नवी दिल्ली, 18 जानेवारी : कोरोनाच्या (covid-19) उपचार पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि त्यावर चांगल्या प्रतीची लस काढण्यासाठी जगभरातील सर्वच देशांकडून प्रयत्न सुरु आहे. कोरोना रुग्णाच्या तपासण्या करुन त्यांना ताबडतोब उपचार कसे मिळतील यासाठी बऱ्यांच तज्ज्ञांकडून संशोधन करण्यात येत आहे. आतापर्यंत कोरोनाच्या तपासण्या या गुंतागुंतीच्या होत्या. तपासण्यांचा अहवाल यायला दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागायचा. पण आता नवीन संशोधनानुसार, एक रॅपिड ब्लड टेस्ट (Rapid Blood Test) आली आहे. यामध्ये कोरोना तपासणीचा रिपोर्ट लवकर येऊन त्या रुग्णाला कोरोनाचा धोका किती प्रमाणात आहे हे समजण्यास मदत होणार आहे.
या नवीन रक्त तपासणीच्या माध्यमातून रुग्णाला कोरोनाचा धोका किती आहे, त्याचा मृत्यू होण्याची शक्यता आहे का? हे समजण्यास मदत होणार आहे. जेसीआय इनसाइट जनरलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, या रॅपिड रक्त तपासणीमध्ये मायटोकॉन्ड्रियल डीएनएची पातळी (Mitochondrial DNA levels) मोजली जाते. या रक्त तपासणीमुळे रुग्णामध्ये असलेली कोरोना आजाराची गंभीरता लक्षात घेऊन योग्य पद्धतीने उपचार केले जाऊ शकतात.
अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील (Washington University in the US) सहाय्यक प्राध्यापक ऋषिकेश कुलकर्णी यांनी सांगितले की, 'कोरोना रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर 24 तासांच्या आत रॅपिड ब्लड टेस्ट केल्यामुळे एखाद्या रुग्णाचा रक्तदाब कमी होऊ नये म्हणून त्याला डायलिसिस, इनक्युबेशन किंवा औषधाची आवश्यकता आहे की नाही, याचा डॉक्टरांना अंदाज लावता येईल. तसंच या रुग्णावर दुसरे काही उपचार करावे लागतील की नाही हे ते ठरवू शकतात.'
'आतापर्यंत आम्हाला याबाबत हे निष्कर्ष मिळालेत पण यावर सखोल संशोधन होण्याची गरज असल्याचे देखील ऋषिकेश कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, रोगाच्या गांभीर्याबरोबरच क्लिनिकल ट्रायल्सचे डिझायनिंग करण्यासाठी या रक्त तपासणीचा भविष्यात एक साधन म्हणून वापर केला जाऊ शकतो. या रक्त तपासणीचा उपयोग कोविडचा सर्वाधिक धोका असलेल्या रुग्णांना शोधून काढण्यास होऊ शकतो. तसंच एखाद्याला विशेष उपचार द्यायचे असतील तरी सुद्धा या नव्या रक्त तपासणीचा फायदा होऊ शकतो.
पहिल्याच दिवशी रुग्णालयात दाखल झालेल्या 97 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या रक्ताची तपासणी या अभ्यासात करण्यात आली. या तपासणीच्या माध्यमातून त्यांच्या शरीरातील मायकोकॉन्ड्रियल डीएनए पातळी मोजण्यात आली. यामधून असे आढळून आले की, ज्या रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल केले होते तसंच ज्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता त्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियल डीएनएची पातळी खूपच जास्त प्रमाणात आढळली.
हे संशोधन करताना सर्व रुग्णांचे वय, लिंग, आरोग्याची परिस्थिती काहीही असली तरीही मायटोकॉन्ड्रियल डीएनएची पातळी अधिकच सापडली. या संशोधनात असे दिसून आले की, 'ज्या कोरोना रुग्णांच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग जास्त झाला होता तसंच त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. त्यांच्यामध्ये मायकोकॉन्ड्रियल डीएनएची पातळी साधारण 10 पट जास्त होती.' ही नवीन रक्ताची तपासणी केल्यामुळे रुग्णावर लवकर उपचार केले जाऊन त्यांचा जीव वाचवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे ही रक्त तपासणी कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरु शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus