नवी दिल्ली, 25 जून : कॉफी (Coffee) आवडणारा एक विशिष्ट वर्ग असतो. यात तरुण-तरुणींचा मोठा समावेश आहे. चहा हे सहज, कुठेही उपलब्ध होणारं अमृततुल्य असं पेय समजतात. त्या मानानं कॉफी अगदी चहासारखी कुठेही मिळत नाही. तसंच कॉफीचे अनेक प्रकारही उपलब्ध असतात. गरम किंवा गार अशी दोन्ही प्रकारे कॉफी पिता येते. त्यामुळे कॉफीचे चाहते थोडे वेगळे असतात. हे कॉफी लव्हर्स कधीही, कोणत्याही वेळी कॉफी पिऊ शकतात. कॉफी कधी प्यावी आणि कधी पिऊ नये, त्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होतो, हे अनेक आहारतज्ज्ञ सांगतात; पण कॉफी प्यायल्यामुळे एखादी व्यक्ती अधिक खरेदी करते (Coffee Can Lead To Spend More), असं कोणी सांगितलं, तर विश्वास बसणार नाही. हे सिद्ध करणारं एक संशोधन नुकतच करण्यात आलं. त्याविषयी टीव्ही 9 हिंदीनं सविस्तर वृत्त दिलं आहे. कॉफी पिऊन खरेदीला गेल्यास संबंधित व्यक्ती 50 टक्के जास्त खर्च करून येते, असं कॉफीबाबत केलेल्या निष्कर्षात स्पष्ट झालं आहे. साउथ फ्लोरिडा विद्यापीठात याविषयी संशोधन करण्यात आलं. कॉफीमध्ये कॅफेन (Caffeine) हे द्रव्य असतं. त्यामुळे खरेदीच्या आधी कॉफी प्यायली, तर खरेदी जास्त होते व खर्चही जास्त होतो, असं त्या संशोधनात सिद्ध झालं आहे. या संशोधनानुसार, कॉफी प्यायल्यामुळे स्वतःवरचं नियंत्रण कमी होऊ लागतं. याचा अभ्यास करण्यासाठी फ्रान्समधली रिटेल स्टोअर्स आणि स्पेनमधल्या डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये येणाऱ्या ग्राहकांवर संशोधन करण्यात आलं. अशा 300 ग्राहकांना कॅफेन असलेली कॉफी, कॅफेन नसलेली कॉफी आणि पाणी प्यायला देण्यात आलं. त्यानंतर त्यांना खरेदी करायला पाठवलं. या संशोधनाअंती असं आढळलं, की जे कॅफेन असलेली कॉफी प्यायले होते, (Effects Of Drinking Coffee Before shopping) त्यांनी इतरांच्या तुलनेत जास्त पैसे खर्च केले व सामानही जास्त घेतलं. यात अनावश्यक सामानही घेतलं गेलं. कॉफीमधलं कॅफेन हे एक उत्तेजक द्रव्य आहे. त्याच्या सेवनामुळे मेंदूत डोपामाइन (Dopamine) हे रसायन स्रवलं जातं. डोपामाइनमुळे मन आणि शरीर उत्तेजित होतं व उत्साह संचारतो. याच कारणामुळे एक कप कॉफी पिऊन खरेदीला गेल्यास, आपण 30 टक्के जास्त खरेदी करून येतो. खरेदीतलं सामान आणि खर्च या दोन्हींवरही कॅफेनचा परिणाम होतो. कॅफेनच्या अतिसेवनाबाबत आहारतज्ज्ञ वेळोवेळी सल्ले देत असतात. एखाद्या वेळी मनाला ऊर्जा देण्यासाठी कॉफी प्यायली, तर काहीच हरकत नाही; मात्र विनाकारण शरीरात कॅफेनचं प्रमाण वाढलं, तर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आता कॅफेनच्या या उत्तेजना देणाऱ्या गुणधर्माचा खरेदीवरसुद्धा कसा परिणाम होतो, हे संशोधनातून समोर आलंय, त्यापासून योग्य तो धडा घेतलेला बरा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.