या पण शेवटी आपल्या मनाचे ऐका. स्वतःला योग्य वाटेल तेच करा. ही गोष्ट गाठीशी बांधून ठेवा. स्वतःच्या कल्पना स्पष्टपणे मांडा. स्वतःचा आदर करायला शिका, तरच लोक तुमचा आदर करतील.

डोअर मॅट बनू नका - जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी तुमची उपस्थिती सतत देत राहिलात तर काही काळानंतर तुम्ही तुमचं त्या व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्व गमावू लागाल. अशी व्यक्ती तुमच्या भावनांना तुच्छ लेखते आणि तुम्हाला गृहीत धरू लागते. त्याला वाटू लागतं की, तुम्ही रिकामे बसला आहात. तुम्हाला दुसरं काही काम नाही. अशा परिस्थितीत, दुसऱ्याचे डोअर मॅट बनणे टाळा (कुणाच्या पायाखालचं पायपुसणं बनू नका) आणि लोकांना तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका.

आपल्याला कोणीही कामापुरतं महत्त्व देतं आणि त्यानंतर आपल्या भावनांचा विचार करत नाही, असं लक्षात आल्यानंतर सर्वांनाच त्रास होतो. घरच्या लोकांकडूनही हे होत असतं. अनेकदा लोक आपल्याला गृहीत धरत असल्यामुळे हे होतं. कारण त्यांच्या कोणत्याही वेळेला आपण त्यांच्यासाठी available राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यामुळे आपलीच किंमत कमी होते. तुम्हालाही असंच काही वाटत असेल तर, सर्वप्रथम तुमच्या स्वभावात काही बदल घडवून आणा.




