इस्लामपूर, 22 सप्टेंबर : ग्रहण आहे हो… काही चिरू नको, तोडू नको… असे एक ना दोन कित्येक सल्ले प्रेग्ननंट महिलेला दिले जातात. ग्रहणात गर्भवती महिलांना काहीच करू दिलं जात नाही. का, तर यामुळे बाळात व्यंग निर्माण होतं. ग्रहणात आईने असं काही केल्यास तिच्या पोटातील बाळावर ग्रहण काळात त्याचा परिणाम होता आणि जन्माला येणाऱ्या बाळामध्ये काही ना काही दोष असतो, अशी अंधश्रद्धा आजही कायम आहे. आजही कित्येक महिलांच्या मनात ही भीती आहे. अगदी सुशिक्षित महिलादेखील हे सर्व मानत नसल्या तरी बाळाच्या चिंतेने त्या याकडे दुर्लक्षही करत नाही. असे नियम त्यादेखील पाळतात. हे सर्व खोटं आहे, असं काहीच होत नाही हे दाखवण्याचं धाडसही कुणी करत नाही. मात्र असं धाडस केलं ते कोल्हापुरातल्या एका महिलेने. महाराष्ट्र टाइम्स च्या वृत्तानुसार, इस्लामपुरातील समृद्धी चंदन या महिलेनं सूर्यग्रहणात जे काही करू नये ते सर्व केलं आणि आता तिनं एका सृदृढ आणि निरोगी बाळाला जन्म दिला आहे. 21 जून, 2020 रोजी झालेल्या सूर्यग्रहाणात समृद्धी यांनी भाजी चिरली, फळं तोडली, स्वयंपाकही केला, जेवली. यामध्ये तिच्या कुटुंबानंही तिला साथ दिली. इतकंच नव्हे तर तिनं आवश्यक ती काळजी घेऊन सूर्यग्रहणही पाहिलं. आता तिची प्रसूती झाली. एका गोंडस मुलीला तिनं जन्म दिला. जिच्यावर या सर्वाचा काहीच परिणाम झाला नाही. उलट ती एकदम ठणठणीत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हे वाचा - ताप आल्यावर साधा फ्लू आहे की कोरोना कसं ओळखायचं? काय आहे फरक ग्रहणाचा मानवी जीवनावर, गर्भवती महिलेवर, तिच्या बाळावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. याबाबत अंनिसनं जनजागृती केली. त्यामुळेच मी आणि माझ्या कुटुंबाने हे धाडसी पाऊल उचललं. आता यापुढील प्रत्येक ग्रहणात मी आणि माझं कुटुंबं अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रबोधन करणार आहोत, असा निर्धार समृद्धी यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.