Home /News /lifestyle /

#PGStory: डेटवर गेलेल्या मैत्रिणीला बोलावण्यासाठी करावा लागला Ambulance ला कॉल

#PGStory: डेटवर गेलेल्या मैत्रिणीला बोलावण्यासाठी करावा लागला Ambulance ला कॉल

'पीजी'चे दरवाजे बंद झाले तरी ती परत आली नव्हती. आता काय करावं, हा प्रश्न आम्हाला पडला. मग एक कल्पना सुचली.

    ही गोष्ट आहे 29 वर्षांच्या वंदनाची. 19 व्या वर्षी बी.टेक. करण्यासाठी ती दिल्लीहून जयपूरला गेली. त्या काळात ती हसली, रडली आणि आयुष्यातील अनेक अविस्मरणीय अनुभव तिने घेतले. शिक्षण झाल्यावर एच.सी.एल.मध्ये नोकरी मिळाली. जवळपास साडेचार वर्ष नोकरी केल्यानंतर असोसिएटच्या पदावरून राजीनामा देऊन ती आता पूर्णवेळ मुलाचा सांभाळ करते. तिच्याच शब्दात तिची PG story. ------------------------ ‘न्यूज18 लोकमत’ची नवी मालिका PG Story. जे तरुण आणि तरुणी करिअरसाठी आपलं गाव सोडून महानगरांमध्ये आले, त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित ही मालिका आहे. आपल्यापैकी अनेकांना घरापासून दूर, वेगळ्या शहरात पेइंग गेस्ट म्हणून राहण्याचा अनुभव असेल. या मालिकेत मांडण्यात आलेले अनेक अनुभव कदाचित तुम्हालाही आले असतील. ------------------ बारावीपर्यंत दिल्लीत शिक्षण झाल्यानंतर इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विषयात बी. टेक. करण्यासाठी 2007 साली जयपूरला गेले. प्रवेशप्रक्रिया ऑनलाईनच झाली होती. कॉलेज सुरू होण्याच्या दिवशीच जयपूरमध्ये दाखल झाले. आईबाबा सोडायला आले होते. पूर्ण प्रवासभर मी काचेतून बाहेर बघत बसले होते. नव्या शहरात शिक्षण आणि रात्ररात्र मित्रांसोबत फिरण्याच्या कल्पनेनं मजा येत होती. आमचं कॉलेज जयपूर शहरापासून 36 किलोमीटर दूर फागी नावाच्या गावात होतं. तिथंच राहण्याची सोय झाली होती. पीजीची फॉर्मॅलिटी पूर्ण केली. आईबाबांची कार जशी गेटमधून बाहेर पडली, तसं माझ्या काळजात चर्र झालं. मित्रांसोबत धमाल करण्याचे विचार गायब झाले. एका क्षणासाठी काळीज तुटल्यासारखं झालं. दिल्लीतनं आलेल्या माझ्यासारख्या बिनधास्त मुलीला त्या दिवशी काय झालं होतं कुणास ठाऊक! गाडी अगदी दिसेनाशी होईपर्यंत मी तिकडे पाहत राहिले. अश्रू थांबता थांबत नव्हते. त्यापूर्वी 18 वर्ष मी एक रात्रही आईपासून दूर राहिले नव्हते. आजीकडे मी जायचे, पण फक्त आई सोबत असेल तरच. त्यांना दिल्लीला परत जाऊन तीन दिवस झाले होते आणि मी माझ्या खोलीत बसून रडत होते. एखादी रस्ता चुकलेली मुलगी दुसऱ्याच कुणाच्या घरी येऊन पोहोचावी, असं मला वाटत होतं. अधूनमधून रुममेट मला काही ना काही मेसमधून आणून द्यायची आणि मी ते खात होते. या तीन दिवसांत रडता रडता कधी झोप लागायची, तेही समजायचं नाही. जाग आल्यावर पुन्हा रडू यायचं. तिसरा दिवसही संपत आला होता. संध्याकाळ झाली होती. तेवढ्यात रुमवर एक मुलगी आली. आपली ओळख करून दिली. ती सीनिअर होती. अश्रूंनी भिजलेल्या गालावर तिचा झालेला स्पर्श हायसा वाटला. ती होती अनोळखी, पण मी मात्र तिच्यासमोर हमसून हमसून रडले. तिने समजावलं. हेच सत्य आहे. तुला लढायचं आहे. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर सुरुवातीचा काळ हा आव्हानात्मकच असतो. या काळात आपली जी प्रतिमा तयार होते, तीच पुढे मोठी होते. चांगली असेल तर आणखी चांगली होते. देशाच्या राजधानीतून आलेली मुलगी फक्त रडत बसते, हे काही बरोबर नाही. असं करून तुझ्या रुममेटचा तुझ्यावरचा विश्वास उडेल. ती सुद्धा तुझ्यासारखी पहिल्यांदाच घर सोडून इथं आली आहे. तिचे शब्द मनाला पटले. आपल्याला आईवडिलांपासून दूर राहायचं आहे, हे वास्तव मी स्विकारलं. जी मुलगी पहिले तीन दिवस खोलीत रडत बसायची, ती पुढच्या सहा महिन्यांत कॉलेजची प्रेसिडंट झाली. वेळेचं बंधन मी स्वतःवर वेळेचं बंधन घालून घेतलं होतं. प्रत्येक काम वेेळेत पूर्ण करत होते. 