लस घेतल्यावर अनेकांना ताप येणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे असे अनेक त्रास होत असल्याचं आढळलं आहे. अशावेळी लस घेताना डॉक्टर, संशोधक यांनी सांगितलेल्या सल्ल्याचं पालन करणं महत्त्वाचं असतं. रशियात सध्या संशोधकांमध्ये अशाच एका सल्ल्यावरून वादविवाद रंगला आहे.
रशियातील सेराटोव प्रांतांचे उपआरोग्यमंत्री डॉ. डेनिस ग्रेफर यांनी लस घेणाऱ्या नागरिकांना लस घेतल्यानंतर किमान तीन दिवस सेक्स करू नये असा सल्ला दिला आहे.
सेक्स करताना शरीरात तणाव वाढतो जो लस घेतल्यानंतर शरीरात होत असलेल्या बदलांच्या काळात योग्य नाही, असं त्यांचं म्हणणं आहे
सेक्समध्ये मोठ्या प्रमाणात शारीरिक ऊर्जा वापरली जाते. त्यामुळं लस घेतल्यानंतर अधिक ऊर्जा लागणाऱ्या सेक्ससारख्या कोणत्याही क्रिया करू नयेत, असा सल्ला आम्ही नागरिकांना देतो, असं त्यांनी यावेळी सांगितलं
त्यांच्या या सल्ल्यावर डॉ. ग्रेफर यांचे वरिष्ठ ओलेग कोस्टीन यांनीच टीका केली आहे. लस घेतल्यानंतर सेक्स करण्यास हरकत नाही, मात्र थोडी काळजी घ्या. अतिरेक करू नका, लोकांना एवढी समज नक्की असेल, असं ओलेग कोस्टीन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ‘स्पुटनिक व्ही’ ही लस विकसित करणाऱ्या रशियातच लसीकरणाचा वेग अत्यंत कमी असल्याचं दिसत आहे. युरोपियन देशात 30 टक्के लसीकरण झालं आहे, तर रशियात आतापर्यंत केवळ 13 टक्के लोकांनाच लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. यावरून रशियावर टीकाही होत आहे.