मुंबई, 12 जानेवारी - जगातील विविध देश आपल्या खाद्यसंस्कृतीद्वारे ओळखले जातात. प्रत्येक ठिकाणांवरील खाद्याची चव वेगवेगळी असते. त्या ठिकाणच्या हवामानावर भाजीपाला, अन्न-धान्य आणि खाद्यपदार्थ असतात. भारतातील खाद्यपदार्थांची संपूर्ण जगाला ओळख होते ती इथल्या मसाल्यांमुळे. मीठ आणि मसाल्यांमुळे खाद्यपदार्थांना चव येते. मीठ नसेल तर कितीही काहीही घाला, त्या पदार्थांना मुळीच चव येत नाही. पण जगात असं एक ठिकाण आहे जिथं खाद्यपदार्थांत मसाले आणि मीठ टाकण्याऐवजी वाळू आणि माती (Place where Mud and Sand add to food) टाकली जाते, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
ही अजब प्रथा इराणमधील (Iran) होर्मुझ नावाच्या बेटावर (Hormuz Island) पाळली जाते. खाद्यपदार्थांत माती आणि वाळू घातली जाते. याला इंद्रधनुष्य बेट (Rainbow Island) असेही म्हणतात. कारण इथली माती आणि वाळू विविधरंगी आहे. एवढंच नव्हे तर इथले पर्वतदेखील इंद्रधनुष्याच्या रंगासारखे दिसतात. इथल्या डोंगरांतही मीठ आहे. त्यामुळे इथले लोक अन्नपदार्थांत वेगळे मीठही वापरत नाहीत. त्यांच्या जेवणात मीठ किंवा मसाले न घालता माती आणि वाळू घातली जाते. असे पदार्थ ते अतिशय आवडीने खातात.
हे आहे कारण
अशा पदार्थांत माती (Mud) आणि वाळू (Sand) टाकण्याचे काय कारण असेल? असा प्रश्न पडतोच. या बेटावरील माती आणि वाळूमध्ये भरपूर मीठ, लोह आणि इतर खनिजे (Minerals) असतात. ही सर्व खनिजं आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. त्यामुळे इथले लोक जेवणात या वाळूचा आणि मातीचा वापर करतात. मात्र कोणत्याही अन्नपदार्थांत इथली माती किंवा वाळू घालण्यापूर्वी, ती पूर्णपणे स्वच्छ केली जाते आणि मगच पदार्थांत घातली जाते.
बेटावरील खाद्यसंस्कृती
अशी माती किंवा वाळू घालून बनवलेले इथले अनेक पदार्थ प्रसिद्ध आहेत. विशेषत: माशांपासून (Fish) बनवलेले पदार्थ अधिक प्रसिद्ध आहेत. इथं गोड्या पाण्यातील सार्डिन, किल्का आणि मोमाघ असे मासे मिळतात. त्यांना संत्र्याच्या सालीने मॅरिनेट केले जाते आणि नंतर वाळू, चिकणमातीपासून बनवलेले विशेष मसाले लावले जातात. नंतर दोन दिवस हे मासे उन्हात सुकवले जातात. त्यानंतर, त्यापासून इथला सर्वात प्रसिद्ध असा 'सुराघ' हा खास पदार्थ तयार होतो. जगभरात या पदार्थाची ख्याती पसरली आहे. इथं येणारे पर्यटकही याचा आस्वाद घेतल्याशिवाय राहत नाहीत. तुम्हालाही या जगावेगळ्या वाळू आणि मातीमिश्रीत पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल, तर एकदा तरी नक्कीच या बेटाला भेट द्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.