7 वाजता उठायचं, 8 वाजता नाश्ता, एका तासात वॉशरूमच्या लाईनमध्ये उभं राहणं, 8 वॉशरुम आणि 28 मुली. सर्वांकडं सकाळचा हाच एक तास असायचा. एक तर खाण्यासाठी धावपळ आणि दुसरीकडे सुमार चवीचा नाश्ता. आवडो वा न आवडो, तेच खावं लागणार होतं. इथं आमचे नखरे सांभाळणारं कुणीच नव्हतं. हळूहळू ती परिस्थितीही अंगवळणी पडली. 8 वाजता मेस सुरू व्हायची. त्यापूर्वी 7 वाजता उठून सगळ्या सीनिअर्सचे दरवाजे ठोठावून त्यांना गुडमॉर्निंग करावं लागायचं. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी त्यांना गुडमॉर्निंग करणं सक्तीचं होतं. पहिले 32 दिवस हे रॅगिंग चाललं. या काळात सलवार, कुर्ता आणि ओढणी हे तीन वेगवेगळ्या रंगाचे घालावे लागत. पायात बाथरूमचं चप्पल, डोक्याला तेल, दोन वेण्या आणि दोन्ही वेण्यांना वेगवेगळ्या रंगांचे रबर लावायला लावत. 32 दिवस यात अवतारात आम्ही होतो. सीनिअर्सना 90 अंशात सॅल्यूट करायचो. मुलींना ‘मिस बॉस’ तर मुलांना ‘मिस्टर बॉस’ या नावाने हाका मारायचो. सगळेच नवे होतो. कुणीच कुणाला ओळखत नव्हतं. मात्र बिनधास्त एकमेकांसोबत कपडे शेअर करायचो. या 32 दिवसांत एकमेकांशी चांगलीच ओळख झाली होती. रॅगिंगचा काळ संपला. त्यानंतरचा एक महिना एखाद्या उत्सवासारखा होता. आम्ही नवे कपडे घालून कॉलेजला जायचो. आपल्यातले गुण इतरांना दाखवायचो. स्टाईलमध्ये चालायचो. कॉलेजमध्ये रमू लागलो. हळूहळू क्लासला बंकही मारू लागलो. पण अजून रात्रीच्या वेळी बाहेर फिरण्याचं स्वप्न काही पूर्ण झालं नव्हतं. रात्री 9 वाजता पीजीत परत यावं लागे. तिथं रोजच्या रोज वॉर्डन हजेरी घ्यायची. 9 वाजल्यानंतर फक्त एकाच ठिकाणी जायला परवानगी होती. ते म्हणजे कॉलेजचंच मेडिकल हॉस्पिटल. हे कॉलेजपासून 20-25 मिनिटांवर होतं. इथं येऊन सहा महिने झाले होते. एका संध्याकाळी एक मैत्रिण डेटवर गेली. रात्री 9 वाजून गेले तरी ती परत आली नाही. आता काय करायचं, हा प्रश्न आम्हा सर्वांनाच पडला. तिला परत तर यायचं होतं, मात्र आत प्रवेश मिळणार नव्हता. आता तिला परत आणण्याचं प्लॅनिंग सुरू झालं. यासाठी एका मुलीला खोटं खोटं आजारी पडावं लागलं. ती फारच आजारी आहे, हॉस्पिटलला न्यावं लागेल, असं वॉर्डनला सांगितलं. तिथून ऍम्ब्युलन्स मागवली. त्यांनी पेशंट सोडून फक्त एकाच मुलीला सोबत येण्याची परवानगी दिली. रस्त्यात ऍम्ब्युलन्सवाल्या भैयाला मस्का मारून पूर्ण गोष्ट सांगितली. पण तो म्हणाला की हॉस्पिटलमध्ये तर जावंच लागेल. ऍम्ब्युलन्सचा रिपोर्ट तिथे दाखवावा लागतो. त्या हॉस्पिटलचा विचित्र नियम होता. कुठल्याही आजारात ड्रीप लावायचे. सोबतच्या मुलीनं आजारी पडण्याचं नाटक तर केलं, पण ड्रीप लावायला ती काही तयार नव्हती. क्टरांनाही गुंडाळण्यात आम्ही यशस्वी झालो. हिला ड्रिपची ऍलर्जी असल्याचं सांगत औषधं द्यायला सांगितली. ती औषधं घेऊन कसेबसे तिथून सटकलो. येताना डेटवर गेलेल्या मुलीला ऍम्ब्युलन्समध्ये घेतलं. परत आल्यावर वॉर्डननं आमची चोरी लगेच पकडली. जाताना फक्त दोन मुलींना पाठवलं होतं. येताना तीन कशा आल्या, असा प्रश्न तिने विचारला. मग आम्ही तिला समजावून सांगितलं की तिने तिघींना पाठवलं होतं. दोघींना नाही. हिला चक्कर आली होती. ही उभीच राहू शकत नव्हती. तेवढ्यात काही मैत्रिणींनी अटेंडन्सची वही चोरून तिची हजेरी लावून टाकली होती. डेटवर गेलेली मैत्रिण जेव्हा रुममध्ये आली तेव्हा मात्र सगळ्यांनी तिची जोरदार धुलाई केली. (ओळख उघड होऊ नये म्हणून नावे बदलली आहेत. )
    Published by:desk news
    First published:

    Tags: Boyfriend, Girlfriend, Jaipur, PG story, Rajasthan, Relationship

    पुढील बातम्या