मुंबई, 24 ऑगस्ट: गरोदरपणा हा स्त्रीच्या आयुष्यातला सुखद काळ असतो. आवडीच्या गोष्टी करणं, आवडीचे पदार्थ खाणं आणि आराम असं स्वतःचे लाड पुरवणं या वेळी जमतं. कुटुंबातले इतर सदस्यही या काळात गरोदर स्त्रीचं कोडकौतुक करतात. सगळी काळजी घेतली, तर गरोदरपणात सहसा काही अडचण येत नाही. मात्र काही स्त्रियांच्या बाबतीत अडचणी येऊ शकतात. यूटीआय, उच्च रक्तदाब अशा आरोग्याच्या तक्रारींना स्त्रियांना सामोरं जावं लागू शकतं. काही समस्या गरोदरपणात अचानक तर काही गरोदरपणाच्या आधी उद्भवतात. अशा समस्यांविषयी इंडिया डॉट कॉमनं सविस्तर वृत्त दिलं आहे. स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. माधुरी बुरांडे लाहा यांनी गरोदरपणात उद्भवणाऱ्या काही समस्यांविषयी माहिती दिली आहे. या समस्यांवर वेळीच उपचार घेतले नाहीत, तर ते आई किंवा बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. 1. गरोदरपणात सामान्यतः उलट्या, मळमळ, अन्नावरची वासना उडणं, पित्त अशा गोष्टी कमी-अधिक प्रमाणात घडतात. मात्र त्यांची तीव्रता जास्त झाली, तर डिहायड्रेशन होऊ शकतं. यामुळे बाळ आणि आईच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा समस्यांवर लगेचच उपाय करणं हिताचं असतं. 2. मूत्रमार्गातील संसर्ग (UTI), इतर व्हायरल इनफेक्शन्स आणि योनीमार्गातील संसर्ग याकडेही वेळीच लक्ष दिलं पाहिजे. याबाबत अंगावर काढण्याची प्रवृत्ती पुढे जाऊन घातक ठरू शकते. 3. एचआयव्ही, काविळ, सिफिली, क्षयरोग अशा आजारांमुळे आई व बाळावर दुष्परिणाम होतो. त्यासाठी असे आजार सुरुवातीच्या टप्प्यातच लक्षात येणं गरजेचं असतं. त्यासाठी प्राथमिक अवस्थेत चाचण्या करणं, आजारांवर योग्य उपचार करणं व लसीकरण हे करता येतं. हेही वाचा - सूर्यास्तानंतर जन्मलेली माणसं असतात प्रचंड आशावादी; त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हे आहेत खास पैलू
4. पहिल्या तीन महिन्यांत गर्भपात (Abortion) होण्याची शक्यता असते. गरोदर राहण्याआधीपासूनच उपचार सुरु केले, तर काही गर्भपात टाळता येऊ शकतात, तर वेळेत उपचार सुरू करूनही काहीवेळा गर्भपाताचा धोका टळतो. गरोदर मातेचा रक्तगट निगेटिव्ह आणि नवऱ्याचा रक्तगट पॉझिटिव्ह असेल आणि जन्माला आलेल्या बाळाचा रक्तगट पॉझिटिव्ह असेल, तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. अँटिबॉडीज तयार झाल्यामुळे ही समस्या निर्माण होते. हे ओळखण्यासाठी रक्ताच्या चाचण्या केल्या पाहिजेत.
5. प्लॅसेंटाची जागा अर्थात वार गर्भाशयाच्या पिशवीच्या खालच्या भागात आली असेल, तर ते अडचणीचं ठरू शकतं. गर्भाशयाच्या पिशवीपासून वार सुटली तरीही ते आई व बाळाच्या जीवासाठी घातक ठरू शकतं. 6. गरोदरपणात उद्भवणारा मधुमेह व उच्च रक्तदाब काळजीचं मोठं कारण ठरू शकतो. त्याकडेही सुरुवातीलाच लक्ष देणं हिताचं असतं. हेही वाचा - OMG! जुळ्या भावांशी लग्न केलेल्या जुळ्या बहिणींच्या मुलांचा DNA एकच; पाहून सर्वजण चकीत 7. वेळेआधी होणारी प्रसूती, 37 आठवड्यांच्या आतच पाणी जाणं, कळा सुरू होणं असे प्रकार घडले, तर त्यावर वेळीच उपचार केले पाहिजेत. अशा वेळी लवकरात लवकर चांगल्या रुग्णालयात पोहोचणंही महत्त्वाचं असतं. 8. Polyhydramnios किंवा oligohydramnios या समस्यांचं निदान वेळेत झालं, तर उपचार शक्य असतात. या समस्यांमध्ये सिझेरियन प्रसुतीवेळी कमी धोक्याची परिस्थितीसुद्धा जास्त रक्तस्राव झाल्यानं अचानक खूप धोकादायक बनू शकते.
9. खूपच थोड्या घटनांमध्ये amniotic fluid embolism किंवा thromboembolism या समस्या उपचार करण्यासाठी डॉक्टरांना वेळच देत नाहीत. अशा समस्या अचानक उद्भवतात. प्रसूती म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म असतो असं म्हणतात. प्रसुतीवेळी व त्यानंतर आरोग्य नीट राहण्यासाठी गरोदरपणात स्त्रियांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. गरोदर राहण्याआधीपासूनच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. यामुळे भविष्यातील बहुतांश धोके टाळता येऊ शकतात.