नवी दिल्ली, 11 डिसेंबर : अलीकडच्या काळात आरोग्यविषयक (Health Issue) समस्या वाढताना दिसत आहेत. अर्थात त्याला धावपळीची जीवनशैली, ताण-तणाव, व्यायामाचा अभाव आदी कारणं आहेत. त्यामुळे हृदयविकार, मधुमेह, कर्करोग आदींच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. अनेक कारणांमुळं जसे शारीरिक आजार होतात तसे मानसिक आजार (Psychological Disease) देखील होतात. बदलती जीवनशैली, नात्यांमधील विसंवाद, कौटुंबिक जबाबदाऱ्या आदी घटकांमुळे मानसिक आजारांचं प्रमाण वाढत आहे. जेव्हा एखादी व्यक्ती विचित्र वागू लागते, तेव्हा कुटुंबातील सदस्य `काय जनावरासारखा वागतोय`, असं अगदी सहज म्हणू लागतात. परंतु, एखादी व्यक्ती स्वतःहून तुमच्या जवळ येत `मी गाय आहे`, असं म्हणत तसेच वर्तन करू लागली तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? एखादी व्यक्ती बैल किंवा गायीसारखी वागू लागली तर त्यामागे एक विचित्र मानसिक आजार कारणीभूत असतो. या मानसिक आजारानं ग्रस्त व्यक्ती गायीसारखी चालू लागते, चारा खाऊ लागते आणि हळूहळू ती स्वतः ला गाय समजू लागते. या मानसिक आजाराची माहिती `टीव्ही नाइन हिंदी`ने दिली आहे. बोनथ्रॉपी (Boanthropy) नावाचा मानसिक आजार झाल्यास अशी व्यक्ती स्वतःला गाय किंवा बैल समजू लागते आणि जनावरासारखं वर्तन करू लागते. हा दुर्मीळ आजार (Rare Disease) आहे. या आजाराचे रुग्ण अत्यंत अल्प प्रमाणात आढळून येतात. परंतु, एखादी व्यक्ती अशा प्रकारचं वर्तन करू लागली तरी त्याच्या कुटुंबातील सदस्य पुरेशा माहिती अभावी याला धार्मिक रंग देतात. काळी जादू समजून तोडगे करू लागतात. हा एक प्रकारचा मानसिक आजार असल्यानं असं करणं चुकीचं आहे. अहवालानुसार, प्रसिद्ध व्यक्तींपैकी राजा नबुखदनेस्सर (King Nebuchadnezzar) हा या आजाराने त्रस्त होता. निओ-बॅबिलोनियन (Neo-Babylonian) या राज्यावर राजा नबुखदनेस्सरची ख्रिस्तपूर्व 605 ते ख्रिस्तपूर्व 562 दरम्यान सत्ता होती. हे ही वाचा- जर तुम्ही भाडेकरू असाल तर जाणून घ्या हे कायदेशीर नियम, ठरतील फायदेशीर! बोनथ्रॉपी हा जोनथ्रॉपी प्रकारातील एक मानसिक आजार आहे. हा आजार दुर्मीळ असल्याने याच्या केसेस फार कमी प्रमाणात दिसून येतात. हा आजार झालेली व्यक्ती जनावारांप्रमाणे वर्तन करते. अशी व्यक्ती हातांचा वापर करून जनावरांसारखं चार पायांवर चालते आणि चारा खाते. आजाराची तीव्रता वाढल्यास अशी व्यक्ती बोलणं बंद करते. तिला जनावरांच्या कळपात खायला आवडू लागतं. स्वतःला गाय समजून तिच्यासारखं आयुष्य जगायला सुरवात करते. विशेष हा आजार झालेल्या व्यक्तीला आपण गायीप्रमाणे (Cow) वर्तन करतो, याची जाणीव राहत नाही. हा विचित्र मानसिक आजार स्वप्नांसारख्या प्रकारामुळे होतो, असं तज्ज्ञ सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.