‘न्यूज18 लोकमत’ची नवी मालिका “पीजी स्टोरी” #PG Story. जे तरुण आणि तरुणी करिअरसाठी आपलं गाव सोडून महानगरांमध्ये आले, त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित ही मालिका आहे. आपल्यापैकी अनेकांना घरापासून दूर, वेगळ्या शहरात पेइंग गेस्ट म्हणून राहण्याचा अनुभव असेल. या मालिकेत मांडण्यात आलेले अनेक अनुभव कदाचित तुम्हालाही आले असतील. ही गोष्ट आहे पायल सक्सेना (बदललेलं नाव) हिची. पायल दिल्लीत राहून IAS ची तयारी करत आहे. युपीच्या बिजनौर जिल्ह्यातील पायल सध्या दिल्लीच्या लक्ष्मीनगर भागात राहते. गेल्या दोन वर्षांत तिला आलेले अनुभव तिने शेअर केले आहेत. बारावीपर्यंतचं शिक्षण बिजनौरला झाल्यावर मला दिल्लीत येऊन UPSC ची तयारी करायची होती. खरं तर आईवडील यासाठी तयार नव्हते. सिव्हिलची तयारी तर लखनऊमध्येही होऊ शकते, दिल्लीला जायची काय गरज आहे, असं त्यांचं मत होतं. दिल्लीच का, असा त्यांचा सवाल होता. लखनऊ मामा-मामी राहतात. तिथं तुझी राहण्याची, खाण्याची सगळीच सोय होईल आणि कुठलीही चिंता उरणार नाही, असं त्यांचं मत होतं. बाबांना समजावणं सोपं नाही, हे माझ्या लक्षात आलं होतं. त्यामुळे मी शांत होते. मात्र देशाच्या राजधानीत जाऊन शिकण्याची इच्छा काही स्वस्थ बसू देत नव्हती. मग मी दिल्लीला जाण्याचा दुसरा मार्ग शोधला. मग माझ्या सैतानी डोक्यात एक आयडिया आली. जर मी माझ्या भावाला यासाठी तयार करू शकले, तर माझा दिल्लीचा मार्ग कदाचित सुकर होऊ शकेल. तुम्हाला पटो वा ना पटो, माझ्या मते भावांनी सांगितलेली गोष्ट आईवडिलांना तुलनेनं पटकन पटते. त्यामुळे जेव्हा भाऊ ऑफिसमधून घरी आला, तेव्हा मी त्याला माझ्या मनातली इच्छा सांगितली. ते ऐकून त्याला आनंद तर झाला, पण लगेचच त्याच्या चेहऱ्यावर काळजी दिसू लागली. बाबा या गोष्टीसाठी तयार होतील, असं मला वाटत नाही, असं तो मला म्हणाला. मी म्हणाले, म्हणून तर हे काम मी तुला सांगितलंय. त्या दिवशी रात्री जेवताना हा विषय काढूया, असं ठरलं. बुलेट घेऊन स्टंट करायला गेले अन् पडले तोंडावर, पाहा Video त्या रात्री वडील घरी आले आणि रात्रही झाली होती. आई किचनमध्ये स्वयंपाक करत होती आणि आम्हाला वाढत होती. मी, भाऊ आणि बाबा जेवायला बसलो होतो. त्याचवेळी भावानं हळूच या विषयाला हात घातला. विषय ऐकून बाबा असे काही भडकले की जणू आईनं दुधीच्या भाजीऐवजी कारल्याचं सूपच त्यांना प्यायला दिलं. त्यानंतरची गोष्ट फारच लांबलचक आहे. इन शॉर्ट, बराच तमाशा, वादविवाद झाल्यानंतर शेवटी वडील तयार झाले. पुढच्या महिन्यात सगळ्या गोष्टींची खातरजमा करून मला दिल्लीला पाठवण्याचा निर्णय निश्चित झाला. त्यानंतर बराच रिसर्च झाल्यावर माझं कोचिंग लक्ष्मीनगर भागात होईल, हे नक्की झालं. कोचिंग सेंटरच्या जवळच सान्या नावाची त्यांच्या मित्राची मुलगी राहते. ती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तिच्याच रुमवर माझ्या राहण्याची सोय करण्यात आली. सान्याच्या रुमवर आणखी एक मुलगी राहायची आणि ती सान्याच्याच कंपनीत काम करायची. तिचं नाव श्रेया. बाबा आणि भाऊ मला सोडायला दिल्लीला आले आणि परत निघून गेले. कुटुंबापासून दूर राहण्याचा एक वेगळाच त्रास असतो, जो शब्दांत वर्णन करता येऊ शकत नाही. काळ जाईल, तसतशी मी या वातावरणाशी ऍडजस्ट होत होते. कोचिंग, अभ्यास, स्वयंपाक, घरकाम आणि रुम पार्टनर असं माझं नवं आयुष्य सेट होत होतं. श्रेया आणि सान्या यांच्यासोबत थोडीफार धमालही मी करायचे. आमचं बरं चाललं होतं. त्यावेळचा एक भन्नाट किस्सा मला आठवतो. सान्या आणि श्रेया यांचे बॉयफ्रेंड त्यांना भेटायला रूमवर यायचे. त्या दोघीही आपापल्या बॉयफ्रेंडसोबत बराच वेळ एकत्र घालवत असत. आमचे घरमालक आणि त्यांची बायको हे दोघंही हा प्रकार पाहून थक्क व्हायचे आणि त्यांना ते फारसं पसंत नसायचं. गेटचा आवाज आला की आंटी दारात जाऊन उभ्या राहायच्या आणि गेटपासून ते रुममध्ये येईपर्यंत त्यांच्याकडं डोळे मोठे करून पाहत राहायच्या. एकदा आम्ही तिघीही घराबाहेर होतो. श्रेयाचे आईवडील न सांगताच घरी आले. त्यावेळी घरमालकानं त्यांना बसवलं आणि सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या. त्यांनी सांगितलं की इथं चार-चार तरुण येतात. या मुली कुणाचंच ऐकत नाहीत. नेहमी मनमानी करत असतात. रात्री उशिरापर्यंत घरी येत नाहीत. हे ऐकून श्रेयाच्या वडिलांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. आम्ही घरी परत आल्यावर त्यांनी आमचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर आम्ही त्यांना वेगवेगळी कारणं सांगून शांत करण्याचा प्रयत्न केला. घरमालकाला आम्हाला तिथून बाहेर काढायचं असल्यामुळे तो वाट्टेल ते सांगत असल्याचं आम्ही म्हणालो. मुलं जास्त पैसे द्यायला तयार असल्यामुळे आम्हाला काढून त्याला मुलांना हे घर भाड्याने द्यायचं आहे, असंही सांगितलं. कसंबसं आम्ही श्रेयाच्या वडिलांना समजावलं आणि कानाला खडा लावला. कमीत कमी पाच-सहा महिने तरी रुमवर कुणाच्याही बॉयफ्रेंडला येऊ द्यायचं नाही, असं ठरवलं. आजही हा प्रसंग आठवला की हसू येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.