मुंबई, 27 जानेवारी : हिवाळ्यात चहा-कॉफी (Tea-Coffee) पिणं सर्वांनाच आवडतं. बरेच लोक दिवसातून अनेक वेळा चहा पितात. पण तुम्हाला माहीत आहे का, चहा बनवण्याची योग्य पद्धत कोणती आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचा चहा आवडतो. काहींना चहामध्ये आलं (Ginger) आवडतं, तर काहींना वेलची आवडते. काहींना चहामध्ये चहा मसाला (Tea Masala) लागतोच; तर काही लोक चहामध्ये साखरेऐवजी गूळ घालतात. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी असाल, ज्यांचं चहाशी वेगळं खास नातं आहे, तर तुम्हाला चहाशी संबंधित काही टिप्स माहीत असणं आवश्यक आहे. या टिप्स तुमच्या चहाची लज्जत आणखी (Right Way To Make Good Tea) वाढवतील.
औषधी वनस्पती किसण्याऐवजी एकत्र कुटून घ्या.
आलं, वेलची, तुळस या औषधी वनस्पतींचा चहामध्ये वापर केला जातो. बहुतेक लोक आलं किसून चहामध्ये घालतात. परंतु जर तुम्हाला चहामध्ये एक अनोखी चव हवी असेल, तर आलं, वेलची आणि तुळस एकत्र बारीक करून उकळत्या पाण्यात घालावं लागेल. तुळशीचा चहा आवडत नसेल तर त्याऐवजी 2 लवंगा आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा कुटून घ्या. 1/2 इंच आल्याचा तुकडा, 2 वेलची, 3-4 तुळशीची पानं हे तिन्ही एकत्र कुटून घ्या आणि हा मसाला चहात वापरा. यामुळं तुमच्या चहाला एक वेगळीच चव येईल.
वाळलेलं लिंबू वापरा
चहामध्ये वाळलेलं लिंबू वापरल्यास त्याची चव खूप छान लागते. लेमन टी बनवताना मसाला पावडरचा वापर अनेकदा केला जातो. पण तुम्ही कधी वाळलेलं लिंबू यासाठी वापरलंय का? अरबी चहामध्ये वाळलेल्या लिंबाचा वापर केला जातो आणि त्याची चव खूप चवदार लागते. यासाठी चहापत्ती पाण्यात उकळून त्यात वाळलेल्या लिंबाचे दोन तुकडे टाका. चांगली उकळी आल्यावर त्यात साखर घाला. जर तुम्हाला चहात दूध घालायचं असेल, तर ते अगदी शेवटी घाला. अन्यथा त्याची गरज नाही. तुमचा अरेबिक लेमन-टी तयार आहे आणि तुम्ही असा चहा जरूर करून पहा.
साखरेऐवजी हे वापरा
साखर घातलेला चहा आरोग्यदायी मानला जात नाही. रिफाइंड साखरेऐवजी इतर गोड पदार्थ चहात वापरणं चांगलं. चहामध्ये साखरेऐवजी तुम्ही मध, ब्राऊन शुगर, गूळ आणि ज्येष्ठमध घालू शकता. त्यांच्या चवीमुळं चहाला गोडपणा येईल आणि एक वेगळा स्वादही येईल. ही चव सामान्य चहापेक्षा वेगळी असेल.
हे वाचा - Shukra Margi 2022 : 29 जानेवारीपासून शुक्राची अशी असेल चाल; या राशींचे नशीब चमकणार
चहापत्तीमध्येच वेलची आणि लवंग घालून ठेवतात
असे बरेच लोक आहेत, जे चहापत्तीमध्येच लवंग आणि वेलची घालतात; जेणेकरुन, हे पदार्थ वेगवेगळे घालावे लागू नयेत. पण ही पद्धत योग्य नाही. असं ठेवल्यामुळं चहापत्ती आणि लवंग-वेलची या दोन्हींच्या सुगंधावर परिणाम होतो. या दोन्हींचा स्वतंत्रपणे वापर करावा. चहाच्या योग्य चवीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे.
चहा घट्ट आणि फेसाळता बनवा
चहाला थोडा अधिक रुचकर बनवण्यासाठी, आपल्या हातात चमचा घेऊन तो वारंवार खालीवर करत रहा. तसंच चहा वेगवेगळ्या भांड्यांमध्ये ओतताना थोड्या उंचीवरून ओतावा. या गोष्टीचाही चहा बनवण्याच्या योग्य पद्धतींमध्ये समावेश होतो. या टिप्समुळं चहा घट्ट आणि फेसाळता बनवता येतो. अशाच पद्धतीनं दूधही फेसाळतं बनवता येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Tea, Tea drinker